धारणीय वेग क्रोध ( भाग ९ )

13 Jan 2026 12:26:32
Anger
 
क्रोधाबद्दल सविस्तर विचार मागील तीन लेखांमधून आपण वाचला. आपल्या अतिरिक्त रागावर, क्रोधावर नियंत्रण कसे मिळवावे, याबद्दल सविस्तर आज जाणून घेऊया...
 
क्रोधाची अनेक कारणे असतात, हे आपण आधीच्या भागांमधून वाचले आहे. ही कारणे काही वेळेस स्वतःमधील ‘अंडरलाईंग’ पूरक गोष्टींमुळे उद्भवतात. ‘अंडरलाईंग फॅक्टर्स’मध्ये काही शारीरिक कारणे (लागणे, पडणे, दुखापत होणे, भूक लागणे), काही मानसिक, भावनिक व्यथा (भीती, निराशा, पराभव, चौर्य इ.) काही वेळेस आर्थिक ताण तर काही वेळेस नातेसंबंधांमधील ताण-दुस्वास, अविश्वास, एकटेपणा अशा विविध कारणांनी शरीराची, मनाची प्रतिक्रिया म्हणून राग उत्पन्न होतो. ज्या कारणाने राग येतो, ते मूळ कारण नाहीसे करणे, शमविणे, त्यावर मात करणे ही पहिली चिकित्सेची पायरी आहे. म्हणूनच ‘अंडरस्टॅण्डिंग द अंडरलाईंग कॉज’ हे महत्त्वाचे आहे.
 
दर वेळेस-बहुतेक वेळेस एकाच कारणाने राग (क्रोध) ट्रिगर होत असेल, तर तो धोक्याचा बिंदू लक्षात ठेवून लक्षपूर्वक तिथपर्यंत पोहोचणे टाळावे. उदा. भुकेमुळे पोटात खड्डा पडून जीव कासावीस होऊन चिडचिड होत असेल, आदळआपट होत असेल, आरडाओरडा केला जात असेल, तर उपाशी खूप वेळ राहणे टाळावे. जे जे ट्रिगर पॉईंट्स आहेत, ते प्रत्येकाचे सारखेच असतील असे नाही. प्रत्येकाने आपला ट्रिगर पॉईंट ओळखावा आणि वेळीच त्याला आवरावे. कारण, राग जेव्हा ‘अ‍ॅक्शन’ नसून ‘रिअ‍ॅक्शन’ असते, ती ‘रिअ‍ॅक्शन’ आणि त्या ‘रिअ‍ॅक्शन’ची तीव्रता ही आपल्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणात राहात नाही.
 
क्रोधाची शरीरामध्ये आणि शरीरावर विविध पद्धतीने प्रचिती होते. भुवया उंचाविणे, फ्रॉन करणे, कान (कानशिले तापणे, लाल होणे इ. दृश्यबदल दिसू शकतात. अस्वस्थ (रेस्टलेस होणे), शॅलो ब्रीदिंग, अति हालचाली या दरवेळेस क्रोधामुळेच उत्पन्न होतात, असे नाही. त्यामुळे हे बदल कशामुळे आहेत, हे चटकन लक्षात येत नाही. अतिक्रोध असतेवेळी बरेचदा अति बोलणे, भांडणे, टोमणे मारणे, भांडण उकरून काढणे, शिवीगाळ करणे, समोरच्या व्यक्तीला हाणामारीसाठी प्रवृत्त करणे असे केले जाते. पण यामुळे राग नियंत्रित न होता, त्यामुळे क्रोधाची रुद्रावस्था उत्पन्न होऊ लागते.
 
म्हणून, राग येतोय असे जाणवू लागले की, खालीलपैकी काही उपाय अवलंबावे. सर्वांत प्रथम उलटे अंक मोजणे. थोड्या धीम्या गतीने मोजावे; पण मोठ्या आवाजात मोजावे. असे दोन-तीन वेळा करावे. यामुळे मनातील विचार या कृतीत गुंततात आणि रागाची तीव्रता कमी होऊ लागते. मन शांत झाले की (चिडचिड थोडी कमी झाली) की मोजणे थांबवावे.
 
अजून एक उपाय म्हणजे तोंडाने जोरात श्वास सोडावा. पुन्हा दीर्घ श्वास घ्यावा आणि जोराने तोंडावाटे सोडावा. यामुळे, क्रोधामुळे शरीरात जो ताण उत्पन्न झालेला असतो, स्नायू जे ताणलेले असतात, ते शिथील होऊ लागतात, रिलॅक्स होऊ लागतात. हा शारीरिक ताण कमी झाल्यास रागाची, क्रोधाची तीव्रताही आपसूकच कमी होऊ लागते.
 
राग आलेला असताना शरीरात रजोगुण वाढतो, त्याला कृतिशीलता, कार्यशीलता लागते, स्वस्थ बसून ध्यान करणे, नामजप करून क्रोधाला नियंत्रित करणे, आटोक्यात आणणे हे अत्यंत मुश्कील आहे. (जवळ जवळ) अशक्यच आहे. अशा वेळेस ‘कन्स्ट्रक्टिव्ह मूव्हमेंट्स’ असाव्यात. शारीरिक हालचालींनी शरीरात जो ताण आलेला असतो, जी अतिरिक्त ऊर्जा उत्पन्न झालेली असते, ती वापरून कमी होते. ‘डिस्ट्रक्टिव्ह माईंडसेट’मधून हळूहळू मन बाहेर येऊ लागते. यासाठी चालणे, थोडा व्यायाम, शारीरिक हालचाल, चढणे-उतरणे, नृत्य करणे, झूम्बा इ. लयबद्ध हालचाल इत्यादींचा अवलंब करावा. खूप जोशाने, जोमाने, अतिरेकी हालचाल अपेक्षित नाही; पण शरीरातील वाढलेली ऊर्जा सकारात्मक गोष्टींमध्ये वापरणे, हाच त्यामागचा उद्देश होय. अतिक्रोध असतेवेळी फुगे फुगविणे, उलटे चालणे, उलटे धावणे, भ्रामरी करणे, शीतली करणे, मनात एखाद-दुसरा सकारात्मक विचार आणणे आणि धरून ठेवणे, दुसर्‍या कार्यात मग्न होणे इ. गोष्टी कराव्यात. खूप राग असतेवेळी शरीराच्या नियमित हालचाली ज्या व्यायामसमयी अपेक्षित आहेत, त्या होतीलच असे नाही. अशा वेळेस केवळ थोड्या उड्या मारणे किंवा चालणे करावे. चुकीचा व्यायाम टाळावा.
 
काही वेळेस रागामुळे ओरडायचे असते. पण, स्वतःला व्यक्त करता येत नाही (पब्लिक प्लेसेस, लग्न-समारंभ, प्रवास इ.) अशा वेळेस उशी तोंडाशी धरून त्यात ओरडावे किंवा गाणी म्हणावीत, जेणेकरून मन थोडे क्रोधाच्या कारणामधून बाहेर पडेल, विचालित होईल. भिंतीवर जोर देणे (हलवायचा प्रयत्न केल्यासमान करावे.) खुर्चीत बसून, तीच खुर्ची खाली दाबल्यासारखी करावी, जोर लावावा. यामुळे अतिरिक्त नकारात्मक ऊर्जा शरीरात जी उत्पन्न होते, त्याचा व्यय होतो आणि मन क्रोधमुक्त होण्यास मदत होते. हे काही उपाय सोप्या पद्धतीने त्वरित क्रोधावर आवर घालण्यात उपयोगी ठरतात.
 
श्वसनावर नियंत्रणासाठी केवळ दीर्घ श्वसन न करता, उदरश्वसन करावे किंवा अंक मोजत दीर्घ श्वसन करावे किंवा व्हिज्युअलायजेशन करत श्वसन करावे. शरीरातील विविध गतींवर (श्वास, हृद्, नाडी इ.) लक्ष केंद्रित करून श्वसन करावे. या सगळ्यामुळे विचारांच्या गतीवरही सकारात्मक परिणाम होतो आणि गति (अति) शमू लागते. घालमेल कमी करण्यासाठी एका जागी हलक्या उड्या मारणे, भिंतीवर जोर लावून भिंत ढकलल्यावत करणे, बाऊन्सी बॉलवर बसून बाऊन्स होत राहणे किंवा खुर्चीवर बसून खुर्ची खालच्या दिशेने दाबणे किंवा स्माईली बॉल हाताने दाबत राहणे. शरीरिक हालचालींमध्ये पी.टी.चे व्यायाम (सूक्ष्म व्यायाम) थोड्या जलद गतीने करणे किंवा उशीला ठोसे मारणे इ. छोटे, पण प्रभावी उपाय तत्क्षणी क्रोधाला आवर घालण्यास उपयोगी सिद्ध होतात. हाताची मुठी करून ती मूठ जोराने दाबणे.
 
काही वेळेस आपल्याला कळते की इतरांची चूक आहे, पण रागाने मी अधिक नुकसान करवू शकते, (बोलून दाखविल्यास) अशा वेळेस क्रोध थोडा शमला की लिहून टाकावे आणि फाडून टाकावे किंवा जाळून टाकावे. मनातील सर्व राग, उदासीनता, हताशपणा इ. भावना अशाच पद्धतीने शब्दस्वरूपात (वाचिक वमन केल्यासारखे) लिहून टाकावे, मन मोकळे करावे. नकारात्मक भावानांचे ओझे दीर्घ काळ बाळगू नये. शांत असतेवेळी स्वतःच्या मनाशी संवाद साधून रागाच्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा व तसे आचरणात बदल करावेत. रोज किमान दहा मिनिटे ध्यान करण्यास बसावे. मनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा. आपल्या विचारांमध्ये अधिक गुंतू नये. विचारांना ढगासमान बघावे. एक ढग आकाशातून पुढे सरकला की दुसरा ढग त्याची जागा आकाशात घेतो. आधीच्या ढगाची कुठलीच चिन्हे राहात नाहीत. मनातील नकारात्मक भावनांना ही असेच दूर करावे. त्यात गुंतत जाऊ नये.
 
आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये काही आहारीय ते विहारीय बदल काही शोधन चिकित्सा काही शमन चिकित्सांचा अवलंब करावा. त्यामुळे रागावर उत्तम नियंत्रण मिळविता येते. पण, सर्व उपाय वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच आचरावेत.
 
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0