मुंबई : (Donald Trump) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी स्वतःला व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले आहे.
नेमकं काय आहे पोस्टमध्ये?
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये विकिपीडियाचे अधिकृत पेज दिसत आहे. त्यावर ट्रम्प यांचा डिजिटल फोटो आहे. व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष' (Acting President of Venezuela) असे त्यांच्या फोटोखाली नमूद करण्यात आले आहे. तसेच जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची निवडणूक जिंकून २० जानेवारी २०२५ ला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. ते अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष आहेत.
दरम्यान, अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना ३ जानेवारी रोजी पहाटे केलेल्या कारवाईत अटक केली. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कला नेण्यात आले. मादुरो यांच्या अनुपस्थितीत व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने डेल्सी रॉड्रिग्ज यांची व्हेनेझुएलातील अंतरिम सरकारच्या प्रमुख पदी नेमणूक केली. डेल्सी रॉड्रिग्ज या सध्या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वतः व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष असल्याचे म्हटले आहे.