नवीन वर्षाच्या प्रारंभीच निरनिराळे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे गेले अनेक दिवस ज्याची चर्चा होती, तो ‘द राजासाब’. ‘साऊथ सुपरस्टार’ प्रभासचा हा चित्रपट असल्याने देशभरातील त्याच्या चाहत्यांना याची उत्सुकता होती. प्रभाससह अभिनेता संजय दत्त, बोमन इराणी, झरीना वहाब असे बरेच कलाकार या सिनेमात पाहायला मिळतील. मूळ तेलुगू भाषेतील हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे, तर ९ जानेवारीला सिनेमागृहात दाखल झाला आहे. तेव्हा चित्रपट खरंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे का, ते पाहावे लागेल.
चित्रपटाची कथा अतिशय गमतीशीर पद्धतीने सुरू होते. राजा (प्रभास) आपल्या आजीसह राहत असतो. अतिशय मनमोकळा आणि हसमुख असणारा राजा म्हणजेच ‘राजासाब’ असतो. त्याची आजी गंगम्मा (झरीना वहाब) ‘अल्झायमर’ने त्रस्त असते. पण, तिच्या हट्टापायी तो एका अनोख्या प्रवासाला निघतो. गंगम्माला ठामपणे वाटते की, तिचे पती कनकराजू (संजय दत्त) अजूनही जिवंत आहेत आणि हाच विश्वास सत्य मानून राजा त्यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतो. हा शोध घेण्यासाठी तो हैदराबादला जातो. पण, तिथे अशा काही घटना घडतात की, तो एका जीर्ण, गूढ वाड्यात जाऊन पोहोचतो. त्या वाड्यात आत्म्यांच्या कथा, तंत्र-मंत्र, भयावह वातावरण आणि भूतकाळातील अनेक दडलेली रहस्ये असतात. आता तिथे नेमके काय घडते आणि प्रभासचे आजोबा कनकराजू त्याला भेटतात का, हे सगळे तुम्हाला सिनेमातच पाहावे लागेल.
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन दोन्ही मारुती यांनीच केले आहे. त्यांनी ही कथा भव्य-दिव्य पातळीवर सादर करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली होती, हे चित्रपटाच्या प्रमोशन्सवरून स्पष्टपणे दिसून येत होते आणि त्यामुळे अपेक्षाही उंचावल्या होत्या. सुमारे ४००-४५० कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट पुन्हा एकदा ‘बाहुबली’प्रमाणे इतिहास घडवेल, अशी आशा प्रभासच्या चाहत्यांना होती. मात्र, प्रत्यक्ष चित्रपट पाहताना ही महत्त्वाकांक्षा पूर्णपणे साकार झालेली दिसत नाही. चित्रपटाची मूळ कल्पना दमदार असली, तरी ती प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात चित्रपट कमी पडतो.
अनेक दिवसांनंतर प्रभास विनोदी भूमिकेत दिसून येत आहे. तसेच त्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मात्र, अनेक प्रसंग अपेक्षित असा परिणाम साधू शकत नाहीत. विनोदामध्ये धार नसल्याने आणि प्रसंगांची मांडणी प्रभावी न ठरल्याने हे दृश्य अक्षरशः सपक वाटतात. मालविका मोहननचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट असला, तरी तिची भूमिका अत्यंत मर्यादित असल्याने अभिनयाला फारसा वाव मिळत नाही. निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार यांची उपस्थिती केवळ शोभेपुरती आणि व्यक्तिरेखांची भर घालण्यापुरतीच राहते. कथानकात त्यांचे योगदान नगण्यच आहे. त्यांच्यावर चित्रित केलेली गाणीसुद्धा कथेत नकोशीच वाटतात आणि चित्रपटात निर्माण होणारी रहस्यपूर्ण उत्सुकता पूर्णपणे मोडून काढतात. झरीना वहाब आणि संजय दत्त यांची पात्रे काही प्रमाणात आपलीशी वाटतात. दोघांनीही अतिशय उत्तम अभिनय केला आहे आणि चित्रपट संपल्यानंतरही हीच पात्रे लक्षात राहतात.
चित्रपटाच्या कथेचा सुरुवातीचा भाग भावनिक नात्यांवर आधारलेला वाटतो. मात्र, काही वेळातच कथा अचानक विनोदी वळण घेते आणि त्यानंतर कोणताही ठोस आधार नसताना कथा अचानक ‘हॉरर’ दिशेने वाटचाल करते. अनेक प्रसंग केवळ वेळ भरण्यासाठी असल्यासारखे वाटतात आणि कथेच्या प्रवाहाशी त्यांचा फारसा संबंध दिसून येत नाही आणि इथेच दिग्दर्शनाचा प्रचंड अभाव दिसून येतो. ‘लायमॅस’पर्यंत पोहोचता-पोहोचता चित्रपटाची ऊर्जा पूर्णपणे कमी होते. भीती निर्माण करण्यात तो अपयशी ठरतो आणि प्रेक्षकांची उत्सुकताही हळूहळू मावळते. परिणामी, प्रभावी कल्पना असूनही सशक्त पटकथा आणि घट्ट दिग्दर्शनाअभावी हा चित्रपट विस्कळीत आणि अपेक्षाभंग करणारा ठरतो. एकंदरीतच, कागदावर प्रभावी वाटणारी कथा, कमकुवत लेखन आणि दिग्दर्शनामुळे पडद्यावर सपशेल अपयशी ठरते.
इतर कलाकारांच्याही कमकुवतपणे लिहिलेल्या भूमिका त्यांच्या क्षमतेला न्याय देत नाहीत. विनोद बहुतांशी साच्यातला आणि अंदाजेच राहतो. चित्रपटाच्या पहिल्या भागात विस्कळीतपणा आणि एकसंधतेचा अभाव जाणवतो, तर दुसर्या भागातही संथगती कायम राहते. तब्बल तीन तासांचा कालावधी प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेतो. प्रभाससारखा मोठा स्टार मुख्य भूमिकेत असतानाही दिग्दर्शक मारुती एक प्रभावी विनोदी-भयपट देण्याची संधी गमावतात, असेच वाटते.
चित्रपटाचे पार्श्वसंगीत, तसेच गाणीदेखील अजिबातच जमून आलेली नाहीत, तर पार्श्वसंगीताचा प्रभाव निर्माण होण्याऐवजी वारंवार कर्कश आवाज ऐकायला मिळतो. कार्तिक पलानी यांचे छायाचित्रण काही ठिकाणी समाधानकारक आहे आणि त्यामुळेच अधूनमधून दृश्यसौंदर्यही दिसून येते. मात्र, कोटागिरी व्यंकटेश्वर राव यांचे संकलन अधिक काटेकोर असायला हवे होते. विशेषतः पहिल्या भागात अनावश्यक प्रसंग कापून कथानकाची गती आणि सलगता वाढवता आली असती. ‘व्हीएफएस’चा चांगला वापर केला गेला आहे. अशा काही मोजयाच या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत, असे म्हणता येईल. मजेशीर आणि हलकीफुलकी कॉमेडी पाहायची असेल, तर सहकुटुंब हा चित्रपट नक्कीच पाहता येईल.
दिग्दर्शक, लेखन : मारुती
कलाकार : प्रभास, संजय दत्त, बोमन इराणी, मालविका मोहनन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार आणि झरीना वहाब.
निर्माते : टीजी विश्व प्रसाद, कृती प्रसाद
संगीत दिग्दर्शक : थमन एस
सिनेमॅटोग्राफर : कार्तिक पलानी
रेटिंग : २.५ स्टार
- अपर्णा कड