अन्न हेच पूर्णब्रह्म!

12 Jan 2026 12:35:41

कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी...‌’ हे आपण अनेकदा ऐकलं आहे. एकूणच, विश्वामध्ये जो पसारा निर्माण झाला, त्याच्या मूळाशी पहिले पोट आहे. दोनवेळेचे जेवण ही काही लोकांची दिनचर्या आहे, तर काहींसाठी पर्वणी. एकाचवेळेला जगाच्या एका टोकाला ताटामध्ये ढिगभर अन्न टाकणारी माणसं दिसतात, तर दुसऱ्या टोकाला पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावरच्या शिळ्या अन्नाचासुद्धा लिलाव होतो. या दोन्ही गोष्टी एकाच जगामध्ये (तर काही वेळेला एकाच देशामध्ये) घडतात, ही क्रूर शोकांतिकाच. प्रगतीची नवनवीन शिखरं गाठणाऱ्या मनुष्यप्राण्याला, त्याच्याच बांधवांच्या भूकेवर जालीम उपाय काढता आलेला नाही. पोटासाठी खायचं आहे, हे तर ठरलं. मात्र, आता त्याच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, काय खायचं? कसं आणि कधी खायचं? रानभाज्या, पालेभाज्यांवर दिवस काढणाऱ्या मनुष्याच्या ताटामध्ये आता असंख्य पदार्थ उपलब्ध झाले आहेत.

जागतिकीकरणाच्या रेट्यात खाद्यसंस्कृतीचीही देवाण-घेवाण झाली. इटलीचा पिझ्झा भारतीयांच्या ताटात आला, तर दुसरीकडे मुंबईचा वडापाव लंडनला गेला. एकाचवेळेला माहितीचा भडीमार आणि पदार्थांचे आकर्षण यांतून सैरभर होण्याची पाळी आली आणि जंक फूडवर पोसली जाणारी पिढी वाढू लागली. बघता बघता विकसित देशांपासून ते बेटाएवढ्या राष्ट्रांपर्यंत, लठ्ठपणा ही समस्याही जन्माला आली. त्याच्च्यबरोबरीने मधुमेह, कर्करोग अशा अनेक समस्यांचाही विळखा लोकांना बसू लागला. मध्यंतरी काही संशोधकांच्यामते, लठ्ठपणाची व्याख्या जर का बदलली, म्हणजचे बरोबर कंबरेचे मोजमाप सुद्धा ग्राह्य धरले, तर अमेरिकेतील 70 टक्क्यांहून अधिक नागरिक या कक्षेत येतील. आता जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशामधल्या नागरिकांची ही अवस्था असेल, तर इतर देशांमधील लोकांविषयी विचारायलाच नको. हे वास्तव लक्षात आल्यावर, तिथली शासनयंत्रणा शांत थोडीच बसणार! डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वामध्ये ज्याप्रकारे अनेक गोष्टींचा निकाल लागला आहे, त्याचप्रकारे या समस्येवरसुद्धा आता त्यांनी तोडगा काढला आहे.

ट्रम्प प्रशासनाने दि. 7 जानेवारी रोजी अमेरिकेच्या नागरिकांसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वं प्रकाशित केली. ‌‘हेल्थ ॲण्ड ह्युमन सर्विसेस‌’ विभागाचे सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर आणि कृषी सचिव ब्रूक रोलिन्स यांच्या नेतृत्वामध्ये, ही तत्त्वं प्रसिद्ध करण्यात आली. ‌‘मेक अमेरिका हेल्दी अगेन‌’ हा विचार यामधूनच स्पष्ट झाला.. या मार्गदर्शक तत्त्वांचं वैशिष्ट्य असं की, 2011 साली अमेरिकेत राबवलेली ‌‘मायप्लेट‌’ ही संकल्पना रद्द करून, त्या जागी ‌‘फूड पिरॅमिड‌’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. ‌‘मायप्लेट‌’ या संकल्पनेंतर्गत वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन, ऑनलाईन कॅलक्युलेटरच्या माध्यमातून एक व्हिज्युअल प्रारुप तयार केले जात असे. ज्यावरून कुठल्या अन्नाचे सेवन करणे शरीरासाठी पोषक आहे, याबद्दलही मार्गदर्शन केले जाई.

मात्र नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रथिनांच्या सेवनामध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. शरीराच्या वजनाच्या प्रतिकिलोग्रॅम 1.6 ग्रॅम प्रथिनांचे सेवन करण्याचे यामध्ये नोंदवण्यात आले आहे. ‌’संतृप्त चरबी‌’ म्हणजेच ‌’सॅच्युरेटेड फॅट्स‌’विरोधात आरोग्य विभागाने आघाडीच उघडल्याचे दिसून येते. प्रक्रिया केलेले अन्न जसे की ‌‘रेडी-टू-इट‌’ फूड पदार्थ अमेरिकेतील नागरिकांनी टाळावेत, अशी सूचना पहिल्यांदाच करण्यात आली.त्याचबरोबर, उत्तम आरोग्यासाठी मद्यपान कमी करण्याचा सल्लाही देण्यात आला. गरोदर महिलांनी मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहावे, असे सुद्धा सांगण्यात आले आहे. ‌‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन‌’सह अनेक संघटनांनी, या मार्गदर्शक तत्त्वांचे स्वागत केले आहे. ही आहारपद्धती कुठल्याही दुसऱ्या राष्ट्रासाठी, समूहांसाठी तंतोतंत लागू होणार नाही मात्र, नागरिकांचे स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल, तर याचा विचार लवकरच इतर देशांनासुद्धा करावा लागेल, यात शंका नाही. काळाच्या ओघात अपेक्षेप्रमाणे, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. सातत्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे नवनवे आजार, आपल्या शरीरामध्ये घर करू लागले आहेत. मग आजारानंतर औषधांचा खर्चही आलाच. अशा परिस्थितीमध्ये ‌‘अन्न हेच पूर्णब्रह्म‌’ आहे, हा विचार या मार्गदर्शक तत्त्वांच्या निमित्ताने समाजात रुजण्याची गरज आहे, याचा विसर पडता कामा नये.

Powered By Sangraha 9.0