वाराणसीचा चित्रसंगम

10 Jan 2026 12:03:21

Varanasi

अध्यात्मविचार हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. या विचारांच्या डोहामध्ये प्रवेश केल्यावर काहींना त्यांच्या जीवनाचे श्रेयस सापडते, तर काहींच्या जीवनाच्या मुक्तीचा मार्ग इथूनच जातो. हा विचार मूर्तरूपात भारतवर्षामध्ये जिथे प्रकट झाला, ते ठिकाण म्हणजे वाराणसी. ‘भारताची आध्यात्मिक राजधानी’ अशी ओळख असलेल्या या शहरामध्ये भारतीय संस्कृतीचा सचेतन आत्मा आपल्याला अनुभवायला मिळतो. याच शहराला, इथल्या गंगेला चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न काही चित्रकारांनी केला आहे. ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या माध्यमातून ‘वाराणसी’ या समूह चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ जानेवारी ते दि. १२ जानेवारी या कालावधीमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळामध्ये मुंबईतील प्रभादेवीच्यापु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या कलादालनात या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने या चित्रविश्वाचा मागोवा घेणारा लेख...

परंपरा आणि श्रद्धेचा अखंड प्रवाह म्हणजे वाराणसी! जगाच्या पाठीवर मागची अनेक शतकं वाराणसीच्या गंगेच्या घाटांचं असलेलं कुतूहल आजही कायम आहेच. आपल्या सनातन संस्कृतीचा उगम जर आपल्याला शोधायचा असेल, तर आपली पावलं याच गंगेच्या पाण्यात आधी ओली करावी लागतील. आदि शंकराचार्यांनी वसवलेले धर्मपीठ असो किंवा मागची अनेक शतकं विणकाम करून वस्त्रवैभव जिवंत ठेवणारे कारागीर. भारतीय संस्कृतीची अनेकविध रूपं आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतात. पांडवांच्या सप्तपुरीतील महत्त्वाचं स्थान म्हणजे काशी.

एका बाजूला आक्रमणकर्त्यांनी आपले सत्तावर्चस्व टिकवण्यासाठी या पवित्र भूमीतील देवालये भ्रष्ट केली, तर दुसर्‍या बाजूला आपली ज्ञानतृष्णा शमवण्यासाठी दक्षिण आशियातून अनेक विद्वान या नगरीसमोर नतमस्तक झाले. आजदेखील वाराणसीचा घाट ज्यावेळेस कुंभमेळ्याच्या निमित्ताने गजबजलेला असतो, त्यावेळेला भारताच्या संस्कृतीसंचिताचे दर्शन अनेकांना घडते. मनुष्यजीव, झाड, पशुपक्षी, ज्याप्रकारे जिवंत असतात, त्याचप्रकारे प्रत्येक शहरसुद्धा आपल्या जिवंतपणाची खूण लोकांना सांगत असते. या शहरामध्ये भूतकाळाच्या असंख्य खुणा आपल्याला दिसतात. त्याचबरोबर ऐकणार्‍याला भविष्याच्या हाकासुद्धा ऐकू येतात. अशा या वाराणसीला १५ चित्रकारांनी, रंगांच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक शहराची एक जागृतावस्था असते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला याचे अवलोकन होत नाही. मात्र, एखादा चित्रकार ज्या वेळेला आपला भोवताल रंगरेषांच्या माध्यमातून बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ही जागृतावस्था त्याला नेमकी टिपता येते. वाराणसीच्या चित्रांमध्ये आपल्याला ही अवस्था नेमकी दिसून येते. गंगेचा विशाल घाट, त्या महाकाय घाटावर फुललेली संस्कृती, याचे अत्यंत नितळ चित्रण आपल्याला चित्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. वाराणसी ही जेवढी साधू-संतांची भूमी आहे, तितकेच इथल्या विणकारांचीसुद्धा भूमी आहे, याचा चित्रकरांना विसर पडलेला नाही. म्हणूनच या चित्रांमध्ये एक समग्रता आपल्याला दिसून येते. ज्या शहरांमध्ये देवी-देवतांच्या देवालयांचा वास आहे, तिथेच बुद्धविचारसुद्धा नांदत आहे.

गंगा व गोमती नदीच्या संगमावर असलेली सारनाथची भूमी, याच वाराणसीचा अविभाज्य भाग आहे. ज्या प्रकारे गंगेच्या घाटावरचा गजबजाट, प्रवाहीपणा चित्रांमध्ये आपल्याला दिसून येतो, त्याचप्रकारे सारनाथ येथील स्तूप आणि भोवतालचे नितळ वातावरणसुद्धा आपल्याला बघायला मिळते. स्तब्धतेची स्वतःची एक लय असते, जी या चित्रांमधून डोकावली आहे, असे आपल्याला दिसून येते. गंगेच्या एका घाटावर एकाचवेळी अनेक क्रिया घडत आहेत. कुठे एका बाजूला मोकळे पशु-पक्षी, तर दुसर्‍या बाजूला रोजच्या जगरहाटीचा पसारा. मात्र, या दोन्हींमध्ये संतुलन निर्माण करत वाराणसीचे परिपूर्ण चित्र प्रेक्षकांच्या समोर उभे राहते. एकूणच काय, तर माणसांच्या जाणिवांचा सखोल विचार या चित्रांमध्ये केला गेला आहे, असे आपल्याला दिसून येते.

या चित्रप्रदर्शनामध्ये आपल्याला केवळ चित्रकारांची चित्रंच दिसत नाहीत, तर त्यांच्या विचारांची खोली किती व्यापक आहे, याचासुद्धा अनुभव मिळतो. उदाहरणार्थ, मनोज सकाळे चित्र साकारताना एका बाजूला त्यांनी सारनाथचे स्तूप साकारले आहे, तर दुसर्‍या बाजूला घाटावरील बाजार त्यांनी आपल्या चित्रातून दाखवला आहे. म्हणजे एका प्रकारे माणसाच्या संसार आणि मोक्षाचा खेळच या चौकटींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. कुदळ हिरेमठ यांच्या चित्रसृष्टीचे कौतुक करावे तितके थोडे. त्यांच्या प्रत्येक चित्रामध्ये वाराणसीचे समग्र दर्शन आपल्याला घडते.

वातावरणनिर्मिती सक्षम असल्याने ही समग्रता अधिकच उठावदार असल्याचे जाणवते. त्यांच्या प्रत्येक चित्रामध्ये गाय-वासराचे आपल्याला दर्शन होते. घाट आणि पायवाट यांना वाराणसीमध्ये महत्त्व आहे. राजेश इंदुलकर यांच्या चित्रांमधून आपल्याला वाराणसीतील वेगवेगळ्या पायवाटांचे दर्शन घडते. शिवाजी नागूलकर हे मूळचे शिल्पकार. मात्र, त्यांनीसुद्धा हातामध्ये कुंचला धरल्यानंतर चित्रांना वेगळाच आकार दिला आहे. त्यांनी आपल्या चित्रांमध्ये तपशीलांवर जास्त भर दिल्याचे आपल्याला दिसून येते. यामुळे त्यांच्या चित्रांमधला ठेहराव अधिक स्पष्ट होतो. अशा या सगळ्या चित्रकारांच्या मांदियाळीमध्ये एरव्ही निसर्गाला आपल्या कुंचल्यातून साकार करणारे शरद तावडे केवळ भोवताल मांडत नाहीत, तर वाराणसीमधल्या सूक्ष्म गोष्टींचा वेध घेतात. यामधून पुन्हा एकदा चित्रांतील भाषेचा एक वेगळा विचार आपल्यासमोर येतो.

प्रत्येक चित्रकाराला, त्याचा भोवताल वेगळा भासतो. त्यातून त्याच्या चित्रांची निर्मितीसुद्धा वेगळी घडते. ‘वाराणसी’च्या निमित्ताने जे चित्रवैभव साकारण्यात आले आहे, ते अभिनव तर आहेच; मात्र त्याचबरोबर चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनादेखील नवी दिशा देणारे आहे. या सर्व चित्रांमधला एक समान दुवा म्हणजे, भारतीय संस्कृतीच्या संगमाचा विचार येथे प्रकट झाल्याचे आपल्याला दिसून येते. हे अनोखे चित्रसंगम अनुभवण्यासाठी या चित्रप्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे.

 
 
Powered By Sangraha 9.0