Pakistani Drones Intrusion : लष्करप्रमुखांच्या इशाऱ्यानंतरही पाकच्या कुरापती सुरुच! जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी

14 Jan 2026 12:39:59


Pakistani Drones Intrusion
 
श्रीनगर : (Pakistani Drones Intrusion) जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी संध्याकाळी नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून भारतीय हद्दीत घुसलेल्या अनेक संशयित पाकिस्तानी ड्रोनना खाली पाडण्यासाठी लष्करी जवानांनी गोळीबार केला. यानंतर पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये परतण्यापूर्वी ड्रोन काही काळासाठी मंजाकोट सेक्टरमध्ये घिरट्या घालत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.या घटनेनंतर सीमावर्ती भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
राजौरी जिल्ह्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार करण्याची ही तीन दिवसांत दुसरी घटना आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर ड्रोन दिसल्यानंतर भारतीय लष्कराने मानवरहित हवाई प्रणाली (UAS) उपाययोजना राबवल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, राजौरीच्या चिंगस भागातील डुंगा गाला येथे भारतीय हद्दीत घुसलेल्या काही पाकिस्तानी ड्रोनवर सैन्याने गोळीबार केला. त्यानंतर ड्रोन गायब झाले आणि ते दुसऱ्या बाजूला माघार घेत असल्याचे मानले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांत जम्मू सेक्टरमधील सीमावर्ती भागात पाकिस्तानी ड्रोन दिसल्याच्या घटनांवर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांकडे (DGMO) तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सीमेवरील सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात आहे.


Powered By Sangraha 9.0