महाराष्ट्रातील स्थलांतराचा पॅटर्न

11 Jan 2026 15:55:56
Migration
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात साहजिकच स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये महाराष्ट्राबाहेरुन तसेच महाराष्ट्रांतर्गत होणार्‍या स्थलांतराचाही समावेश आहे. स्थलांतरामुळे विशेषत्वाने शहरामध्ये रोजगाराच्या समस्या, दळणवळणावर, अन्य पायाभूत सोयीसुविधांवर प्रचंड ताण निर्माण होतो. त्यामुळे स्थलांतर हा विषय केवळ रोजगाराशी संबंधित नसून, शहरीकरण, पायाभूत सोयीसुविधा यांच्याशीही थेट निगडित आहे. सध्याच्या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानेही स्थलांतर हा विषय अधूनमधून चर्चेत येतो. त्यानिमित्ताने PLFS ( periodic labour force survey ) २०२०-२१च्या मायक्रो-डेटावर आधारित लेखकांनी तयार केलेल्या अहवालातील काही ठळक निष्कर्ष अधोरेखित करणारा हा लेख...
 
स्थलांतरितांची वर्गवारी प्रामुख्याने जन्मस्थान किंवा शेवटच्या कायमस्वरूपी निवासस्थानाच्या आधारे केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या गणनेचे ( enumeration ) ठिकाण तिच्या जन्मस्थानापेक्षा किंवा शेवटच्या कायमस्वरूपी निवासस्थानापेक्षा वेगळे असेल, तर ती व्यक्ती स्थलांतरित मानली जाते. उदाहरणार्थ, दिल्ली येथे जन्मलेली किंवा ज्याचा शेवटचा निवास दिल्ली होता, अशी व्यक्ती मुंबईत मोजली गेली असल्यास ती ‘आंतरराज्य स्थलांतरित’ ( inter- state migrant ) ठरते. त्याचप्रमाणे, राज्याच्या अंतर्गत जिल्ह्यांत स्थलांतर करणार्‍यांना ‘अंतर्गत स्थलांतरित’ ( inter- state migrant ) म्हटले जाते. हे स्थलांतर एकाच जिल्ह्यातील किंवा एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यातील असू शकते. उदाहरणार्थ, नागपूर येथे जन्मलेली किंवा ज्याचा शेवटचा निवास नागपूर होता, अशी व्यक्ती मुंबईत मोजली गेली असल्यास ती ‘अंतर्गत स्थलांतरित’ मानली जाते.
 
स्थलांतराची कारणे अनेक असू शकतात. जसे की - विवाह, शिक्षण, रोजगार, निवृत्ती इ. भारताची जनगणना, तसेच ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एनएसएस)’ दर दहा वर्षांनी स्थलांतर व स्थलांतरितांच्या वैशिष्ट्यांची माहिती संकलित करतात. अलीकडेच, ‘पिरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे (पीएलएफएस) २०२०-२१’ मध्ये कामगारविषयक आकडेवारीसोबत स्थलांतराची माहितीही संकलित करण्यात आली. महाराष्ट्रातून एकूण २९ हजार, ५३९ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी आठ हजार, ८४७ जण शेवटच्या निवासस्थानाच्या आधारे स्थलांतरित ठरले.
 
महाराष्ट्रातील सुमारे ७१ टक्के लोकसंख्या स्थलांतरित नाही, २५ टक्के राज्यातच स्थलांतर करणारे आहेत. चार टक्के इतर राज्यांतून आलेले स्थलांतरित आहेत, ०.०३ टक्के परदेशी स्थलांतरित ( immigrant ) आणि ०.०२ टक्के परत आलेले स्थलांतरित आहेत (आकृती क्र. १). यावरून बहुसंख्य लोक जन्मस्थान किंवा कायमस्वरूपी निवासस्थान बदलत नाहीत, हे स्पष्ट होते.
अंतर्गत स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक स्थलांतर विवाहासाठी झाले असून, त्यानंतर शिक्षण व रोजगारासाठी स्थलांतर झालेले दिसते. महाराष्ट्र हे निव्वळ ‘इन-मायग्रेशन’ राज्य आहे, म्हणजे इतर राज्यांतून येणार्‍यांची संख्या बाहेर जाणार्‍यांपेक्षा जास्त आहे. हे राज्य इतर देशांतूनही स्थलांतरितांना आकर्षित करते. राज्यात येणार्‍या एकूण स्थलांतरितांपैकी ३३ टक्के उत्तर प्रदेशातून, त्यानंतर कर्नाटक (१५ टक्के), मध्य प्रदेश व गुजरात (प्रत्येकी १० टक्के) आणि बिहार (६ टक्के) येथून आलेले आहेत (आकृती क्र. २). आंतरराज्य स्थलांतराचे प्रमुख कारण रोजगार आहे. तथापि, मोठ्या प्रमाणावर मुले व महिला पालकांबरोबर किंवा पतीबरोबर स्थलांतर करतात, जे थेट रोजगाराशी संबंधित नसतात (आकृती क्र. ३).
 
आम्हाला आढळले की, आंतरराज्य स्थलांतरितांचे शैक्षणिक स्तर हे स्थलांतर न करणार्‍यांपेक्षा आणि अंतर्गत स्थलांतरितांपेक्षा जास्त आहेत. त्याचप्रमाणे, १५-६४ वयोगटातील सध्या काम करणार्‍या (नियमित, कॅज्युअल व स्वयंरोजगार असलेले) व्यक्तींमध्ये सरासरी आठवड्याचे कामाचे तास अंतर्गत स्थलांतरितांमध्ये ४४ तास, आंतरराज्य स्थलांतरितांमध्ये ५५ तास आणि स्थलांतर न करणार्‍यांमध्ये ५० तास होते. (आकृती क्र. ४). स्थलांतर न करणार्‍यांचे जास्त कामाचे तास हे त्यांच्या शेती व प्राथमिक क्षेत्रातील कामामुळे असू शकतात. आंतरराज्य स्थलांतरितांचे जास्त कामाचे तास हे ते प्रामुख्याने अनौपचारिक क्षेत्रात काम करत असल्याचे सूचित करतात.
 
नियमित, कॅज्युअल व स्वयंरोजगार असलेल्या अंतर्गत स्थलांतरितांचे सरासरी मासिक उत्पन्न आठ हजार, ९६७ होते, तर आंतरराज्य स्थलांतरितांचे दहा हजार, ७६५ होते. स्थलांतर न करणार्‍यांचे सरासरी मासिक उत्पन्न १९ हजार, २०३ होते, जे इतर गटांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. सर्वप्रकारच्या स्थलांतरितांमध्ये नियमित कामगारांचे उत्पन्न कॅज्युअल व स्वयंरोजगार कामगारांपेक्षा जास्त होते (आकृती क्र.५).अमेरिका व कॅनडासारख्या विकसित देशांच्या तुलनेत महाराष्ट्रात येणार्‍या परदेशी स्थलांतरितांचे शिक्षण व सरासरी उत्पन्न कमी आढळते. याचे कारण असे की, मुंबईत येणारे बहुतेक परदेशी स्थलांतरित शेजारील देशांतून उपजीविकेसाठी येतात व कमी कौशल्याच्या कामांमध्ये गुंतलेले असतात. तसेच शहरात बेकायदेशीर स्थलांतरितही येतात, ज्यांचे शिक्षण, कौशल्य आणि वेतन कमी असते.
- संजय मोहंती
(लेखक ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबईचे प्राध्यापक आहेत.)
(सह लेखक - सचिन कळमकर )
 
 
Powered By Sangraha 9.0