IIT Bombay : आयआयटी मुंबईत ‘परम रुद्र’चा महाशक्तीशाली उदय

10 Jan 2026 11:44:41
 
IIT Bombay
 
मुंबई : (IIT Bombay) भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत ८ जानेवारी २०२६ रोजी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे अत्याधुनिक ‘परम रुद्र’ सुपरकॉम्प्युटिंग सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.अभय करंदीकर यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण झाले. (IIT Bombay)
 
३ पेटाफ्लॉप्स क्षमतेची ही हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग प्रणाली राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनअंतर्गत ‘बिल्ड अप्रोच’द्वारे विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘परम रुद्र’ ही पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, सी-डॅकद्वारा विकसित रुद्र सर्व्हरवर उभारण्यात आली आहे. भारतातच तयार झालेल्या या प्रणालीमुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठे बळ मिळाले आहे. (IIT Bombay)
 
ही सुपरकॉम्प्युटर प्रणाली केवळ वेगवानच नाही, तर ऊर्जा-कार्यक्षम देखील आहे. यात वापरण्यात आलेले डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान कमी ऊर्जा वापरात अधिक कार्यक्षमता देण्यास मदत करते. सी-डॅकच्या स्वदेशी सॉफ्टवेअर स्टॅकमुळे ही प्रणाली पूर्णतः भारतीय गरजांनुसार सुसज्ज आहे. (IIT Bombay)
 
हेही वाचा :  Central Railway : मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी कामांमुळे ५ स्थानकांत लोकल थांबा रद्द
 
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा.अभय करंदीकर यांनी सांगितले की, ‘परम रुद्र’मुळे आयआयटी मुंबईतील संगणकीय संशोधन क्षमतेत आमूलाग्र बदल घडून येईल. या सुविधेचा लाभ २०० हून अधिक प्राध्यापक आणि सुमारे १,२०० विद्यार्थी घेऊ शकतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, प्रगत उत्पादन, हवामान अभ्यास, औषधनिर्मिती अशा क्षेत्रांत संशोधनाला नवे परिमाण मिळेल. यासोबतच स्टार्टअप्स आणि उद्योग-केंद्रित संशोधनालाही मोठा आधार मिळणार आहे. (IIT Bombay)
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या गट समन्वयक सुनीता वर्मा यांनी ‘रुद्र-आधारित’ क्लस्टरला भारताच्या स्वदेशी सुपरकॉम्प्युटिंग प्रवासातील मैलाचा दगड असल्याचे नमूद केले. एक्सास्केल संगणनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एचपीसी प्रणाली, मायक्रोप्रोसेसर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञानात सातत्यपूर्ण गुंतवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (IIT Bombay)
 
दरम्यान, राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनचे मिशन डायरेक्टर डॉ. हेमंत दरबारी यांनी सांगितले की, ‘परम रुद्र’च्या कार्यान्वयनामुळे देशभरात एनएसएमअंतर्गत एकूण ३८ सुपरकॉम्प्युटर्स आणि ४४ पेटाफ्लॉप्स क्षमता उपलब्ध झाली आहे. आयआयटी मुंबईतील ही सुविधा मुंबई व परिसरातील अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांसाठी सहकार्याच्या नव्या संधी उघडणार आहे. (IIT Bombay)
 
 
Powered By Sangraha 9.0