पंढरपूरात व्हीआयपी,टोकन दर्शन बंद

11 Jan 2026 18:24:35
Vitthal-Rukmini Temple
 
मुंबई : (  Vitthal-Rukmini Temple ) मकर संक्रांतीनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन आणि टोकन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्याचबरोबर दैनंदिन विविध पूजाविधिंची संख्या कमी करुन भाविकांना दर्शनासाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग व्यवस्थापन, चांगली स्वच्छता व्यवस्था, भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी माध्यमांना कळविले.
 
हेही वाचा : मुंबईचे वास्तूवैभव जतन करा!; 'हेरिटेज वॉक'च्या आयोजकांची अपेक्षा
 
मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीला म्हणजे दि. १३ जानेवारी रोजी रूक्मिणी मातेची काकड आरती व नित्यपूजा पहाटे तीन ते साडेचार या वेळेत करण्यात येणार असून, माता व भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे साडेपाच नंतर श्री रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी साडेसहा वाजेपर्यंत दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0