मुंबई : ( Slum Rehabilitation Authority ) नागरिकांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने केंद्र सरकारच्या यूएक्सफोरजी ( युझर एक्स्परिअन्स फॅार गव्हर्नमेंट) या विशेष प्रणालीची आपल्या अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी अंमलबजावणी करणारे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण राज्यातील पहिले शासकीय प्राधिकरण ठरले आहे. या उपक्रमांतर्गत प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचा संपूर्ण कायापालट करण्यात आला असून, आता नागरिकांना प्राधिकरणाशी संबंधित सर्व माहिती व सेवा घरबसल्या अधिक सुलभतेने आणि कमी वेळेत उपलब्ध होणार आहेत.
सरकारी संकेतस्थळांचा वापर करताना नागरिकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना सोपे, स्पष्ट आणि सकारात्मक डिजिटल अनुभव देणे हा केंद्र सरकारच्या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे प्राधिकरणाच्या संकेतस्थळाची रचना आता अधिक सुटसुटीत, स्पष्ट आणि वापरकर्ता-केंद्रित करण्यात आली आहे.
हेही वाचा : Megablock Updates: मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मोठा ब्लॉक, १५३ लोकल रद्द
सर्वसामान्य नागरिकांना प्राधिकरणाशी संबंधित आवश्यक माहिती सहज शोधता येईल, अशा पद्धतीने संकेतस्थळाची रचना करण्यात आली आहे. विविध सेवा, अर्ज आणि त्यांच्या स्थितीची माहिती आता कमीत कमी क्लिकमध्ये उपलब्ध होणार असून, नागरिकांचा वेळ व श्रम दोन्ही वाचणार आहेत.
हे संकेतस्थळ आता संगणकासोबत मोबाईल आणि टॅब्लेटवर तितक्याच प्रभावीपणे वापरता येणार आहे. अधिक चांगली वाचनीयता, सुलभ मांडणी आणि आधुनिक रचनेमुळे हे संकेतस्थळ सर्व स्तरांतील नागरिकांसाठी वापरण्यास सोपे झाले आहे, प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.