मुंबईचे वास्तूवैभव जतन करा!; 'हेरिटेज वॉक'च्या आयोजकांची अपेक्षा

11 Jan 2026 13:34:37

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय गाजावाजा आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. मुंबई शहराला अनेक शतकांचा इतिहास आहे. हा इतिहास इथल्या वारसास्थळांच्या माध्यमातून सिद्ध होतो. एशियाटिक सोसायटीची इमारत असो किंवा चौपाटी जवळ उभा असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा या साऱ्या गोष्टी मुंबईच्या इतिहासाची साक्ष देतात. मुंबईचा हाच इतिहास लोकांसमोर मांडणारे असंख्य 'हेरिटेज वॉक' आता मुंबईत होत असतात. हेरिटेज वॉक म्हणजे केवळ प्रेक्षनीय स्थळांचे पर्यटन नव्हे तर जाणीवपूर्वक एखाद्या जागेचा वारसा समजून घेण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वारसास्थळांच्या संवर्धनाला प्राधान्य देण्यात यावे असा विचार हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यांकडून मांडण्यात येतो आहे. एकाबाजूला दस्ताऐवजीकरण तर दुसऱ्या बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे काम करण्यात यावे असा विचार मांडण्यात आला आहे.

वारसा पोहोचवणारी ग्रंथ हवीत!

" मुंबई शहराला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. मात्र या वारश्याचे दस्ताऐवजीकरण पुस्तकांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. पूर्वी अशा प्रकारची माहितापार ग्रंथ छापली गेली होती. मात्र काळाच्या ओघात आता नव्या पिढीसमोर हा इतिहास आणायचे असेल तर नव्या ग्रंथांची आवश्यकता आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून जुन्या मुंबईच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी, वारसा सांगणारी ग्रंथसंपदा प्रकाशित केली जाऊ शकते, जिचा उपयोग अनेकांना होईल."
- मल्हार गोखले, ज्येष्ठ लेखक

ठाण्याचा इतिहास सांगणारे वस्तूसंग्रहलाय हवे

" मागची अनेक वर्ष ठाणे इथल्या वारसा स्थळांची माहिती आम्ही हेरिटेज वॉकच्या माध्यमातून देत असतो. कोपनेश्वर मंदिर असेल किंवा इथले वाडे. ठाण्याचा हा जो वारसा आहे, त्याच्या मागे जो इतिहास आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायाला हवी. उदाहरणार्थ अशा वारसा स्थळांजवळ महापालिकेच्या माध्यमातून माहितीपत्रकं लावली जाऊ शकतात. त्याला क्यू आर कोड सुद्धा जोडला जाऊ शकतो. यासाठी लागणारी माहिती जी आहे, ती आम्ही इतिहास अभ्यासक पूरवू शकतो. मागचा काही काळ आम्ही महापालिकेमध्ये या संदर्भात पाठपुरावा केला होता, मात्र त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्याचबरोबर ठाण्याचा इतिहास सांगणारे एखादे वस्तूसंग्रहलय सुद्धा उभे राहिले पाहिजे असं मला वाटतं.
- मकरंद जोशी, लेखक, इतिहास अभ्यासक


Powered By Sangraha 9.0