
मुंबई : साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या बहुचर्चित ‘द राजा साब’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. बाहूबलीसारखा सुपरहीट चित्रपट देणारा प्रभास आता मात्र एकामागोमाग फ्लॉप चित्रपट देताना दिसत आहे. ९ जानेवारीला प्रदर्शित झालेला ‘द राजा साब’ या चित्रपटाची देखील तिच अवस्था पाहायला मिळत आहे. फॅन्स आणि पेड प्रिव्ह्यूजच्या जोरावर पहिल्या वीकेंडला चित्रपटाने १०० कोटी क्लब गाठला असला, तरी त्यानंतर कमाईत सातत्याने घसरण होत आहे. सोमवारनंतर मंगळवारीही चित्रपटाच्या उत्पन्नात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून पाचव्या दिवशी हा हॉरर-कॉमेडी चित्रपट ५ कोटींचाही टप्पा गाठण्यासाठी संघर्ष करताना दिसला. त्यामुळे मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट फार विशेष चालेल असं वाटत नाही.
सुदैवाने थलपती विजयचा ‘जन नायकन’ हा चित्रपट ९ जानेवारीला एकाचवेळी प्रदर्शित झाला नाही, अन्यथा ‘द राजा साब’ची अवस्था आणखी बिकट झाली असती, असं चित्रपट व्यापारतज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान, चित्रपटगृहांमध्ये ४० दिवस जुना ‘धुरंधर’ अजूनही मजबूत पकड राखून आहे, तर २६ दिवसांचा ‘अवतार: फायर अँड ॲश’ आणि १३ दिवसांचा ‘इक्कीस’ आता हळूहळू कमकुवत पडताना दिसत आहेत.
रिलीजच्या काही दिवसांतच अपेक्षाभंग
मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘द राजा साब’कडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र रिलीज झाल्यानंतर अवघ्याच काही दिवसांत या अपेक्षा धुळीस मिळाल्या. समीक्षकांसह प्रभासच्या चाहत्यांकडूनही चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. याचा परिणाम सोमवारी स्पष्ट दिसून आला, जेव्हा चित्रपट ‘फर्स्ट मंडे टेस्ट’मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला.
प्रभास, संजय दत्त, मालविका मोहनन आणि निधी अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं बजेट सुमारे ३०० कोटी रुपये आहे. पाच भाषांमध्ये रिलीज होऊनही अवघ्या ५ दिवसांत चित्रपटाने केवळ ३९.८२ टक्के खर्चाचीच वसुली केली आहे.
‘द राजा साब’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
मिळालेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ‘द राजा साब’ने देशभरात पाच भाषांमधून मिळून फक्त ४.८८ कोटी रुपयांची कमाई केली. याआधी सोमवारी हा आकडा ६.६० कोटी रुपये इतका होता. चित्रपटाची अवस्था ओपनिंग वीकेंडवरूनच स्पष्ट होते. शुक्रवारी ओपनिंग डे ला ५३.७५ कोटी रुपये कमावल्यानंतर शनिवारी कमाई घसरून २६ कोटींवर आली, तर रविवारी सुट्टी असूनही केवळ १९.१० कोटी रुपयेच कमावता आले. मंगळवारी तेलुगू शोजमध्येही सरासरी १०० पैकी ८० जागा रिकाम्या असल्याचं दिसून आलं.
५ दिवसांत भाषानिहाय कमाई
तेलुगू: ९९.३२ कोटी रुपये
हिंदी: १८.७० कोटी रुपये
तमिळ: १.०१ कोटी रुपये
कन्नड: २६ लाख रुपये
मल्याळम: १९ लाख रुपये
याशिवाय वर्ल्डवाइड कलेक्शनही निराशाजनक
देशातच नव्हे, तर परदेशातही ‘द राजा साब’ला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पाच दिवसांत ओव्हरसीज मार्केटमध्ये चित्रपटाने केवळ ३२.७० कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कमाई मिळून ‘द राजा साब’ची एकूण वर्ल्डवाइड ग्रॉस कमाई १७५.३५ कोटी रुपये इतकीच झाली आहे.
पुढील आव्हाने वाढणार
आगामी २३ जानेवारीला ‘बॉर्डर २’हा मोठा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे ‘द राजा साब’समोरची आव्हानं आणखी वाढणार आहेत. त्यामुळे चित्रपटाकडे मोकळेपणाने कमाई करण्यासाठी फक्त ९ दिवसांचा कालावधी उरला असल्याचं चित्र आहे.