जागतिक पातळीवर पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित होत असताना, नॉर्वे सध्या इतिहास घडवत आहे. युरोपमधील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक असलेला ‘रोगालॅण्ड फिस्ड लिंक’ ( Rogfast ) हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगातील सर्वात लांब आणि सर्वात खोल पाण्याखालील रस्ता बोगदा ठरणार आहे. सुमारे २६.७ किमी लांबीचा आणि समुद्रसपाटीखालून तब्बल ३९० मीटर खोल असलेला हा बोगदा अभियांत्रिकी क्षमतेची मर्यादा पुन्हा एकदा पुढे नेणार आहे. हा बोगदा नॉर्वेच्या पश्चिम किनारपट्टीवरील खडतर फ्योर्ड्स आणि उत्तर समुद्राखालून जाणार आहे. नॉर्वेच्या भौगोलिक रचनेमुळे रस्ते आणि रेल्वे प्रकल्प उभारणे हे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. खोल दर्या, खडकाळ पर्वतरांगा आणि पसरलेली समुद्री किनारपट्टी यामुळे प्रवास आजही अनेक ठिकाणी फेरीसेवांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ‘रॉगफास्ट’ हा प्रकल्प नॉर्वेच्या दीर्घकालीन वाहतूक धोरणाचा कणा ठरत आहे.
२०३३ पर्यंत पूर्ण होणार्या या प्रकल्पामुळे नॉर्वेतील स्टाव्हांगर जे देशातील चौथे मोठे शहर आणि बर्गन जे दुसरे मोठे शहर, त्या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे ४० मिनिटांनी कमी होणार आहे. आज या दोन शहरांदरम्यान प्रवास करताना फेरीसेवा, हवामानातील अनिश्चितता आणि वाहतुकीची गर्दी यांचा सामना करावा लागतो. ‘रॉगफास्ट’मुळे ही अनिश्चितता संपुष्टात येऊन २४ तास सर्व हवामानात सुरक्षित आणि जलद प्रवास शक्य होणार आहे. हा प्रकल्प ‘ए ३९’ या युरोपियन महामार्गाचा महत्त्वाचा भाग आहे. हा महामार्ग नॉर्वेच्या पश्चिम किनारपट्टीवरून क्रिस्टियानसॅण्ड, स्टाव्हांगर, हॉगेसुंड आणि बर्गन यांसारख्या शहरांना जोडतो. फेरीसेवा हटवून सलग रस्ता दळणवळण निर्माण करणे, हे नॉर्वे सरकारचे धोरणात्मक उद्दिष्ट आहे. यामुळे केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे, तर मालवाहतूक, लॉजिस्टिस, उद्योग आणि पर्यटन यांनाही मोठा फायदा होणार आहे.
अभियांत्रिकीच्या दृष्टीने ‘रॉगफास्ट’ अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या बोगद्यामध्ये प्रत्येक दिशेला दोन लेन असतील, ज्यामुळे वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम राहील. बोगद्याच्या मध्यभागी नॉर्वेतील सर्वात लहान नगरपालिका असलेल्या क्विट्सॉय बेटाशी जोडणारा एक विशेष फाटा देण्यात आला आहे. या ठिकाणी समुद्रसपाटीखालून २६० मीटर खोल असलेले दोन गोल फेरे उभारले जात आहेत. पाण्याखाली, दगडात कोरलेले असे दुहेरी गोल फेरे जगात अत्यंत दुर्मीळ मानले जातात. या अनोख्या रचनेचा मुख्य उद्देश म्हणजे वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सुरक्षितता वाढवणे. बोगद्याचा एखादा भाग देखभाल किंवा आपत्कालीन परिस्थितीत बंद ठेवावा लागला, तरीही उर्वरित भागातून वाहतूक सुरू ठेवता येईल, अशी ही रचना आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ विक्रमांपुरता मर्यादित न राहता, कार्यक्षमतेचा आणि लवचीकतेचा नमुना ठरत आहे.
‘रॉगफास्ट’ प्रकल्प नॉर्वेच्या बोगदा खोदकामातील प्रावीण्याचे प्रतीक आहे. नॉर्वेने यापूर्वीही अनेक लांब आणि खोल बोगदे यशस्वीपणे उभारले आहेत. मात्र, ‘रॉगफास्ट’ हा प्रकल्प त्या सर्व अनुभवांचा कळस मानला जात आहे. अत्यंत कठीण भूगर्भीय परिस्थितीत, समुद्राखालील दाब, पाण्याची गळती आणि सुरक्षिततेचे कठोर निकष यांचा सामना करत हा प्रकल्प आकार घेत आहे. जागतिक पातळीवर पाहता, ‘रॉगफास्ट’ हा प्रकल्प अनेक देशांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरू शकतो.
वाढते शहरीकरण, वाहतुकीची कोंडी आणि पर्यावरणीय आव्हाने यांचा सामना करताना भविष्यात शहरांना जोडण्यासाठी पाण्याखालील मार्ग अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. युरोप, आशिया आणि अगदी भारतासारख्या देशांसाठीही अशा प्रकल्पांकडे केवळ अभियांत्रिकी नव्हे, तर रणनीतिक गुंतवणूक म्हणून पाहिले जाईल. समुद्राखालील महामार्ग उभारताना नॉर्वेने दाखवलेली दूरदृष्टी, नियोजन आणि धाडस हे जागतिक पायाभूत सुविधा विकासाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहीत आहे. ‘रॉगफास्ट’ पूर्ण झाल्यानंतर तो केवळ नॉर्वेचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा अभियांत्रिकी आविष्कार ठरणार आहे.