मुंबई : (Devendra Fadnavis) "धारावी ही व्यवसायाच्या आधारावर उभी आहे. नागरिक एकीकडे आणि व्यवसाय दुसरीकडे असे चालणार नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की, धारावीतील व्यवसायांना धारावीतच आहे. त्यापेक्षा चांगल्या व्यवस्था आम्ही करून देणार आहोत. सगळे व्यवसाय याठिकाणीच राहतील. मी तुम्हाला शब्द देऊन जातोय की, प्रत्येक धारावीकरांना घर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीकरांना दिला. धारावीत आयोजित प्रचारसभेत त्यांनी धारावीकरांशी संवाद साधला. तसेच, या निवडणुकीनंतर अभिमानाने आणि जल्लोषात पंतप्रधान मोदीजींना आणून याठिकाणी प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहोत, असा शब्दही त्यांनी धारावीकरांना दिला. (Devendra Fadnavis)
हेही वाचा : Devendra Fadnavis : धारावीतील एकाही पात्र झोपडपट्टीवासीयाला बाहेर फेकले जाणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीत मिळालेल्या भव्य स्वागताबद्दल आभार मानले. राजीव गांधींच्या काळापासून धारावीच्या पुनर्विकासावर चर्चा होत होती, मात्र पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजप-सेना सरकारने हा विषय प्रत्यक्षात आणला. पुनर्विकासासाठी रेल्वेची व इतर आवश्यक जागा सरकारने मिळवली असून, काही लोकांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवा चुकीच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धारावीतील सर्व पात्र नागरिकांना धारावीतच हक्काचे घर देण्यात येणार असून घरांचे क्षेत्रफळ किमान ३०० ते ३५० चौ. फूट असेल. या इमारती सर्व सोयीसुविधायुक्त असतील आणि मेंटेनन्स शुल्क द्यावे लागणार नाही. संपूर्ण विकासात उद्याने व खेळाची मैदानेही असतील, अशी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. (Devendra Fadnavis)
धारावी ही व्यवसायावर आधारित वसाहत असल्याने सर्व उद्योगधंदे धारावीतच अधिक चांगल्या सुविधांसह सुरू ठेवले जातील. पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे या व्यवसायांना राज्य सरकारकडून सर्व करमाफी दिली जाईल. अपात्र नागरिकांनाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही; त्यांनाही हक्काचे घर दिले जाईल. पात्र व अपात्र दोघांचेही पुनर्वसन करणारा धारावी हा पहिलाच प्रकल्प असेल. या प्रकल्पाला विशेष दर्जा असून डीआरपीमध्ये राज्य सरकार हिस्सेदार आहे आणि धारावीची जमीन सरकारचीच मालकी राहणार आहे. प्रत्येक धारावीकराला घर दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही, असा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करून धारावीतील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. (Devendra Fadnavis)