ओडिशा : (Odisha plane crash) ओडिशामधील राउरकेला परिसरात शनिवार दि. १० जानेवारी रोजी दुपारी एक धक्कादायक विमान अपघात घडला आहे. इंडिया वन एअर (IndiaOne Air) या कंपनीचे ९ आसनी छोटे विमान उड्डाणानंतर काही वेळातच जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Odisha plane crash)
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान भुवनेश्वरहून राउरकेलाकडे जात होते. अपघात राउरकेलापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर घडला. प्राथमिक माहितीनुसार, विमानात पायलटसह एकूण सात जण प्रवास करत होते, ज्यामध्ये सहा प्रवासी आणि एका पायलटचा समावेश आहे. या अपघातात पायलट गंभीर जखमी झाला असून, इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे. (Odisha plane crash)
अपघातग्रस्त विमानाचा नोंदणी क्रमांक VT-KSS असून समोर आलेल्या फोटोजमध्ये विमानाचा पुढील भाग आणि पंख मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की हवामानाचा परिणाम, याबाबत तपास सुरू असल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. (Odisha plane crash)