दापोलीतून कोच वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध; कोकणच्या नावे वनस्पतीचे नामकरण

14 Jan 2026 21:25:36

new species of lepidagathis


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोकणातील सड्यावरुन लेपिडागॅथिस म्हणजेच कोच कुळातील वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of lepidagathis). दापोलीतील निगडे गावातील सड्यावर ही प्रजात आढळून आली (new species of lepidagathis). कोकणातून शोधल्यामुळे वनस्पतीशास्त्रज्ञांनी या प्रजातीचे नामकरण लेपिडागॅथिस कोकणेन्सिस, असे केले आहे. (new species of lepidagathis)
 
 
गेल्या काही वर्षांपासून कोकणातीस सड्यांनी अनेक संशोधकांचे आणि निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे एक कारण म्हणजे सड्यांवर वाढणारी संपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जीवसृष्टी. सड्यावरील अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती म्हणजे लेपिड्याग्याथिस, जिला स्थानिक भाषेत कोच असे म्हणतात. पठारांवर फुलणाऱ्या वर्षायू वनस्पतींच्या तुलनेत कोच या वनस्पतीचा फार कमी अभ्यास झालाय. या प्रजातीला काट्यासारखे काही भाग असतात, ते शरीराला कोचल्यासारखे वाटत असल्याने स्थानिक लोकं या प्रजातीला कोच असे म्हणतात. मात्र, इंग्रजीत या वनस्पतीला लेपडाग्रॅथीस म्हटलं जाते. महाराष्ट्रात या प्रजातीच्या १७ प्रजाती आढळतात. या वनस्पती पावसाळी हंगामात फुलणाऱ्या नसून काहींना हिवाळी, तर काहींना उन्हाळी हंगामात बहर येतो. यामधील एका नव्या प्रजातीचा शोध वनस्पतीशास्त्रज्ञ अनंत पाटील, सुहास कदम, अक्षय जंगम, अजय संजय दिवे आणि रोहित माने यांनी लावला आहे.
 
 
दापोलीतून शोधण्यात आलेली लेपिडागॅथिसची ही प्रजात उन्हाळ्यात बहरणारी आहे. वनस्पतीशास्त्रांनी या प्रजातीचे नमुने दापोलीमधील निगडेच्या सड्यावरुन गोळा केले होते. या वनस्पतीची तुलना लेपिडागॅथिस महाकश्यापी आणि लेपिडागॅथिस डालझेलियाना या दोन प्रजातींबरोबर करण्यात आली. या तुलनेनंतर नव्या प्रजातीचे फुल, त्याचा फुलोरा, बिया या दोन प्रजातींपेक्षा निराळ्या दिसल्याने दापोलीतील प्रजात नवीन असल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यानंतर संशोधकांना ही प्रजात रत्नागिरी जिल्ह्यातील धातोंडी, कात्रादेवी, निगडे, पन्हाळे काजी, सागवे या गावांमध्ये देखील आढळून आली. त्यामुळे या प्रजातीचे नाव त्यांनी कोकणावरुन लेपिडागॅथिस कोकणेन्सिस असे केले. या प्रजाती उन्हाळी हंगामात बहरते. ज्यावेळी सडा निर्जीव दिसतो. मार्च आणि एप्रिलमध्ये तिला फुल येतात आणि मे पर्यंत फळ धरतात. त्यामुळे सड्यावरचा अधिवास हा उन्हाळ्यात निर्जीव वाटत असला तरी, तो या कठीण काळातही तितकाच समुद्ध असतो, याची प्रचिती ही वनस्पती करुन देते.

Powered By Sangraha 9.0