धरणांच्या वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा दुटप्पीपणा

13 Jan 2026 15:13:11
Aditya Thackeray
 
मुंबई : ( Aditya Thackeray ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी शिवतीर्थावर पार पडलेल्या सभेत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण निर्मितीचे श्रेय घेतले. मात्र, हे श्रेय घेताना नव्याने बांधण्यात येणाऱ्या गारगाई धरणाच्या विरोधाबाबतचा ठाकरेंचा दुटप्पीपणा समोर आला आहे. गारगाई धरणामध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत विरोध करणाऱ्या ठाकरेंना मध्य वैतरणा धरण निर्मितीवेळी तोडल्या गेलेल्या दीड लाख वृक्षांचा विसर पडला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात २०१४ साली मध्य वैतरणा धरण बांधले. हे धरण १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली या धरणाच्या जलाशयाचे नाव 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण' असे केले. या धरणासाठी ६३४ हेक्टर वनक्षेत्र वळते करण्यात आले होते.
 
तसेच दीड लाख झाडे तोडण्यात आली होती. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समर्थन आदित्य ठाकरे आता महापालिका निवडणूकीच्या प्रचारादरम्यान करत आहेत. मात्र, याच वेळी ते फडणवीस यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत मुंबईसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या गारगाई धरणाला वृक्षतोडीच्या मुद्यावरून विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत मध्य वैतरणा धरण निर्मितीचे श्रेय घेणारे ठाकरे त्यावेळी झालेल्या वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहेत. थोडक्यात मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणासंदर्भात दुटप्पी भूमिका घेत आहेत.
 
हे वाचलत का? - Devendra Fadnavis: प्रचाराचा आज शेवटचा दिवस; नागपुरात भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्रीही बाईक रॅलीत सहभागी
 
गारगाई धरणामुळे तानसा वन्यजीव अभयारण्याचे मोठ्या प्रमाणावरील वनक्षेत्र बाधित होईल, असा एक प्रचार सुरू आहे. गारगाई धरणामुळे तानसा वन्यजीव अभयारण्याचे साधारण ६५० हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली बुडित क्षेत्र म्हणून जाईल. मात्र, ५५० हेक्टर क्षेत्र हे तानसा अभयारण्यात नव्याने समाविष्ट केले जाईल. ते कसे तर, गारगाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणासाठी सहा गावांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यातील प्रामुख्याने चार गावांच्या पुनर्वसनामुळे ५५० हेक्टर क्षेत्र उपलब्ध होईल. हे क्षेत्र गावातील शेतीसाठी वापरात येणाऱ्या जमिनीचे आणि मालकी जागेचे असेल.
 
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील दोन उंचवट्याचे भाग हे बेटांच्या स्वरुपात पाण्याबाहेरील येतील. हे सर्व क्षेत्र तानसा वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट करण्यात येईल. त्यामुळे केवळ साधारण १०० हेक्टर क्षेत्रच या धरणामुळे बाधित होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, गावांच्या पुनर्वसनामुळे अभयारण्य हे निर्मनुष्य होईल. धरण प्रस्तावित असलेल्या क्षेत्रामधून सद्यस्थितीत एक राज्यमार्ग सुर्यमाळच्या दिशेने जातो. सुर्यमाळ हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या रस्त्यावरुन त्याठिकाणी जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. धरणामुळे हा महामार्ग अभयारण्यातून बाहेर काढून दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येईल. परिणामी अभयारण्यातील मानवी वावर कमी होईल आणि वन्यजीवांच्या वावरासाठी जागा निर्माण होईल. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प असो वा केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान, या दोन्ही ठिकाणी धरण आणि धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. मात्र, धरणामुळेच जंगलाचे संवर्धनही झाले आहे आणि त्याला सुरक्षा देखील मिळाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0