आज मकरसंक्रांत. सूर्याचे दक्षिणायन संपूर्ण उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ होईल. असा हा निसर्गचक्राच्या दृष्टीने संक्रमणाचा काळ. तर आजच्याच या दिवशी, सदराचा समारोप करताना, निर्वसाहतीकरणाचा भारतीय सांस्कृतिक मूल्यांना अनुरूप असा व्यक्तिगत आणि संस्थागत पैलूंतूनही बदल घडविणे हीच खरी ‘वैचारिक संक्रांत!’
गेले वर्षभर आपण वसाहतवाद आणि निर्वसाहतीकरण या विषयाचे अनेक पैलू या लेखमालेच्या निमित्त अभ्यासत आहोत. २०२४च्या अखेरीस जेव्हा या लेखमालेचा विचार झाला, तेव्हा संपूर्ण एक वर्ष लिहिण्यासारखे विषय आपल्याकडे आहेत का? असा प्रश्न होता. एक वर्षाने थांबताना मात्र आपण ज्या-ज्या विषयांना स्पर्श केला, त्यांना पुरेसा न्याय देऊ शकलो का? असा विचार मनात येतो. हे सर्व लिहिण्यासाठी कोणती पुस्तके वाचतोस, अशी विचारणाही वाचकांकडून झाली. पण, खरेतर वाचलेल्या पुस्तकांपेक्षा वाचायला हवीत अशा पुस्तकांची एक भलीमोठी यादी या वर्षाअखेर तयार झाली आहे.
दुसरा एक प्रश्न सातत्याने अनेकांनी विचारला, तो म्हणजे, या वैचारिक वसाहतवादाचा विळखा समाजाभोवती कसा अजूनही बसलेला आहे, ते मी वर्षभर लिहिले. परंतु, यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता, याचे विवेचन फारसे आले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आजही सर्व जागतिक स्तराचे विचारवंत या प्रश्नाचा आवाकाच समजून घेत आहेत, तर त्यातून मार्ग सहजपणे कसा काढता येईल? तरीही, मागच्या व या लेखात मी भारताची यातील भूमिका काय असावी, याविषयी काही मत मांडले आहे. त्यातलाच एक छोटा प्रयत्न म्हणजे जानेवारी २०२६ मधील दोन लेख. निर्वसाहतीकरणावर लेखन करावे आणि ख्रिस्ती कालगणनेनुसार वर्ष संपल्यावर लेखमाला थांबवावी, ही आपल्याच भूमिकेशी विसंगती वाटली. त्यामुळे हिंदू परंपरेतील संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून दोन अजून लेख लिहून ही लेखमाला संपवावी, असा विचार मांडला आणि तो मान्यही झाला.
संक्रांतीचा सण तारखेनुसार नेमका येणारा एकच सण, हा त्याचा वेगळेपणा सर्वज्ञात आहे. इतर सणांप्रमाणे विशिष्ट तिथीला न येता, नेमक्या तारखेला संक्रांत का येते हे समजून घेण्यास हिंदू कालगणनेची थोडीशी माहिती आवश्यक आहे. आपली कालगणना ही ‘चांद्र’ आणि ‘सौर’ या दोन्ही भ्रमणांवर आधारित आहे. चांद्रगतीनुसार आपले महिने ठरतात, तर सौरगतीनुसार वर्ष. या दोन्हीत समन्वय बसावा म्हणून ‘अधिक मासा’ची योजना असते. यात अधिकची भर आहे पृथ्वीच्या स्वतःच्या गतीची, ज्यामुळे दिनमान ठरते. या तिन्ही गतींचा परस्परसंबंध लावताना जे फरक येतात, ते ‘अधिक तिथी’ आणि ‘क्षय तिथी’साठी कारणीभूत ठरतात. गती ही नेहमी कोणत्यातरी स्थिर वस्तूच्या सापेक्ष असते. कालगती किंवा ग्रहगतीतील स्थिर वस्तू म्हणजे नक्षत्रे. यातील मकर राशीत सूर्याचा होणारा प्रवेश म्हणजे मकरसंक्रांती. ‘ग्रेगोरियन’ कॅलेंडर हे केवळ सौरगती मोजत असल्याने ही सूर्यासंबंधीची खगोलीय घटना त्या दिनदर्शिकेनुसार विशिष्ट दिवशीच येते. याच दिवसाला ‘उत्तरायण’ सुरू होण्याचा दिवस, असेही समजले जाते. परंतु, पृथ्वीच्या अतिमंद परांचन गतींच्या प्रभावाने हा दिवस आजच्या कालगणनेत २२ डिसेंबर रोजी होऊन जातो.
परंतु, पाश्चात्त्य दिनदर्शिकेनुसार विशिष्ट दिवसालाच संक्रांत असणे, हा गुणधर्म निर्वसाहतीकरणाचे प्रकटन करण्यास महत्त्वाचा आहे. निर्वसाहतीकरण याचा अर्थ, काळाची चाके उलट फिरवणे असा असू शकत नाही. इतिहासाच्या प्रवाहात आज आपण जिथे उभे आहोत, तिथून आपल्याला पुढे जायचे आहे. मात्र, पुढे जाताना त्याचा आधार हा केवळ आपले सांस्कृतिक संचितच असू शकते. संक्रांतीचा सण हा त्या अर्थाने एक समन्वयाचा सण आहे. जेव्हा जगभरातील सर्वच मानवी समाज कृषिप्रधान होते, तेव्हा कालगणनेचा मुख्य उद्देश स्थानिक वातावरणानुसार ‘ऋतुगणना’ हा होता. म्हणूनच, भारतात सहा ऋतूंचे चक्र असताना युरोप-अमेरिकेत मात्र चार ऋतूंचे चक्र मानले जाते आणि भारतातील चांद्र-सौर कालगणनेच्या तुलनेत केवळ सौर कालगणना युरोपात पुरेशी ठरते. आधुनिक मानवाचे ऋतुचक्राशी नाते काय आणि त्यानुसार कालगणनेची पद्धती कोणती, याचा फेरविचार करण्याची आज आवश्यकता आहे. अशा मार्गक्रमणेस काही स्थिरबिंदू हवेत. संक्रांतीचा सण हा असाच एक जागतिक संस्कृतीचा स्थिरबिंदू ठरू शकतो.
संक्रांत सणाचे दुसरे वैशिष्ट्य ‘संक्रांति’ या शब्दाच्या अर्थात आहे. ‘संक्रांति’ म्हणजे ‘सम्यक क्रांती’. परिणामांची पर्वा न करता व्यवस्था उलथवून टाकत, अराजकता आणणारी ‘क्रांती’ आम्हाला नको आहे. वसाहतवादाने लादलेल्या व्यवस्था आम्हाला एका रात्रीत नाकारायच्या नाहीत. आम्हाला त्यांच्या अस्तित्वाविषयी विवेकाने निर्णय घ्यायचा आहे. आमचे संदर्भबिंदू आमच्या संस्कृतीत स्थिरावलेले आहेत. परंतु, त्यांच्या उपयोजनाच्या ज्या व्यवस्था लावायच्या, त्या काही अंशी पाश्चात्त्य व्यवस्थांशी समानधर्मी असू शकतात. गुरुकुले जाऊन इंग्रजी शाळा आल्या. पण, शिक्षक आणि विद्यार्थी या व्यवस्था कायम राहिल्या. कारण, त्या सर्व मानवी समाजांच्या व्यवस्था आहेत. त्या व्यवस्थांमध्ये रुजवायची मूल्ये कोणती, याचा विचार हा निर्वसाहतीकरणाकडे नेणारा आहे; पण ती मूल्ये रुजवायचे मार्ग कोणते, याविषयी काही कल्पना ‘संस्कृतिसंकरा’तूनही निघू शकतात.
क्रांती नाकारून संक्रांतीकडे जाणे, हे जागतिक निर्वसाहतीकरण सिद्धांतासाठीही पथदर्शी ठरू शकते. आजचे निर्वसाहतीकरणाचे सिद्धांतन काही अंशी साम्यवादी विचारातून आलेले आहे, हे आपण पाहिले. ‘क्रांती’ हा अशा सर्व विचारांचा स्थायीभाव आहे. परंतु, तो आपल्याला युरोपीय वैचारिक मुळापासून दूर स्वत्वाकडे नेत नाही. स्वत्वाच्या दिशेने मार्गक्रमणा करण्यास ‘क्रांती’पेक्षा ‘संक्रांती’चे तत्त्व अधिक उपयुक्त ठरेल.
निर्वसाहतीकरणाच्या संदर्भात संक्रांतीचे तिसरे महत्त्व म्हणजे संक्रांतीचा स्नेहभावाचा संदेश. संक्रांतीला वाटला जाणारा तिळगुळ कसा स्नेहाचे आणि ऐक्याचे प्रतीक आहे, ते सर्व जाणतात. परंतु, निर्वसाहतीकरणाच्या संदर्भातही हे एक आधारभूत तत्त्व ठरू शकते. पृथ्वीच्या पाठीवरील विविध मानव समूहांनी आज कालौघात आपापली एक विशिष्ट संस्कृती घडवली आहे. त्या-त्या समाजांना स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांच्या सापेक्ष जीवनरचना करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्याचबरोबर एक जागतिक मानवी समूह म्हणूनही आपली एक जबाबदारी आहे. परसंस्कृतींना जाचक अशी स्व-संस्कृतीतील मूल्ये प्रत्येकाला सोडावी लागतील. युरोपला आमचे तत्त्वज्ञान भोगाचेच आहे असे म्हणत, अमर्याद भोग घेता येणार नाही. या स्थितीच्या प्राप्तीसाठी सर्व जागतिक समाजांमध्ये परस्परसमादरभाव असणे आवश्यक आहे. याही अर्थाने पाहता, संक्रांतीचे परस्पर स्नेहाचे प्रतीक निर्वसाहतीकरणाच्या सिद्धांतनात अंतर्भूत करणे आवश्यक आहे.
दिशा आणि तत्त्वाची चर्चा कितीही केली, तरी व्यवहारात या विचारांचे अनुसरण कसे करावे? हा प्रश्न ‘वैचारिक संक्रांती’च्या संदर्भात उरतोच. आतापर्यंत पाहिले, तर प्रश्नाचे आकलन अधिकाधिक सुस्पष्टपणे करून घेणे आणि धोरणात्मकदृष्ट्या काही क्षेत्रांमध्ये त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश देणे (उदा. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण) या दोन प्रकारे या विषयावर प्रगती होताना आपल्याला दिसते. अशाप्रकारचे सामाजिक बदल जेव्हा अपेक्षित असतात, तेव्हा सामान्यतः सर्व उपायांची दोन प्रकारात विभागणी होते, ‘ऊर्ध्वगामी पद्धत’ (बॉटम-अप अॅप्रोच) आणि ‘अधोगामी पद्धत’ (टॉप-डाऊन अॅप्रोच). ऊर्ध्वगामी पद्धतीत जनसामान्यांकडून छोट्याछोट्या विषयांत भारतीय संस्कृतीला अनुसरून व्यवहारांची अपेक्षा असेल. आपल्या कुटुंबाच्या आणि परिचितांच्या पातळीवर असलेले व्यक्तिगत संबंध, आपल्या निवासी परिसरातील पर्यावरणाविषयी आपले दायित्व, आपल्या नागरी व्यवस्थांचा सुविहित वापर आणि त्याविषयी सजगता, आपल्या धार्मिक व सामाजिक उत्सवांचे उत्साहाने आणि त्याचबरोबर जबाबदारीने आयोजन आणि सहभागिता या सर्वांमध्ये आपले भारतीयत्व नेमके काय, त्याचा विचार करून त्याप्रमाणे व्यवहार हे व्यक्तिगत पातळीवरील निर्वसाहतीकरण असेल.
सामान्य व्यवहारातील भारतीयत्व जेव्हा अशाप्रकारे दिसून येऊ लागेल, तेव्हा त्याचे स्वाभाविकपणे विद्यापीठीय संशोधन प्रक्रियेत अधिक अध्ययन होऊन त्याविषयीचे गहिरे सांस्कृतिक चिंतन घडेल. या सर्वाचा परिपाक आपल्या समाजाच्या ज्या अर्थराज्यकारणादी विविध व्यवस्था आहेत, त्यांच्यावरही पडेल. अधोगामी पद्धती याविरुद्ध प्रकारे काम करेल. या पद्धतीने शासनव्यवस्था काही धोरणनिश्चिती करेल. या धोरणांतून भारतीयत्वाचे प्रतिबिंब असेल, जे हळूहळू शासनाद्वारे चालवणार्या संस्थांमध्ये दिसेल. स्वाभाविकपणे ते शिक्षण प्रक्रियेत उतरेल आणि त्या पद्धतीने शिक्षित समाज आपोआप निर्वसाहतीकरणाच्या दिशेने जाऊ लागेल.
परंतु, सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचे कार्य हे या किंवा त्या मार्गाने काही वर्षांत पूर्ण करण्याचे नाही. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की, हा एकप्रकारचा स्वातंत्र्यलढाच आहे. आजच्या परिभाषेत स्वातंत्र्यसंग्राम २.०. पहिल्या टप्प्यात आपण राजकीय-स्वातंत्र्य प्राप्त केले आणि त्या आनंदात अनेक दशके इतके रममाण झालो की, दुसर्या टप्प्याचा विसर पडला. त्यामुळे आता भान येऊन या दुसर्या टप्प्यासाठी सर्व समाजाने जोमाने काम करणे आवश्यक आहे. आपला मार्ग ऊर्ध्वगामी पद्धतीचा आहे की, अधोगामी पद्धतीचा त्याची चिंता वृथा आहे. संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक निर्वसाहतीकरण साधायचे असेल, तर एक प्रचंड व्यवस्थात्मक घुसळण अपरिहार्य आहे. त्यात काही प्रवाह अधोगामी पद्धतीने आपल्याकडे येतील, तर काही धारा ऊर्ध्वगामी पद्धतीने नवीन कल्पनाही वर घेऊन जातील. यापैकी कोणताही मार्ग त्याज्य नसेल. किंबहुना, आजच्या टप्प्यावर अशाप्रकारची कोणत्या तरी विशिष्ट मार्गाची निश्चिती केल्याशिवाय आम्ही मार्गक्रमणा करणार नाही, अशी भूमिका चुकीची ठरेल. आज सर्व प्रयत्न योग्य आहेत, स्वीकारार्ह आहेत. साध्य-साधन-विवेकाचा अवलंब करून चोखाळल्या जाणार्या सर्व दिशा पुढेच नेणार्या आहेत.
सरतेशेवटी वैचारिक स्वातंत्र्याच्या या परिवर्तनात जर कोणी केंद्रस्थानी आहे, तर ती म्हणजे व्यक्ती. एकात्म व्यक्तींचा एकसंध समाज बनतो आणि एकसंध समाजाच्या व्यवस्था आपोआप त्या समाजाच्या सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यांचे संवहन करणार्या बनतात. त्यामुळे आपल्या सर्व व्यवहारांत आपण जी तत्त्वे आधारभूत मानून आजपर्यंत वागत आलेलो आहोत, त्या सर्व मूल्यांची चिकित्सा करून ती आपल्या संस्कृतीशी समांतर आहेत का; हे पाहणे संपूर्ण समाजाचे कार्य आहे. ती जिथे नसतील, तिथे व्यवहारात कोणते लहान-मोठे बदल घडवून, ते भारतीय सांस्कृतिक मूल्यांना अनुरूप होतील हे व्यक्तिगत आणि संस्थागत अशा दोन्ही व्यवहारांत प्रत्येकाने तपासणे आणि त्याप्रमाणे वर्तन करणे आवश्यक आहे. अशा अनेक छोट्या; परंतु मूलगामी बदलांतूनच ‘वैचारिक संक्रांत’ घडू शकेल.
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून ‘खगोलशास्त्रा’त ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)