
मुंबई : रंगमंच, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अष्टपैलू अभिनयाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे लवकरच एका नव्या आणि वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. आगामी ‘केस नं. ७३’ या चित्रपटातून ते बराच काळानंतर मराठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात अशोक शिंदे मनोवैज्ञानिक डॉ. श्रीकांत ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. ही भूमिका त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. आजवरच्या अभिनय प्रवासात अशोक शिंदे यांनी गंभीर, संवेदनशील तसेच विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘केस नं. ७३’ मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.
‘केस नं. ७३’ चित्रपटाचा गूढ टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून भय, वास्तव आणि भ्रमाच्या विळख्यातील नेमकं ‘रहस्य’ काय असणार? डॉ.श्रीकांत हे गूढ रहस्य उलगडू शकणार का ? की तेच या रहस्याचा एक भाग आहेत, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. प्रसिद्ध मनोवैज्ञानिक असलेल्या डॉ.श्रीकांत ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी आव्हानात्मक होतीच पण सोबत अभिनेता म्हणून आनंद देणारी होती, प्रेक्षकांनाही ही भूमिका नक्की आवडेल असं अशोक शिंदे सांगतात.
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची आहे. मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत आणि पार्शवसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे. छायांकन निनाद गोसावी यांचे आहे.