मुंबई : (Mumbai News) घरातल्या फ्रिजचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत वडील संजोग पावस्कर यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गोरेगाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. पावस्कर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घरातील फ्रिजचा मोठा स्फोट झाला. काही क्षणांतच घराला भीषण आग लागली. घराला प्लास्टिक शीट लावलेली असल्याने आगीने तात्काळ रौद्र रूप धारण केले. (Mumbai News)
या आगीत संजोग पावस्कर (वडील) तसेच त्यांची दोन मुले हर्षदा पावस्कर (वय १९) आणि कुशल पावस्कर (वय १२) यांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी मुलांनी धडपड केली. १२ वर्षांचा कुशल आग टाळण्यासाठी बाथरूममध्ये लपला होता. मात्र, वेगाने पसरलेली आग आणि दाट धुरामुळे गुदमरून व होरपळून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत सुदैवाने मुलांची आई रात्रपाळीच्या कामावर गेली असल्याने त्या घरी नव्हत्या आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, एका रात्रीत संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Mumbai News)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.
या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एडीआर (अपघाती मृत्यू नोंद) दाखल केली असून, आगीचे नेमके कारण काय होते आणि फ्रिजचा स्फोट कशामुळे झाला, याचा सखोल तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे. (Mumbai News)