मुंबई : मागच्या महिन्याभरापासून ज्या गाण्याने भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला ते म्हणजे बॉलीवूड चित्रपट धुरंधरमधील FA9LA हे गाणे. या गाण्यात अभिनेता अक्षय खन्नाची दमदार ऑन-स्क्रीन एन्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून, त्यामुळे गाण्याला सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता मिळाली आहे. याच गाण्यामुळे गायक आणि रॅपर फ्लिपेराचीलाही भारतात नवी ओळख मिळाली आहे. दरम्यान, फ्लिपेराचीने त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. विशेषतः भारतीय प्रेक्षकांसाठी तो आता भारत दौरा करणार आहे. याची अधिकृत माहितीही त्याने दिली आहे.
मूळचा बहरीनचा प्रसिद्ध रॅपर आणि म्युझिक प्रोड्यूसर फ्लिपेराची पहिल्यांदाच भारतात लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे. फ्लिपेराचीचं खरं नाव रॅपर हुसाम असीम आहे. तर तो मूळचा बहरीन देशातील आहे. धुरंधर चित्रपटात FA9LA हे गाणे दाखवल्यानंतर फ्लिपेराचीच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे. या दौऱ्याची घोषणा त्याने स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे.
फ्लिपेराचीने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा भारत दौरा 14 मार्च 2026 रोजी बेंगळुरूमध्ये होणाऱ्या UN40 म्युझिक फेस्टिव्हलमधील हेडलाईनिंग परफॉर्मन्सने सुरू होणार आहे. तसेच पुढील आठवड्यांत भारतातील इतर शहरांमधील कार्यक्रमांच्या तारखा जाहीर केल्या जातील, असेही संकेत दिले आहेत. तसेच, चाहत्यांना कोणत्या शहरात त्यांना लाईव्ह पाहायला आवडेल, याबाबतही त्याने विचारणा केली आहे.
या घोषणेनंतर फ्लिपेराचीच्या सोशल मीडियावर प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, अहमदाबाद, जयपूरसह देशातील विविध शहरांतील चाहत्यांनी आपल्या शहरात शो आयोजित करण्याची मागणी केली आहे. फ्लिपेराचीच्या पोस्टखाली कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला असून, त्याचा भारत दौरा अधिकृत झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘धुरंधर’मुळे FA9LA गाण्याला मिळाली नवी ओळख
धुरंधर चित्रपटातील एका खास सीनमध्ये FA9LA हे गाणे वापरण्यात आले असून, अक्षय खन्नाच्या उपस्थितीमुळे तो सीन अल्पावधीतच व्हायरल झाला. अरबी हिप-हॉप रिदम आणि चित्रपटातील प्रभावी सीनचा अनोखा संगम प्रेक्षकांना भावला. यामुळे हे गाणे इंस्टाग्राम रील्स, युट्यूब शॉर्ट्स आणि स्पॉटिफायसारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होऊ लागले. अलीकडील एका मुलाखतीत फ्लिपेराचीने धुरंधरचा भाग होण्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच, आगामी ‘धुरंधर 2’ या सिक्वेलमध्येही त्याचे एक नवे गाणे ऐकायला मिळू शकते, असा संकेत त्याने दिला आहे. धुरंधर 2 हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.