खोट्याच्या माथी ‘गोटा’!

14 Jan 2026 10:03:15
Uddhav Thackeray and Raj Thackeray
 
बोलण्यासारखे काही नसल्यामुळेच खोटा प्रचार आणि वास्तवाचा विपर्यास करण्याचा डाव ठाकरे बंधूंकडून यंदाच्या निवडणुकीत खेळला गेला. पण, त्याला तसेच खणखणीत प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ने दिले. आता खोट्या प्रचारावर मुंबईची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘उबाठा’ सेनेच्या कपाळी ‘गोटा’ हाणण्याचेच काम मुंबईकर मतदारांना करायचे आहे.
 
निवडणूक प्रचार म्हटला की, अपप्रचारही आलाच. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसते, त्यांना या अपप्रचाराचाच आधार घ्यावा लागतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून सत्ताधारी भाजपविरोधात असाच अपप्रचार केला गेला आणि त्यात विरोधकांना बर्‍याच प्रमाणात यश आले. परिणामी, केंद्रातील मोदी सरकारचे स्वबळावरील बहुमत हुकले. आता असाच अपप्रचार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत करण्यात येत आहे. मुंबईकर आता अधिक सजग असला, तरी त्याने खोट्या प्रचाराला बळी न पडण्याची दक्षता घेण्याची गरज आहे.
 
आगामी निवडणुकीत प्रथमच तब्बल ६०-६५ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. ते बहुतांशी भाजप-शिवसेनेच्या महायुतीचे उमेदवार आहेत. अर्थात, एक अपक्ष उमेदवारही बिनविरोध निवडून आला आहे. परिणामी, महायुतीला आधीच मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी या बिनविरोध निवडणुकीच्या नावाने अपप्रचार सुरू केला. भाजप-शिवसेनेने आपल्या अनेक उमेदवारांना बळजबरीने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा प्रचार सर्रास केला जात आहे. काही उमेदवारांनी या बिनविरोध निवडीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. खरेतर बिनविरोध निवडून येणे ही काही अपवादात्मक गोष्ट नाही. नगर पंचायत, नगरपालिका वगैरे कनिष्ठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेकदा काही उमेदवार बिनविरोध निवडून येतात.
 
क्वचित लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीतही अशी बिनविरोध निवड होत असते. गेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचा एक उमेदवार गुजरातमधून बिनविरोध निवडून आला होता. मात्र, यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपाचे काम सुरू होते. शिवाय, उमेदवार निवडीवरूनही तीव्र मतभेद होते. बंडखोर उमेदवारांचेही संकट होते. उमेदवारांनी घाईघाईने भरलेल्या अर्जात राहिलेल्या त्रुटींमुळे अनेकांचे उमेदवारी अर्ज फेटाळले गेले. नक्की कोणाला आपला अधिकृत उमेदवार निवडायचा, याचा निर्णय होऊ न शकल्याने विरोधकांचे उमेदवारच नियुक्त झाले नाहीत. उमेदवारी अर्ज फेटाळल्या गेल्याची अनेक कारणे आहेत. सत्ताधारी भाजपलाही मुंबईत आपल्या वाट्यातील चार जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. पण, जणू भाजपचे नेते विरोधकांच्या उमेदवारांचे अर्ज फेटाळीत असल्यासारखा अपप्रचार केला जात आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची कार्यपद्धती पाहून यावी.
 
मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वात मोठा अपप्रचाराचा मुद्दा म्हणजे, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायचे केंद्र सरकारने आखलेले षड्यंत्र. गेली २५-३० वर्षे याच एका मुद्द्यावरून भावनिक राजकारण करून शिवसेनेने महापालिकेत सत्ता मिळविली. या इतका हास्यास्पद अपप्रचार दुसरा नसेल. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले निम्मे भाषण याच मुद्द्यावर रेटले आणि उर्वरित भाषण उद्योगपती गौतम अदानींना मुंबई विकली जात असल्याच्या मुद्द्यावर ओढले. अदानींवरील आरोपांनी खरे ‘अडाणी’ कोण आहेत, त्याचे स्पष्ट दर्शन मुंबईकरांना घडले.
 
मराठी भाषेवर भावनिक आवाहन करणारे आणि हिंदीला विरोध करणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनीच नेमलेल्या ‘माशेलकर समिती’ने शालेय विद्यार्थ्यांना हिंदी व इंग्रजी भाषा सक्तीची करण्याची शिफारस केली होती आणि ती उद्धव ठाकरे यांच्या सरकारने स्वीकारलीही होती. आज फडणवीस यांनी केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार, महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची केली असून, इंग्रजीनंतर कोणत्याही भारतीय भाषेचा पर्याय ठेवला आहे. त्यामुळे मराठीबद्दल ठाकरे बंधूंचे प्रेम किती बेगडी आहे, तेच स्पष्ट होते.
 
मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांचे श्रेय घेण्यावरूनही अपप्रचार केला गेला. ‘कोस्टल रोड’ हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने उभा राहिला. या प्रकल्पाला लागणार्‍या सर्व पर्यावरणीय मंजुर्‍या फडणवीस यांनीच मिळविल्या. इतकेच नव्हे, तर आता या कोस्टल रोडचा विस्तार थेट विरारपर्यंत करण्यासही त्यांनी केंद्र सरकार व पर्यावरण खात्याची मंजुरी मिळविली आहे. पण, हा प्रकल्प आपण साकारल्याचे श्रेय ‘उबाठा’ सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बिनदिक्कत घेत आहेत. त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत या प्रकल्पाला विरोध करताना, त्यामुळे हजारो झाडे कापली जातील; असे म्हटले होते. तेव्हा हा ‘सागरी सेतू’ असून, समुद्रात झाडे नसतात; असे त्यांना समजाविण्यात आले. पण, उद्धव ठाकरे यांना या मार्गाचे श्रेय लाटण्याची इतकी घाई होती की, त्यांनी गुपचूपपणे या मार्गाचे भूमिपूजन केले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांना साधे निमंत्रण देण्याचेही औचित्य त्यांनी दाखविले नाही. कारण, हा श्रेय चोरण्याचा प्रकार असल्याने सारा ‘चोरीचा मामला’ होता.
 
आपला बराचसा अपप्रचार प्रभावी ठरत नसल्याचे दिसल्यावर मराठी आणि हिंदू असा भलताच फांदा मारण्याचा प्रयत्न करून मुंबईकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. ‘उबाठा’ सेना आता मुस्लीम मतदारांच्या मतांवर इतकी अवलंबून आहे की, या मतपेढीला खूश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘मुस्लीम महापौर’ बनविण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा फडणवीस यांनी, "मुंबईचा महापौर मराठी माणूस व हिंदूच असेल,” असे जाहीर करून उद्धव ठाकरेंचा दावा विफल ठरविला. तेव्हा मराठी माणूस हिंदू असतो का? फडणवीस हे हिंदू आहेत का? यांसारखे बालिश आणि तद्दन आचरटपणाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवाय, मुंबईतील मुस्लीम मतदारही एकगठ्ठा मतदान करणार नाही. मुस्लीम मतांमध्ये आता ओवेसी, समाजवादी पार्टी, काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक वाटेकरी आहेत.
 
याच उद्धव ठाकरे यांनी १९८६ मधील मुंबई दंगलीत सहभागी असलेला आरोपी रशीद मामू याला मोठ्या दिमाखात आपल्या पक्षात प्रवेश दिला. याच मामूने औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यास कायदेशीर विरोध केला होता. त्याने उघडपणे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या होत्या. याशिवाय, ‘उबाठा’ सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारफेरीत इब्राहिम मूसा हाही सहभागी झाल्याचे मुंबईकरांनी पाहिले. मूसा याच्यावर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शस्त्रास्त्रे पुरविल्याचा आरोप सिद्ध झाला असून, त्यासाठी तो दहा वर्षे तुरुंगातही होता. ज्यांनी जानेवारी १९९३ मध्ये राधाबाई चाळीच्या दरवाजांना बाहेरून कुलुपे लावून ती जाळली आणि त्यात अनेक निरपराध हिंदू मुंबईकर मरण पावले, त्यांच्या गळ्यात गळे घालून आज उद्धव ठाकरे मते मागत आहेत.
 
मुंबईकरांच्या सुरक्षिततेची काळजी व्यक्त करणारे ठाकरे बंधू या अशा गुन्हेगारांना आपल्याबरोबर घेऊन मुंबईकरांकडे मते मागण्याचा निर्लज्जपणा करीत आहेत. ही मुंबईकरांसाठी शेवटची निवडणूक असेल, हा त्यांचा दावाही असाच भंपक. मुंबईकरांसाठी नव्हे, तर या ठाकरे बंधूंसाठी ही महापालिका निवडणूक अखेरची असेल. कारण, त्यांच्या या वाटमारीच्या राजकारणाला मुंबईकर पुरते कंटाळले आहेत. तसेच मुंबईचा काल्पनिक नव्हे, तर वास्तवात विकास करणारे भाजपचे नेतृत्व लाभल्यावर या मुंबईची लूट करणार्‍यांना घरी बसविण्यातच मुंबईचे भले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0