स्वयंसेवकांवर बंधुत्वाने मायेची पखरण करणारे ‘भास्करभाऊ’

11 Jan 2026 15:39:55
Bhaskarrao Kulkarni
 
राष्ट्रनिष्ठा, त्याग, शिस्त आणि संघभावना या मूल्यांचे चालते-बोलते प्रतीक म्हणजे कै. भास्करराव शामराव कुलकर्णी. सामान्य परिस्थितीतून असामान्य जीवन घडवणारे, कुटुंबासाठी आधारस्तंभ आणि राष्ट्रासाठी समर्पित स्वयंसेवक म्हणून त्यांनी आयुष्यभर अखंड सेवा केली. आणीबाणीच्या कठोर काळापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत संघकार्याशी असलेली त्यांची निष्ठा ही एका तपस्वी जीवनाची साक्ष देते. त्यांच्या जीवनप्रवासातून संघसंस्कार, त्याग आणि ‘राष्ट्र सर्वोपरि’ या तत्त्वांचा अर्थ कसा जगायचा, हे स्पष्ट होते.
 
कै. भास्कर शामराव कुलकर्णी हे कुटुंबीयांचे ‘भाऊ’ व स्वकीयांचे ‘भास्करभाऊ’ म्हणून परिचित होते. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील (त्यावेळचा गंगाखेड तालुका) निळा हे त्यांचे जन्मगाव. वडील शामराव हे शेती-व्यवसाय करीत असत व आई राधाबाई परिवाराचा गाडा सांभाळत असे. राधाबाईंना व शामरावांना एकूण ११ अपत्य होती. त्यातील दोन वाचू शकली नाहीत. सात मुले व दोन मुली अशी एकूण नऊ भावंडे. सर्वात मोठा भास्कर.
 
दि. ६ डिसेंबर १९४९ रोजी भास्कररावांचा जन्म झाला. भास्कररावांनी प्राथमिक शिक्षण निळ्यात व गंगाखेड येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे मामा वसंतराव किशनराव देशमुख, पिंपळगावकर त्यांच्याकडे राहून भास्कररावांनी ‘मॅट्रिक’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मामा अंबाजोगाई येथे ‘भारतीय शिक्षण प्रसारक संस्थे’च्या खोलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. पुढे शिक्षणानंतर याच संस्थेत सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव येथे १९६६-६७ दरम्यान ‘लिपिक’ म्हणून नोकरीस सुरुवात केली.
 
माजलगाव येथे भास्करराव यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला व त्यांनी संघकार्यास प्रारंभ केला. १९६८ साली त्यांचा शकुंतला लक्ष्मणराव देशमुख, भट गल्ली, माजलगाव यांच्याशी विवाह झाला. दोघेही माजलगाव येथे स्थिर झाले. भास्कररावांनी शाळेतील लिपिक म्हणून नोकरी सांभाळत असताना संस्थेच्या कामाबरोबरच त्यांचा संघकार्याशी अधिक ऋणानुबंध जडला. त्यांनी संघकामाला प्राधान्य देण्याचे ठरवले व तसा त्यांचा प्रवासही सुरू झाला.
 
गावी शिक्षणाची व्यवस्था नसल्याकारणाने सर्व भावंडांचे शिक्षण माजलगावी आणून भास्कररावांनीच केले. त्यांची शिक्षणाची, नोकरी-व्यवसायाला सुरुवात करून देण्याची, त्यांचे लग्न लावून संसार थाटण्याची सर्व जबाबदारी भास्कररावांनी पूर्ण केली. त्याचप्रमाणे पुढे त्यांच्या तीन मुलांच्या व पुतण्यांच्याही जबाबदार्‍या पार पाडल्या. संघकार्य करत असताना परिस्थिती नसलेल्या स्वयंसेवकांना, तसेच काही नातलगांना आपल्या घरात स्थान देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी भास्कररावांनी सहकार्य केलेली अनेक उदाहरणे आहेत.
 
मराठवाड्यातील दुष्काळाच्या काळात त्यांनी पुढे होऊन कार्य केले आहे. दुष्काळग्रस्तांना भोजन, अन्नधान्य, कपडेवाटप, जनावरांना चार्‍या-पाण्याचे वाटप, छावणी-उभारणी अशी कामे त्यांनी केल्याचे छायाचित्रांमधून लक्षात येते. आणीबाणीचा काळ हा भास्कररावांच्या कुटुंबीयांसाठी खूपच स्मरणीय म्हणावा लागेल. याकाळात सर्वांनाच प्रतिकूलतेचा सामना करावा लागला. मोठा मुलगा सतीश १९७५च्या आणीबाणी काळात जेमतेम पाच वर्षांचा होता. सुरुवातीचे अनेक महिने भूमिगत राहून त्यांनी संघकार्य केले. वेळप्रसंगी पोलिसांपासून सावध राहण्यासाठी वेषांतर करूनही ते फिरत असत. आयुष्यभर पायजमा व नेहरू-शर्ट वापरणारे भाऊ; पण त्यांनी आणीबाणीमध्ये पॅन्ट-शर्टही शिवला होता. अनेकवेळा ते कार्यकर्त्यांच्या शेतावरच मुक्कामी असत. रात्री संघाची पत्रके व पोस्टर्स गावात सगळीकडे चिकटवण्याची कामे करीत असत.
 
एकदा पोस्टर्स चिकटवतानाच पोलिसांनी हटकले व चौकशी केली असता, खोटे नाव सांगून त्यांच्या हाती काही रुपये टेकवून सुटका करून घेतल्याचा प्रसंगही भास्करराव यांच्यासोबत घडला होता. अखेर तपास लागला व अटक होऊन १८ महिन्यांचा कारावास भोगावा लागला. नाशिक येथील कारागृहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
 
माजलगावी त्यावेळी भास्करराव यांचे कुटुंबीय श्रीश्रीमाळ यांच्या वाड्यात राहत असे. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास त्यांना पोलीस घ्यायला आले होते. त्यांना नाशिकला कारागृहात घेऊन जाणार आहेत, हे निश्चित झाल्यावर अगोदरपासून तुरुंगात असणार्‍या स्वयंसेवकांसाठी भास्कररावांच्या पत्नीने दशम्या बांधून दिल्या होत्या. भास्कररावांना पोलीस अटक करून घेऊन जाणार, हे कळल्यानंतर माजलगाव बसस्थानकातून नाशिकसाठी निघालेली बस कार्यकर्त्यांनी अडवली होती. आणीबाणीविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. आंदोलनकर्ते बसच्या समोर झोपल्यामुळे बस पुढे जाऊ शकत नव्हती. तेव्हा पोलिसांनी भास्कररावांना विनंती केली होती की, तुम्ही आंदोलकांची समजूत घाला. तशी त्यांनी समजूत घातली व बसचा मार्ग मोकळा झाला.
 
अटकेनंतर काही दिवस माजलगावात काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची निळ्याला शेतीच्या गावी आजोबांकडे झाली. तिथे नऊ महिन्यांनंतर ‘पॅरोल’वर काही दिवसांच्या सुटीसाठी भास्कररावांना सोडण्यात आले होते. नाशिक जेलमधून दर आठवड्याला त्यांची पत्रे गावी येत असत. कुटुंबीयांची वाताहत होत आहे, यातूनही मार्ग निघेल असा सर्वांना धीर देण्याचे कार्य त्याही काळात त्यांनी केले. याकाळात कल्याणचे आत्माराम जोशी ऊर्फ बाबा जोशी, भाऊराव क्षीरसागर हे सहयोगी प्रचारक होते. तसेच वसंतराव देशमुख, एल. आर. देशपांडे, शरदराव हेबाळकर, सुधाकरराव तालखेडकर इत्यादी कार्यकर्ते त्यांचे सहकारी होते.
संघसंस्कार कुटुंबातही असला पाहिजे, तो समाजाला दिसला पाहिजे, हे भास्कररावांचे तत्त्व होते. कृती आणि उक्तीमध्ये त्यांनी फरक येऊ दिला नाही. परिस्थिती प्रतिकूल असतानाही सर्व ताकदीनिशी संघकार्य करता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भास्करराव होते, असे म्हणायला हरकत नाही. ‘राष्ट्र सर्वोपरि’ ही संज्ञा ते आयुष्यभर जगले. अनेक संकटांना सामोरे जात असताना कधीच संघाची प्रतारणा त्यांनी होऊ दिली नाही. संघ प्रचारकांची वाताहत होऊ दिली नाही. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. संघ प्रचारकांची अडचण होता कामा नये, त्याला सांभाळणे हे आपले कर्तव्यच आहे, असे ते मानत.
 
गुरुपौर्णिमेच्या उत्सवात समर्पणासाठी सहकार्‍यांना सतत प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले. स्वयंसेवकांनी अधिकाधिक समर्पण संघाला समर्पित केले पाहिजे, असा आग्रह ते धरत असत. पगार उचलणार्‍यांनी ११ महिन्यांचा पगार घरात वापरावा व एक पूर्ण पगार संघाला समर्पित करावा, असा आग्रह तेव्हा ते सर्वांना करीत असत. याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. ‘घरखर्चात कपात करा, हा गुरुदक्षिणेचा महिना आहे,’ अशी सूचना घरात दिली जात असे. घरातील सर्व सदस्यांनी संघाचे कार्य केले पाहिजे, हा त्यांचा कायमच आग्रह असायचा.
 
त्यांच्या मुलांविषयी म्हणाल, तर त्यांनी एकवेळ शाळा बुडवली तर त्यांना फार अडचण नसायची. पण, शाखा बुडवली म्हणून मार खावा लागलेला आहे. संघ प्रचारकांमध्ये सतत प्रवास असणार्‍यांमध्ये बाबा जोशी व भाऊराव क्षीरसागर, सुरेशराव केतकर, मधुभाई कुलकर्णी, सोमनाथ खेडकर, मुकुंदराव पणशीकर, दामुअण्णा दाते व नंतरच्या काळात रमेश देवळे, मिलिंदराव मोहोळकर, भार्गव सरपोतदार, प्रदीप गोखले यांचा प्रचारक म्हणून बीड जिल्ह्यातील प्रवास असायचा. तसेच सक्रिय स्वयंसेवकांमध्ये आष्टीचे बबनराव देशपांडे, श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे, माजलगावी मारुती पारेकर, मोती गुरुजी, बापुराव देशपांडे, दत्ता कुलकर्णी, जगदीश देशमुख यांचा त्याकाळातील संघविस्तारामध्ये मोलाचा वाटा आहे.
 
घरातील सदस्यांनी काहीकाळ प्रचारक म्हणून वेळ दिला पाहिजे, या विचारांचे भास्करराव होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, त्यांचे धाकटे पाच नंबरचे बंधू बाळासाहेब कुलकर्णी यांनी धाराशिव व सासवड येथे चार वर्षे तालुका प्रचारक म्हणून कार्य केले. अनेक जबाबदार्‍या सांभाळत बीड जिल्हा व्यवस्थाप्रमुख म्हणून दायित्व असताना भास्कररावांची माजलगावहून नोकरीनिमित्त लातूर येथे बदली झाली व तिथे ‘जनकल्याण समिती’च्या कार्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. भूकंपानंतर रेबेचिंचोली येथील घरांची उभारणी व जनकल्याण निवासी विद्यालय उभे करण्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलाय. याच कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी तीनही मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीतून निवृत्ती स्वीकारली व पूर्णवेळ पुणे येथे १९९९ ते २०१२ पर्यंत ‘जनकल्याण समिती’ महाराष्ट्र प्रांताचे ‘कार्यालय सचिव’ म्हणून काम पाहिले.
 
सन २००९ मध्ये त्यांना दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे डायलिसिसला सामोरे जावे लागले. प्रकृती खालावत गेली. आठवड्यातून तीन दिवस ‘एक दिवसाआड’ डायलिसिसला सामोरे जावे लागे. डायलिसिस केल्याच्या दिवशी दुपारी ३ वाजता ते प्रांत कार्यालयात येत असत. शेवटचे चार महिने मात्र त्यांना संघकार्यासाठी पुरेसा वेळ देता आला नाही. मानेतून डायलिसिससाठी नळी बसवलेली असतानाही त्याभोवती रुमाल गुंडाळून ‘गुरुपूजना’च्या उत्सवाला ते स्वतः चालत गेले व समर्पण करून आले. अखेरच्या श्वासापर्यंत संघावरील निष्ठा अढळ होती. अखेर दि. ७ जुलै २०१२ रोजी प्रकृती खालावत गेली आणि भास्करराव यांना देवाज्ञा झाली. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
 
 
Powered By Sangraha 9.0