मकरसंक्रांतीनिम्मित 'वाण' खरेदीला वेग!

11 Jan 2026 19:36:47

मुंबई : सध्या राज्यामध्ये सर्वत्र निवडणुकांची धामधूम आहे. मात्र अशातच मकरसंक्रांतीचा उत्सव सुद्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने मुंबईतील बाजारांमध्ये 'वाण' खरेदी जोरात सुरू आहे. कामाच्या धावपळीत असणाऱ्या महिलांसाठी बाजारपेठांमध्ये नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहे. हळदी कुंकू ठेवण्यासाठी लागणारे छोटेखानी डबे असो किंवा हलव्याचे दागिने, सध्या या गोष्टींच्या खरेदीसाठी बाजारामध्ये तुफान गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनी महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून एकमेकींना उपयुक्त अशा वस्तू वाण म्हणून देतात. त्याच अनुषंगाने सर्वप्रथम डोळ्यांना आकर्षित करणारी वस्तू म्हणजे सुपडीच्या आकाराचे वाण. साधारण वीस ते तीस रुपयांमध्ये आपण याची खरेदी करू शकता. एकाचवेळी १२ किंवा १५ अशा स्वरूपात खरेदी करायची असेल तर त्याची किंमत आपल्याला कमी करून मिळेल. सामान ठेवण्यासाठी उपयुक्त अशा अनेक छोट्या छोट्या कापडी पर्स सुद्धा काही महिला वाण म्हणून देतात. या पर्सेसची किंमत ३० रुपयांपासून सुरू होते.

बऱ्याचदा घरामध्ये नियमित वापरासाठी असणारे दागिने कप्प्यामध्ये व्यवस्थित रचून ठेवायचे असतात. त्या अनुषंगाने लागणारे कापडी ज्वेलरी बॉक्सेस सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या गोलाकार बॉक्सेसची किंमत प्रत्येकी ६० रुपयांपासून सुरू होते. याव्यतिरिक्त देवासमोर नैवेद्यासाठी लागणारी केळीच्या पानाचे ताट किंवा छोट्या डिशेस सुद्धा दिल्या जातात. ३० ते ८० रुपयांपर्यंत या गोष्टी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. हळदी कुंकवाच्या छोटया पुड्या सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

मकर संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने आलेच. नवविवाहित जोडप्यांना आणि लहान मुलांना बोरन्हाण घालताना साखरेच्या हलव्याचे दागिने घातले जातात. बाजारामध्ये सध्या या दागिन्यांचा रेडीमेड संच उपलब्ध आहे. हे दागिने आपल्या पसंतीनुसार सुटे सुटे घेतले जाऊ शकतात. मात्र हा संच एकत्रित घेतल्यास अधिक किफायतशीर आहे. हे दागिने साधारण दीडशे रुपयांपासून पुढे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Powered By Sangraha 9.0