सर्जनशीलतेचा ‌‘मकरंद‌’ ठेवा...

12 Jan 2026 12:59:48

डिझाईन क्षेत्रात भरारी घेऊन ‌‘फोर्ब्स इंडिया‌’ 2026च्या 30 वर्षांखालील 30 ग्राऊंड ब्रेकर्समध्ये निवड झालेल्या मकरंद नारकर यांच्याविषयी...

मकरंद नारकर हे डोंबिवलीचे रहिवासी असून, टिळकनगर विद्यामंदिर या शाळेचे ते विद्याथ. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती. दूरदर्शनवरील कार्टून पाहात पाहात त्यांनी चित्रे काढायला सुरुवात केली. त्यांना चित्रकलेत असलेली गती, सर्वप्रथम त्यांच्या वडिलांनी हेरली. मकरंद यांच्या वडिलांनी त्यांच्या अंगीभूत गुणांवर विश्वास ठेवत, त्यांच्या जीवनप्रवासाला योग्य दिशा दिली. या क्षेत्रातील योग्य शिक्षण मिळावे म्हणून मकरंद यांना डोंबिवलीमधीलच उन्मेष इनामदार यांच्या ‌‘एक्सलंट आर्ट ॲकेडमी‌’ या चित्रकला वर्गात दाखल करण्यात आले. ज्या काळात बहुतेक विद्याथ अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा विज्ञान शाखेकडे वळत होते, त्या काळात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.

चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण व त्यानंतर ‌‘सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट‌’च्या प्रवेशाची तयारी त्यांनी, डोंबिवलीतील उन्मेष इनामदार यांच्याच मार्गदर्शनाखाली केली. शालेय जीवनातही मकरंद यांनी अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये यश मिळवले असून, प्राथमिक व माध्यमिक चित्रकला परीक्षांमध्ये राज्यात पाचवा क्रमांक पटकावला होता. या यशामुळेच त्यांच्या पुढील कलाप्रवासाला निश्चित दिशा मिळाली. पुढे ‌‘सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट‌’च्या प्रवेश परीक्षेतही त्यांनी घवघवीत यश मिळवले. पुढे सर्वोत्तम कामगिरीची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत त्यांनी, ‌‘सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट‌’मध्येही सुवर्णपदक आणि ‌‘मुंबई विद्यापीठा‌’त प्रथम क्रमांक पटकावला. याच काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय डिझाईन आणि कला क्षेत्राचा सखोल अभ्यासही सुरू केला होता.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मकरंद यांनी सुमारे एक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करून, व्यावसायिक अनुभव घेतला. पुढील टप्प्यात अमेरिकेत प्रगत शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस होता. त्यांना अमेरिकेतील जॉर्जियामधील स्कॅड विद्यापीठामध्ये प्रवेश तसेच शिष्यवृत्तीही मिळाली होती; मात्र ‌‘कोविड महामारीमुळे त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. याच काळात मकरंद यांनी, स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2020 साली आपल्या सहकारी सोनल वसावे यांच्यासोबत, स्टुडिओ ‌‘बूमरंग‌’ची डोंबिवलीत स्थापना केली. स्टुडिओच्या व्यवसायाने जसे बाळसे धरले, तसा त्यांनी हा स्टुडिओ मुंबईमध्ये हलवला.

मकरंद हे स्टुडिओ ‌‘बूमरंग‌’मार्फत जागतिक ब्रॅण्डना मल्टिमीडिया डिजिटल चित्रण, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि ॲनिमेशन यांसारख्या सर्व सेवा प्रदान करतात. ‌‘स्टारबक्स‌’साठी मुंबईतील आयकॉनिक एआर आर्ट स्पेस तयार करणे, ‌‘नाइकी‌’च्या ‌‘Nike By You‌’ या जागतिक प्रकल्पासाठी काम करणे; तसेच ‌‘ॲपल‌’साठी होळी व दिवाळी यांसारख्या भारतीय सणांवर आधारित विशेष डिजिटल आर्टवर्क निर्माण करणे हे त्यांच्या कारकिदतील महत्त्वाचे टप्पे ठरले. याशिवाय, त्यांनी इटलीमध्ये जाऊनही दागिन्यांच्या नक्षीकामाचे विशेष प्रशिक्षण घेतले असून, त्याचा प्रभावही त्यांच्या कामात स्पष्टपणे दिसतो.

‌‘बूमरंग‌’ स्टुडिओची लक्षणीय झेप म्हणजे, ‌‘कोल्डप्ले‌’च्या सहकार्याने त्यांच्या ‌‘म्युझिक ऑफ द स्फेयर्स कॉन्सर्ट वर्ल्ड टूर, इंडिया 2025‌’साठी काम करणे. यासाठी मकरंद यांना ‌‘क्युरियस ब्ल्यू एलिफंट पुरस्काराने‌’ गौरवण्यात आले. या यशामुळे स्टुडिओ ‌‘बूमरंग‌’ची ओळखही आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक झाली. पुढे मकरंद यांनी लंडनमधील प्रतिष्ठित अशा ‌‘नाईसर ट्युजडेज‌’ या व्यासपीठावर आपल्या कामाचे सादरीकरण करत, जागतिक डिझाईन समुदायाशी थेट संवाद साधला.

मकरंद हे 2024च्या पॅरालिम्पिकसाठी स्पष्टीकरणात्मक ॲनिमेशन व्हिडिओ तयार करणारे, एकमेव भारतीय आहेत. तसेच स्टुडिओ ‌‘बूमरंग‌’ची निवड ‌‘ग्लोबल यंगन्स‌’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी, भारतातेल एकमेव अंतिम स्पर्धक म्हणूनही झाली. 41 पेक्षा अधिक देशांतील 98 अंतिम स्पर्धकांमध्ये ते एकमेव भारतीय होते. त्यांच्या सर्जनशील योगदानाची दखल घेत ‌‘फोर्ब्स इंडिया‌’च्या 30 वर्षांखालील 30 जणांच्या यादीत,2025 साली ‌‘स्पेशल मेंशन‌’ म्हणून, तसेच 2026 साली अधिकृत ‌‘30 अंडर 30‌’ यादीत त्यांचा समावेश झाला. सध्या ते लंडन आणि न्यूयॉर्कच्या ‌‘जेली इलस्टेशन एजन्सी‌’मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असून, मकरंद यांच्या प्रवास भारतीय कलाकारांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. याशिवाय, भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनासाठी ‌‘गुगल डूडल‌’ तयार करण्यापर्यंत, ‘ॲपल‌’,‘नाइकी‌’,‘कोका-कोला‌’,‌‘मँचेस्टर युनायटेड‌’ आणि ‌‘युट्यूब‌’सारखे जागतिक ब्रॅण्डसमवेतही, त्यांनी काम केले आहे. स्टुडिओ ‌‘बूमरंग‌’चे आणखी वैशिष्ट्य म्हणजे जागतिक ब्रॅण्डच्या कथांमध्येही त्यांनी केलेला, भारतीय लोककथांचा समावेश. भारतीय संस्कृती, परंपरा आणि समकालीन नक्षींचा अनोखा संगम साधत, त्यांनी जागतिक व्यासपीठावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

डोंबिवलीसारख्या उपनगरातून सुरू झालेला हा सर्जनशील प्रवास आज जागतिक स्तरावर पोहोचला असून, मकरंद यांचे यश डोंबिवलीतील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मकरंदच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून हार्दिक शुभेच्छा.

Powered By Sangraha 9.0