लक्ष्मी-नारायण मंदिर, पेडगाव

11 Jan 2026 14:39:50
Lakshmi-Narayan Temple
 
पुण्यापासून साधारण दोन तासांच्या अंतरावर, भीमा नदीच्या विस्तीर्ण पात्राच्या काठावर आज ज्या भग्न; पण गंभीर शांततेत धर्मवीरगड (बहादूरगड) उभा आहे, त्या परिसरात काळाच्या अनेक थरांची साठवण झालेली दिसते. पेडगाव हे आज जरी लहानसे गाव भासत असले, तरी मध्ययुगीन काळात ते एक महत्त्वाचे तटबंदीयुक्त नगर होते. इ.स. १६८०च्या सुमारास मुघल सत्तेखाली पेडगाव हे एक सुरक्षित लष्करी ठाणे म्हणून विकसित झाले होते. मात्र, या किल्ल्याच्या आत सापडणारी मंदिरे आपल्याला याहून कितीतरी आधीच्या, म्हणजे इ.स. ११-१२व्या शतकातील धार्मिक आणि कलात्मक वैभवाकडे घेऊन जातात.
 
धर्मवीरगडाच्या परिघात त्या काळातील चार प्रमुख मंदिरे आजही ओळखता येतात- लक्ष्मी-नारायण, बाळेश्वर किंवा बलेश्वर, मल्लिकार्जुन (मुण्डेश्वर) आणि भैरवनाथ. यांपैकी लक्ष्मी-नारायण मंदिर हे स्थापत्यदृष्ट्या सर्वाधिक परिपूर्ण, प्रमाणबद्ध आणि शिल्पदृष्ट्या समृद्ध मानले जाते. विशेष म्हणजे, लक्ष्मी-नारायण आणि बाळेश्वर ही दोन्ही मंदिरे भीमा नदीच्या डाव्या तीरावर स्थित आहेत.
 
लक्ष्मी-नारायण मंदिराचा आराखडा हा मध्ययुगीन नागर परंपरेशी सुसंगत असून, तो अत्यंत शिस्तबद्ध आणि संतुलित आहे. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि मुखमंडप अशा स्पष्ट विभागांत विभागलेली आहे. ही क्रमिक रचना भक्ताला बाह्य जगातून अंतर्मुखतेकडे घेऊन जाणारी आहे, जी हिंदू मंदिर तत्त्वज्ञानाची मूलभूत संकल्पना मानली जाते. गर्भगृह हे मंदिराचे केंद्रबिंदू. येथे मूलतः कुठल्या देवतेची प्रतिष्ठापना केली असावी, याबद्दल संभ्रम आहे. स्थानिक परंपरा आणि कथा या मंदिराची वैष्णव ओळख सूचित करतात. गर्भगृहाचा आकार चौकोनी असून, त्याची भिंत जाड आणि भारदस्त आहे. गर्भगृहाला जोडणारे अंतराळ हे देव आणि भक्त यांच्यातील संक्रमणाचे स्थान मानले जाते. या भागात रचनात्मक साधेपणा असूनही एक गंभीर स्थैर्य जाणवते.
 
मंदिराचा महामंडप हा स्थापत्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विशेष बाब म्हणजे, या महामंडपाला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा तीन दिशांनी प्रवेशद्वारे दिलेली आहेत. ही वैशिष्ट्यपूर्ण रचना मंदिराच्या सार्वजनिक स्वरूपाकडे निर्देश करते. हे मंदिर केवळ अंतर्मुख पूजेसाठी नव्हते, तर सामूहिक धार्मिक विधी, उत्सव आणि प्रवचनांसाठीही वापरले जात असावे.
 
लक्ष्मी-नारायण मंदिराचे खांब हे त्याच्या कलात्मक वैभवाचे मूर्त स्वरूप आहेत. या खांबांवर कोरलेली पर्णावली ( foliage ) ही नक्षी मध्ययुगीन भारतीय स्थापत्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि अर्थपूर्ण अलंकरण पद्धत आहे. पूर्ण कलश- जो समृद्धी, जीवन आणि सातत्याचे प्रतीक मानला जातो आणि त्यातून उमलणारी पर्णावली म्हणजे सृष्टीचा अखंड प्रवाह.
 
मंदिराच्या बाह्य भिंती हा त्याच्या शिल्पवैभवाचा खरा ठेवा आहे. येथे शिवाच्या विविध रूपांची, विष्णूच्या अनेक आविष्कारांची, तसेच अष्टदिक्पालांची शिल्पे आढळतात. ही शिल्पे केवळ धार्मिक प्रतिमा नसून त्या काळातील तात्त्विक समन्वयाचे द्योतक आहेत. यातल्या काही शिल्पांचा परिचय आपण इथे करून घेणार आहोत.
 
रावण हा शिवाचा परम भक्त होता. शिवाप्रती आपली भक्ती दाखवण्यासाठी त्याने अतिशय कठीण असा साधनामार्ग निवडला, ज्यामध्ये भक्त आपल्या शरीराचा एक-एक भाग त्या देवतेला अर्पण करतो. हे करत असताना त्याने आपली सर्व डोकी शिवाला अर्पण केली. मग, शिवाने प्रसन्न होऊन परत त्याला पूर्वीसारखे केले, अशी साधारण कथा येते. इथे असलेल्या शिल्पात ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेली आहे. एका बाजूला रावण दिसतो, ज्याने पुढचे दोन हात जोडलेले आहेत; तर मागच्या एका हातात तलवार असून, ती आपल्या गळ्याजवळ आहे तो कापण्यासाठी. दुसरा हात डोक्याजवळ असून, स्वतःचे शिर कापताना आधार मिळावा म्हणून तिथे पकडला आहे. त्याच्या शेजारी पिंडी असून, त्यावर आधीच अर्पण केलेली नऊ डोकी दिसत आहेत. शेवटचे डोके कापणार तेवढ्यात पिंडीमागून शिव प्रसन्न होऊन प्रकट झालेले दिसतात. ज्यांचा एक हात आशीर्वाद देतो आहे, तर दुसर्‍या हातात आपला त्रिशूळ पकडलेला आहे.
 
आपला मार्ग वेगळा असला, तरीही ध्येय सारखेच आहे. साधना प्रकार वेगळा असला, तरी गाभ्यात भक्तीच आहे. याच भावनेतून वेगवेगळ्या संप्रदायांना पूज्य असणार्‍या देवता संकल्पना एकत्र करून काही मूर्ती तयार झाल्या. शिव आणि विष्णू यांची एकत्र हरिहर मूर्ती सर्वांना माहीत आहेच. अशाच पद्धतीने शिव आणि सूर्य या देवता एकत्र करून एक मूर्ती घडवली गेली. या मंदिरात ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. स्थानक म्हणजे उभी मूर्ती असून, पुढचे काही हात भग्न झालेले आहेत. डोक्यावर किरीट मुकुट असून, पुढच्या दोन्ही हातात कमळे आहेत, जी सूर्याचे द्योतक आहेत; तर पाठीमागच्या हातात त्रिशूळ आणि नाग दिसतात, जे शिवाची लांच्छने आहेत. अतिशय दुर्मीळ असलेले हे शिल्प या मंदिरात आपल्याला बघायला मिळते.
 
लक्ष्मी-नारायण मंदिर ज्या परिसरात उभे आहे, तो धर्मवीरगड (बहादूरगड) केवळ एक लष्करी किल्ला नव्हता. भीमा नदीच्या काठावर वसलेला हा किल्ला सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता; पण त्याचबरोबर तो धार्मिक, सांस्कृतिक आणि नागरी जीवनाचे केंद्रदेखील होता.
 
किल्ल्याच्या आत एकाच परिसरात चार-पाच दर्जेदार मंदिरे असणे, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. यावरून असे स्पष्ट होते की, हा किल्ला केवळ युद्धासाठी नव्हे, तर स्थिर वसाहतीसाठी आणि सांस्कृतिक उत्कर्षासाठी विकसित केला गेला होता. धर्मवीरगडाचे आजचे भग्नरूप आपल्याला इतिहासातील संघर्षांची आठवण करून देते; पण त्याच वेळी या मंदिरांचे अवशेष त्या संघर्षांआधीच्या शांत, सुसंस्कृत आणि कलात्मक जीवनाची साक्ष देतात.
 
आज लक्ष्मी-नारायण मंदिर भग्नावस्थेत असले, शिखर ढासळलेले असले, तरी त्याची प्रमाणबद्ध रचना, शिल्पांची घनता आणि स्थापत्यातील शिस्त अजूनही स्पष्टपणे जाणवते. भीमा नदीच्या शांत प्रवाहासोबत उभे राहिलेले हे मंदिर पाहताना असे वाटते की, दगड आजही बोलत आहेत - कलाकारांचे हात, भक्तांची श्रद्धा आणि काळाचा साक्षीदार म्हणून. हे मंदिर केवळ पुरातत्त्वीय अवशेष नाही, ते धर्मवीरगडाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक स्मृतिकोश आहे. सत्ता बदलल्या, किल्ले पडले; पण लक्ष्मी-नारायण मंदिराच्या दगडांमध्ये कोरलेली श्रद्धा आणि सौंदर्याची भाषा आजही टिकून आहे.
 
- इंद्रनील बंकापुरे
 
 
Powered By Sangraha 9.0