मुंबई : (DMK MP Dayanidhi Maran) "तामिळनाडूमध्ये महिलांना शिक्षणासाठी आणि करिअरसाठी प्रोत्साहन दिले जाते, तर उत्तर भारतात महिलांनी फक्त स्वयंपाकघरात काम करावे आणि मुले जन्माला घालावी अशी अपेक्षा असते", असे विधान तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी केले आहे. चेन्नई सेंट्रलमधून चौथ्यांदा निवडून आलेल्या द्रमुक खासदार दयानिधी मारन यांनी कायद-ए-मिल्लत सरकारी महाविद्यालयात भाषणादरम्यान हे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
दयानिधी मारन यांच्या मते, "आपल्या राज्यातील मुली आत्मविश्वासाने फिरतात, हातात लॅपटॉप घेऊन फिरतात. त्या पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आणि मुलाखतींना उपस्थित राहताना दिसतात. तामिळनाडूतील मुलींमध्ये हा आत्मविश्वास निर्माण होतो कारण आपण त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो. पण उत्तर भारताचे काय? तिथल्या मुलींना, महिलांना कामावर जाऊ नका, घरीच राहा, स्वयंपाकघरात राहा, मुले जन्माला घाला, ते त्यांचे काम आहे, असे सांगितले जाते."
भाजप नेत्या अनिला सिंह म्हणाल्या, "मारन यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. ते विसरले आहेत की, ते भारतात राहतात आणि भारत शक्तीचे पूजन करतो. जर त्यांना वाटत असेल की ही शक्ती उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा भागांत विभागली जाऊ शकते, तर त्यांना आपली संस्कृती समजलेली नाही. मी त्यांना विचारू इच्छिते की, ज्या पक्षासोबत त्यांनी युती केली आहे त्या पक्षातील महिलांबद्दल म्हणजेच सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी वाड्रा किंवा आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे. हे फुटीरतावादी राजकारण चालणार नाही."