स्वामी विवेकानंदांचे विचारविश्व भारतीय अध्यात्म, विज्ञाननिष्ठता आणि राष्ट्रभावनेचा तेजस्वी संगम आहे. ‘उठा, जागे व्हा’ या त्यांच्या घोषणेने सुप्त क्षमतांना चेतना देणारा नवा युगविचार जन्माला आला. भारताचे ध्येय जगाला मानवतेचा संदेश देणे आहे, हा त्यांचा अखंड विश्वास होता. शिक्षण, युवकजागरण, स्त्रीशक्ती, सामाजिक सुधारणा आणि सेवा-कार्य या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारी दृष्टी दिली. जगभर हिंदू संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवताना त्यांनी मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा संदेश अधोरेखित केला. आज त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी विचारमूल्यांचे चिंतन करणारा हा लेख...
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दि. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात, भगवान शिवाच्या कृपाशीर्वाद प्राप्त परिवारात झाला. त्यांचे वडील विश्वासनाथ दत्त प्रख्यात विधिज्ञ होते, तर आईचे नाव भुवनेश्वरीदेवी होय. लहानपणी विवेकानंदांचे नाव ‘नरेन्द्रनाथ दत्त’ असे ठेवण्यात आले असले, तरीही घरातील मंडळी प्रेमाने त्यांना ‘विले’ किंवा ‘नरेन’ अशीही हाक मारत. आध्यात्मिक साक्षात्काराचा क्षण त्यांच्या जीवनात आला, तो स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यातच. परमहंसांनी दिलेल्या दीक्षेनंतर प्रारंभी त्यांनी ‘विविदिषानंद’ हे नाव धारण केले; मात्र पुढे जगभर परिचित ते झाले ‘स्वामी विवेकानंद’ याच नावाने. कुशाग्र बुद्धिमत्ता, युवक कल्याणाची ओढ, समाजोन्नतीची जाणीव, शिक्षणसुधारणेची आकांक्षा, धर्मप्रचाराची दृष्टी आणि समरसतेचा अखंड संदेश या सर्व गुणांचा संगम, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवत असे. भारतीय युवकांमध्ये स्वाभिमान, राष्ट्रभान आणि जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात विवेकानंदांना दिले जाते. भारतीय युवकांमध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याच प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे, ब्रिटिशांच्या दास्यत्वातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक तरुणांनी स्वतःचे आयुष्य स्वातंत्र्याच्या यज्ञात अर्पण केले. जगभरात त्यांची कीत अमर झाली, ती दि. 11 सप्टेंबर 1893 रोजी, शिकागो येथे झालेल्या ‘विश्वधर्म परिषदे’तील त्यांच्या ऐतिहासिक भाषणामुळे. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊनच, भारत सरकारने 1984 पासून त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
क्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेत पोहोचल्याच्या 400 वर्षांच्या स्मरणार्थ, त्यावेळी अमेरिकेच्या शिकागो शहरात विश्वधर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमागील मूळ हेतू होता, गत चार शतकांतील भौतिक प्रगतीचे जगासमोर प्रदर्शन करणे आणि त्याचबरोबर ख्रिस्ती धर्माचा जागतिक विस्तार तसेच त्याची श्रेष्ठता सिद्ध करणे. यानिमित्ताने मिशिगन सरोवराच्या चारही बाजूंनी एक अभूतपूर्व आणि विशाल प्रदर्शनी उभारण्यात आली होती. तब्बल 494 किमीपर्यंत पसरलेल्या या सरोवराच्या परिसरात साकारलेली ही प्रदर्शनी लाखो लोकांनी पाहिली. या भव्य कार्यक्रमातील सर्वांत उल्लेखनीय क्षण ठरला, तो विश्वधर्मसभेअंतर्गत स्वामी विवेकानंद यांचे संक्षिप्त पण प्रभावी भाषण. या भाषणातून भारताचा धर्म, त्याची तात्त्विक परंपरा, विचारधारा आणि भारतवासीयांनी जगाप्रति जपलेला उदात्त व्यवहाराचे दर्शनही संपूर्ण जगाला झाले. स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी विचारांमुळे हिंदू धर्म जागतिक पटलावर पुन्हा स्थापित झाला आणि त्याबरोबरच स्वामी विवेकानंददेखील जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले. या भाषणानंतरच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी, स्वामी विवेकानंदांचा छायाचित्रासह गौरवपूर्ण उल्लेख केला. यामध्ये अमेरिकन समाजाने त्यांना दिलेल्या ‘माँक ऑफ हिंदू धर्म’, अर्थात ‘हिंदू धर्माचा संन्यासी’ या उपाधीचाही विशेष उल्लेख करण्यात आला होता. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणात हिंदू धर्मातील मूलभूत तत्त्वे अत्यंत प्रांजळ आणि प्रभावी शब्दांत मांडली. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अर्थात संपूर्ण विश्वालाच एक कुटुंब मानण्याचा भारतीय दृष्टिकोन हा हिंदू धर्माचा प्राण आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. सहिष्णुता ही फक्त एक नैतिक बाब नसून, विविध मार्गांनी पुढे जात असले, तरी सर्व सत्य एकाच ध्येयापर्यंत पोहोचते, ही हिंदू धर्माची अद्वितीय दृष्टी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जगातील सर्व विचारप्रवाहांना आश्रय देण्याची हिंदू धर्माची वृत्ती हे त्यांच्या भाषणाचे सार होते. आपल्या विचारांना अधिक दृढ करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी सभागृहात संपूर्ण मानवतेला मार्गदर्शक ठरणारे शिवमहिम्न स्तोत्र आणि भगवद्गीतेतील मंत्रही म्हटले.
संपूर्ण पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हव्यासात व्यवस्थांच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. विविध देशांमध्ये सातत्याने धगधगणारी युद्धे आणि त्यातून संकटात आलेला मानवता धर्म, स्वधर्माच्या प्रसारासाठी दुसऱ्या धमयांवर आक्रमण करण्याचे प्रयत्न ही सारीच संकटे, ही मानवजातीसमोरील आणखी एक गंभीर आणि ज्वलंत समस्या आहे. स्वामी विवेकानंदांनी या धोक्यांची जाणीव 100 हून अधिक वर्षांपूवच करून दिली होती. विश्वधर्मसभेतील आपल्या ऐतिहासिक भाषणात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, सांप्रदायिकता आणि धर्मांधता यांनी संपूर्ण पृथ्वीलाच हिंसा, विनाश आणि रक्तपाताच्या खाईत सतत्याने ढकलले आहे. त्यावेळी सभागृहात विश्वधर्मसभेच्या सन्मानार्थ करण्यात आलेल्या घंटानादाचा उल्लेख करत, हा घंटानाद धर्मांधता आणि परस्पर कटुतेचा मृत्युनाद ठरेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. परंतु, आजच्या जागतिक परिस्थितीकडे पाहिले, तर त्या लक्ष्यापासून मानवजात किती दूर आहे, हे प्रकर्षाने जाणवते.
हिंदू धर्मामध्ये पसरलेल्या कुप्रथांचे उच्चाटन करण्यासाठीही स्वामी विवेकानंदांनी समाजाला दृढतेने आवाहन केले होते. अस्पृश्यता या सामाजिक अधःपतनावर त्यांनी तीव्र प्रहार करत म्हटले होते की, ”हिंदू धर्माचा सध्या एकच सिद्धांत उरला आहे, तो म्हणजे अस्पृश्यता. या वृत्तीमुळेच समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही भूमिकाच ईश्वरनिर्मित व्यवस्था आणि मानवतेविरोधातील बाब आहे.” अनेक महापुरुषांच्या अथक प्रयत्नांनंतरही ही लढाई पूर्णत्वास गेलेली नाही. समाजातील समरसतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्नांची आजही गरज आहे.
आज संपूर्ण देशात मतांतरण, ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि घुसखोरी अशा माध्यमातून, देशाच्या लोकसंख्येचे स्वरूप बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी स्वामी विवेकानंदांनी दिलेली सूचना अधिकच अर्थपूर्ण ठरते. ते म्हणाले होते की, ”जेव्हा एक हिंदू आपला धर्म सोडतो, तेव्हा फक्त एक हिंदू कमी होत नाही, तर देशाचा एक शत्रूही वाढतो.” अमेरिकेत ख्रिस्ती मिशनऱ्यांनाही स्वामी विवेकानंदांनी कडक शब्दांत सांगितले होते की, ”समाजातील गरिबी आणि लाचारीचा गैरफायदा घेऊन प्रलोभन किंवा सेवाभावाचे आवरण घालून धर्मांतर घडवून आणणे ही सेवा नव्हे; तो सरळसरळ व्यापार आहे.” शिक्षणाच्या क्षेत्रात लॉर्ड मॅकॉले यांनी लादलेल्या पद्धतीवरही त्यांनी तीव्र टीका केली होती. ही पद्धत भारतीय पिढ्यांच्या मनात स्वतःच्या परंपरा, संस्कृती, इतिहास, भाषा आणि महान परंपरेबद्दल न्यूनगंडाची भावना निर्माण करेल, असेही त्यांनी सांगितले गेले. जे शिक्षण माणसाला आत्मनिर्भर करत नाही, ते शिक्षणच नसल्याचे मतही स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केले होते.
स्वामी विवेकानंद केवळ धर्मप्रचारक नव्हते; ते भारताच्या आर्थिक विकासारतिही तितकेच सजग होते. आपल्या युवकांनी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला होता. एका प्रवासादरम्यान प्रसिद्ध उद्योगपती जमशेद टाटा यांच्यासोबत झालेल्या संवादात, भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत त्यांनी सखोल चर्चा केली होती. जमशेद टाटा यांनी नंतर ‘भारतीय विज्ञान संस्था’ आणि ‘टाटा स्टील’सारख्या महत्त्वाकांक्षी उद्योगसमूहांची स्थापना केली, त्यामागे स्वामी विवेकानंदांनी दिलेली प्रेरणाच निर्णायक ठरली. या भेटीत विवेकानंदांनी स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, फक्त परदेशातून तांत्रिक ज्ञान आयात करून भारताचे दारिद्य नाहीसे होणार नाही; आपले तंत्रज्ञान आपण स्वतः विकसित करणे अत्यावश्यक आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक युवकसंख्येचा देश आहे. स्वामी विवेकानंदांनी देशातील युवकांना आवाहन केले होते की, ’उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.’ (उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत|) स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की, देशातील या युवकांमधूनच राष्ट्रनिर्मितीचे कार्य करणारे कार्यकर्ते जन्म घेतील. स्वामी विवेकानंद यांनी पोलादी शरीर, संवेदनशील हृदय आणि सेवाभाव असलेले युवकच राष्ट्राचे खरे स्तंभ बनतील, अशी कल्पना मांडली होती. मानसिक गुलामीपासून मुक्त होण्याचे आव्हान करताना त्यांनी सांगितले की, भारताची दुबळी बाजू आर्थिक गरिबी नसून, मानसिक गुलामी आहे. आपला जन्म पापामुळे झाला नसून, आपण अमरत्वाचे पुत्र आहोत (वयम् अमृतस्य पुत्राः|) असे त्यांचे वाक्यही प्रसिद्ध आहे. स्वदेशी आणि आत्मसन्मानाच्या भावनेला त्यांनी मंत्ररूप देताना म्हटले की, ”गर्वाने सांगा, मी भारतीय आहे. प्रत्येक भारतीय माझा भाऊ आहे. भारताची माती माझा सर्वोच्च स्वर्ग आहे. पश्चिमेकडे प्रवास करतानाही भारतातील स्त्री-पुरुष समानतेवर प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट केले होते की, भारतामध्ये स्त्री ही नेहमीच श्रेष्ठ आहे; कारण ती आई आहे.” त्यांनी म्हटले की, भारताच्या स्त्रियांना पाश्चिमात्य फॅशनचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही. भारतीय स्त्रियांना सती, सीता आणि सावित्रींच्या चारित्र्यपूर्ण बलाची खरी गरज असल्याचेही त्यांनी या संदेशात म्हटले होते. कोणाच्याही मागे न पळता, स्वतःचा मार्ग तयार करा. पाश्चात्य देशांची नक्कल करणे आदर्शत्व नसून, ते आपल्या बौद्धिक मृत्यूचे लक्षण आहे, हाच या संदेशाचा मतितार्थ.
स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारकांसाठीही स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान होते. अनेक क्रांतिकारकांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी दीपस्तंभाचे कार्य केले. यासंदर्भात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणतात, ”स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थाने दुसरे शंकराचार्य होते. ते महान संत होते, ज्यांनी भारताची आत्मा खऱ्या अर्थाने जागवला. स्वामी विवेकानंदांचे धर्मज्ञान हे केवळ कर्मकांडापुरतेच मर्यादित नव्हते; ते व्यवहार्य होते. समाजातील गरीब, दुर्बलांची सेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे मानून, जीवनभर त्यांनी त्यांची सेवा केली.” परमेश्वर शोधायला कुठे जाल? समाजातील वंचित, शोषित, गरीब लोकच तुमचे खरे परमेश्वर आहेत, असे स्वामी विवेकानंद कायम सांगत. ‘नरसेवा हीच नारायणसेवा’ असल्याचा संदेशही त्यांनी कायम दिला.
कोणत्याही राष्ट्राचा विकास त्या राष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांच्या चारित्र्यावर अवलंबून असतो. म्हणूनच, श्रेष्ठ गुणधर्मांनी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण करणे हे राष्ट्राचे सर्वांत प्राथमिक कर्तव्य आहे. यासंदर्भात स्वामी विवेकानंद यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, मला विशाल ध्येय असलेली माणसे हवी आहेत. (We want men with capital Aim.) त्यांची अशी धारणा होती की, फक्त मनुष्य, म्हणजे व्यक्तीच असणे महत्त्वाचे आहे; बाकी सर्व काही आपोआप साध्य होते. आज जगाला आवश्यकता आहे. तेजस्वी, श्रद्धासंपन्न आणि दृढविश्वासी, निष्कपट नवयुवकांची; जेव्हा असे 100 युवक तयार होतील, तेव्हा सहजपणे संपूर्ण विश्वाचाच कायापालट होईल.
त्यांचा ठाम विश्वास असा होता की, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक राष्ट्र ठरावीक ध्येय घेऊनच आलेले असते. भारताचे ध्येय आहे, जगाला मानवतेचा संदेश देणे. त्यामुळेच भारत कधीही मरू शकत नाही, तो चिरंजीवी आहे. गुलामीचा अंधकार सर्वत्र असतानाही, भारताच्या कर्तव्याबद्दल त्यांचा दृढ विश्वास प्रकट झाला होता. हा विश्वास आजच्या आणि भावी पिढ्यांनी सार्थ ठरणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या अल्पायुष्यात जे महान कार्य केले, त्यास पूर्णत्व प्राप्त करून देण्याचा संकल्प घेणे, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- शिवप्रकाश
(लेखक भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री आहेत.)