महात्मा बसवेश्वरांच्या विचारांसाठी...

13 Jan 2026 11:32:57
Danesh Timshetti
 
महात्मा बसवेश्वरांचे समरस विचार समाजात रुजण्यासाठी आयुष्यभर कार्य करण्याचे ध्येय ठरवलेले दानेश तिमशेट्टी. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
सुख-दुःख, आशा-निराशा यांचा संगम म्हणजेच आयुष्य. या आयुष्यात प्रतिकूलतेवर मात करत ध्येय पूर्ण करणारे खूपच कमी असतात, त्यापैकी एक दानेश तिमशेट्टी. ‘एस फॉर एस इंजिनिअरिंग सोल्युशन’ ही त्यांची कंपनी. ते चिंचवडचे एक यशस्वी उद्योजक. समरस समाजासाठी त्यांचे कामही वाखाणण्यासारखे आहे. ते हिंदू वीरशैव लिंगायत मंच, प्रांत सहसंयोजक असून, निगडीचे मल्लिकार्जुन मंदिर आणि ‘बसवेश्वर पुतळा समिती’चे ते सक्रिय सदस्य आहेत. महात्मा बसवेश्वरांच्या विचारकार्यावर काम करणारे दानेश तिमशेट्टी यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. प्रत्येक वेळी त्यांनी संघर्ष केला आणि परिस्थितीवर मात केली.
 
लिंगायत समाजाचे शिवप्पा तिमशेट्टी आणि गुरू सिद्धवा हे मूळचे कर्नाटक- विजापूरचे कुटुंब. उभयतांना ११ अपत्ये. त्यांपैकी एक दानेश. तिमशेट्टी कुटुंब खाऊन-पिऊन सुखी कुटुंब. शिवप्पा यांचे गावात भुसारीचे दुकान. शेतकर्‍यांकडून धान्य-कडधान्य घेऊन ते बाजारपेठेत विकायचे. सचोटीने ते व्यवसाय करत. संसार सुखाचा होता. मात्र, १९९२ साली शिवप्पा यांना काही व्यापार्‍यांनी फसवले. त्यांच्याकडून शेतकर्‍यांचा माल घेतला; पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. शिवप्पांना शेतकर्‍यांना पैसे द्यावे लागणार होते. त्यामुळे शिवप्पांनी व्यापार्‍यांकडे पैसे मागितले. त्या फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांनी शिवप्पा यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. शिवप्पा कसेबसे निसटले. शेतकर्‍यांना पैसे द्यायलाच हवे, या विचारांनी शिवप्पा यांनी कष्टाने खरेदी केलेली जमीन विकली. त्यातून आलेल्या पैशातून शेतकर्‍यांचे देणे भागवले. या सगळ्या गदारोळात भुसारी व्यवसाय बंदच झाला होता. त्यांनी किराणा मालाचे दुकान काढले, त्यावेळी घराची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूकच झाली होती. आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी संपूर्ण तिमशेट्टी कुटुंब अखंड राबू लागले. पंचक्रोशीत पुन्हा तिमशेट्टी कुटुंबाचे दुकान प्रथम क्रमांकावर होते. या सगळ्या घटना दानेश अनुभवत होते. शाळा, अभ्यास, दुकान आणि पडेल ती कामे करणे, यात त्यांचा दिनक्रम व्यस्त होता.
 
त्यांनी दहावीनंतर ‘टूल अ‍ॅण्ड डायमेकिंग’ या क्षेत्राचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. या कालावधीमध्येच त्यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. कोणतेही काम करताना त्याने समाजाचे भले व्हायलाच हवे, हा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये विकसित झाला. पुढे प्रशिक्षण घेतल्यानंतर शिकाऊ उमेदवार म्हणून ते पुण्यात आले. उमेदवारीचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांनी एका व्यक्तीबरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. यामध्ये अट अशी होती की, भागीदाराने दानेश यांना जागा आणि मशीन दिली, त्याबदल्यात दानेश त्यांना ठरावीक रक्कम देतील. दानेश यांनी भरपूर मेहनत केली. व्यवसाय नावारूपाला आला. हे पाहून भागीदाराचे मन बदलले. त्याने शिवप्पाला सांगितले की, आता आम्ही जागा आणि मशीन देऊ शकणार नाही, आम्हीच व्यवसाय करणार.
 
मग, शिवप्पा यांनी स्वतः एकट्याने व्यवसाय करायचे ठरवले. २००४ साल होते ते. त्यांनी पुन्हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पण, यादरम्यान त्यांची उठबस पुण्यातील राजकीय आणि सामाजिक लोकांसोबत होऊ लागली. तसेच लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, हिंदू धर्माचा भाग नाही; असे म्हणणार्‍या लोकांनी त्यांना शोधून काढले. महात्मा बसवेश्वरांचे नाव घेतात म्हणून दानेश त्यांच्या सोबत राहू लागले. पण, काही दिवसांतच त्यांना कळले की, हे लोक लिंगायत समाजाला हिंदूंपासून वेगळे मानत आहेत. तसेच हिंदू देवदेवतांबद्दलही यांचे विचार आक्षेपार्ह आहेत. दानेशमधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक त्यांना स्वस्थ बसू देत नसे. त्यामुळे ते लिंगायत समाजात हिंदूविरोधी फूट पाडणार्‍यांची मते खोडू लागले. सत्य काय आहे, ते मांडू लागले.
 
या काळात त्यांनी व्यवसाय सोडून गावी जाण्याचाही निर्णय घेतला. पण, त्यांचे बाबा म्हणाले, "जो निर्णय घेतला, तो अर्धवट सोडणार का? परत शहरात जा आणि स्वतःला सिद्ध कर.” दानेश पुन्हा चिंचवडला आले. व्यवसायासाठीचे सर्वप्रकारचे ज्ञानकौशल्य आत्मसात करण्यासाठी ते संबंधित क्षेत्रात नोकरी करू लागले. याच काळात त्यांचा विवाह ज्योती यांच्याशी झाला. ज्योती यांनी दानेश यांना सर्वच स्तरावर साथ दिली. २०१७ सालापर्यंत सारी कौशल्ये, संबंधित भांडवल जमवून आपला व्यवसाय उभारायचाच, हा त्यांनी निश्चय केला. २०१३च्या दरम्यान ते पुन्हा चिंचवडच्या रा. स्व. संघाशी जोडले गेले. अतुल लिमये, अण्णा वाळिंबे, हेमंत हरहरे या रा. स्व. संघाच्या ऋषितुल्य व्यक्तींचे त्यांना मार्गदर्शन लाभले. दानेश म्हणतात, "यापुढेही महात्मा बसवेश्वरांचे समरस समाजाचे कृतिभान असलेले विचार समाजात सर्वार्थाने पोहोचावेत, यासाठी मी कार्य करणार आहेत.” महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत, यासाठी काम करणार्‍या दानिश यांच्या कार्याला शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0