हा तर नारीशक्तीचा अपमान!

14 Jan 2026 11:04:22
Raj Thackeray
 
‘मुंबई विमानतळ ‘अदानी’ने ताब्यात घेतल्यानंतर त्याठिकाणी गरबा खेळण्यात आला. त्या माध्यमातून मराठीची ओळख पुसून टाकण्याचे काम करण्यात येत आहे. ही मुंबई आहे, वाजवायचे असेल तर ढोल आणि लेझीमच वाजली पाहिजे,” अशी आणखी एक असंबद्ध टीका परवा राज ठाकरे यांनी ठाण्यातील संयुक्त सभेत केली. यावेळी काही महिला मुंबई विमानतळावर गरबा खेळत असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओही त्यांनी दाखवला. त्यामुळे आता गरब्यासारख्या सण-उत्सवांवरूनही राज ठाकरे यांनी ‘मराठी विरुद्ध गुजराती’ अशा भाषिक संघर्षाला नवी फोडणी दिली.
 
खरेतर गरब्याच्या परंपरेला गुजरातीचा टॅग लावून संकुचित मनोवृत्तीच्या राज ठाकरेंनी त्यांच्याकडे प्रचारासाठी कोणतेही ठोस मुद्दे नसल्याचेच पुनश्च सिद्ध केले. गरबा हा केवळ गुजरातमध्येच नाही, तर नवरात्रीत देशभर खेळला जातो. गुजराती महिलाच नाही, तर मराठी महिला-भगिनीही गरब्याच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. गरब्याची परंपरा ही आताची नाही, तर वर्षानुवर्षे सुरू आहे. इतकेच काय, राज ठाकरेंच्या मनसेकडूनही यवतमाळमध्ये हा भव्य उत्सव आयोजित केला गेला होता. मग, राज ठाकरेंना आताच हा गरबा डोळ्यांत का सलू लागला? की, फक्त विमानतळ अदानींच्या व्यवस्थापनाचे असल्यामुळे तिथे मुद्दाम गरबा आयोजित केला, असे त्यांचे म्हणणे? खरेतर विविध आस्थापनांमध्ये सर्व धर्मियांचे सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रोत्सव असेल, गणेशोत्सव किंवा अगदी नाताळचा सणही विविध कंपन्यांमध्ये साजरा केला जातो. अशा वेळी त्या विमानतळावर कार्यरत काही महिलांनी चार क्षण आनंदासाठी गरबा खेळला, तर राज ठाकरेंच्या पोटात दुखायचे कारणच काय?
मुंबईत गरबाही खेळला जातो, भोंडल्याचेही कार्यक्रम होतात आणि हळदीकुंकूही तितक्याच उत्साहात आयोजित केले होते. मराठी महिलांच्या मनात ‘गरबा हा गुजरात्यांचा’ या भावनेने तर कधी स्पर्शही केला नसेल. मुंबईत तर अगदी लोकलमध्येही महिला गरब्याचा आनंद लुटतात. त्यामुळे राज ठाकरेंनी गरब्याचाच नव्हे, तर गरबा खेळणार्‍या तमाम महिलावर्गाचाच अपमान केला आहे. त्यामुळे १५ तारखेला महिला-भगिनी मतपेटीतून ‘मनसे’ची दांडीगुल केल्याशिवाय राहणार नाहीत.
 
आगरी-कोळ्यांना मानाचे पान
 
राज ठाकरेंना मुंबईच्या विमानतळावर काही महिन्यांपूर्वी महिलांनी खेळलेला गरबा सलला. पण, मागच्याच महिन्यात नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी तेथील आगरी-कोळी संस्कृतीचे घडलेले भव्य दर्शन त्यांच्या नजरेतून बहुधा सुटले असावे. खरेतर अदानींचे देशभरातील उद्योग नकाशावर मांडणार्‍या राज ठाकरेंच्या ‘रिसर्च टीम’च्या हे निदर्शनास येऊ नये, हा खरेतर त्यांचा सोयीस्करपणाच. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नवी मुंबई विमानतळ प्रवाशांसाठी खुले झाले. त्यावेळी ‘या कोळीवाड्याची शान...’ यांसारख्या आगरी-कोळी गाण्यांचे सूरच तिथे निनादत होते. एवढेच नाही, तर उद्घाटनावेळी आगरी-कोळी संगीताबरोबरच महाराष्ट्राच्या लोककलेतील लावणी, गोंधळ, ठेका अशा कलासंस्कृतीचेही तिथे समग्र दर्शन घडले.
 
ज्या आगरी-कोळी समाजाने विमानतळासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला यावेळी दिसून आला. त्यांना गौरविण्यातही आले. विमानतळ परिसराच्या आसपास आगरी-कोळी संस्कृती जतन करण्यासाठी एक सांस्कृतिक केंद्रदेखील ‘सिडको’ने बांधले आहे, ज्यात संग्रहालय, सभागृह आणि कला-प्रदर्शनाची सोय आहे. पण, नवी मुंबई विमानतळावरून टीकेची झोड उठवणार्‍या राज ठाकरेंनी यापैकी एकही व्हिडिओ बघितला नसावा अथवा यासंबंधीच्या बातम्या वाचल्या नसाव्यात, याचेच मुळी सखेद आश्चर्य वाटावे. ते म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी, तीच राज ठाकरेंची गत! मुळात निवडणुकीच्या काळात मतदारांची अशी जाणूनबुजून दिशाभूल करणे, अर्धसत्य दाखविण्याचे असे डावपेच खेळले जातात. राज ठाकरेंनीही मराठी माणसाच्या नावाखाली तोच कित्ता गिरवलेला दिसतो. राज ठाकरे यांना मराठी माणसापेक्षा स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच असा बागुलबुवा उभा करावा लागतो. भाषा, संस्कृती, सण-उत्सव हे लोकांच्या दृष्टीने भावनिक मुद्दे. म्हणूनच मग थेट लोकभावनांना हात घालून संभ्रमनिर्मितीचे बीज पेरायचे, हाच राज ठाकरेंसारख्या संधिसाधू राजकारण्यांचा स्वार्थी उद्योग. पण, महाराष्ट्रातील जनता, मराठी माणूस अगदी सुजाण आहे. तो अशा भाषिक आणि सांस्कृतिक ध्रुवीकरणाच्या ‘राज’कारणाला कदापि बळी पडणार नाही, हे १६ तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईलच!
 
 
Powered By Sangraha 9.0