सौंदर्यलहरी भाष्य भाग - १०

    01-Jan-2026
Total Views |

महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वधिष्टाने हृदि मरुत-माकाश-मुपरि|
मनेऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे स हरहसि पत्या विहरसे॥9॥

या लोकात श्री ललिता देवीच्या कुंडलिनी स्वरूपाचे वर्णन केले आहे. प्रत्येक मानवाचा देह हेच श्रीचक्र/श्रीयंत्र आहे. हे परमचैतन्यमय अशा शिव आणि शक्तीच्या अंशात्मक स्वरूपाचे आश्रयस्थान आहे. हेच शिवशक्तीचे पिंडस्वरूप असून, संपूर्ण जगातला व्यापणारे स्वरूप म्हणजेच ब्रह्मांड आहे. आपला पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धान्त लक्षात घेता, आपण स्वदेहातील शक्तीचे आणि शिवाचे हे स्वरूप जाणून घेतले, तर आपल्याला त्याच्या विराट आणि ब्रह्मांडाला व्यापलेल्या स्वरूपाची कल्पना करता येईल.

आचार्य म्हणतात हे त्रिपुरसुंदरी माते, तू माझ्या देहात मूलाधारचक्रात कुंडलिनी रूपाने स्थित आहेस. तिथून तू ऊर्ध्वगमन करण्यास आरंभ करतेस आणि मूलाधार चक्र भेदून अर्थात पृथ्वीतत्त्वाला आत्मसात करून, मणीपूरचक्रातील जलतत्त्वाला व्यापतेस. त्या जलतत्त्वाचे भेदन करून, तू पुढे स्वधिष्ठानचक्रातील अग्नितत्त्वाला व्यापतेस. या अग्नितत्त्वाला वश करून घेऊन, तुझा पुढील ऊर्ध्वगामी प्रवास सुरू होतो. तू त्यानंतर हृदयाजवळील अनाहतचक्राला वश करून, वायुतत्त्वावर प्रभुत्व स्थापित करतेस. इथून तू कंठस्थानी असलेल्या आकाशतत्त्वाला सिद्ध करून, भ्रूमध्य परदेशी असणाऱ्या मनस्तत्त्वाला प्राप्त करतेस. या समस्त षड्मार्गांचे अर्थात कुलपथाचे भेदन करताना, तू पंचमहाभूते आणि त्यापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या मानसतत्त्वाला वश करून, साधकाच्या देहातील सहस्रार चक्रात प्रवेश करतेस. तिथे विद्यमान असणाऱ्या सदाशिवतत्त्वाशी अर्थात परम शिवतत्त्वाशी तादात्म्य पावून, मिलनाची अनुभूती घेतेस आणि त्याच्याशी रत राहून सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होतेस. तुझ्या पतीशी तू सहस्रार चक्रात एकांतात विहार करत असतानाच, साधकाच्या या षड्चक्रांचे वारंवार भेदन करत आणि मूलाधार ते सहस्रार चक्र असे सातत्याने आणि अत्यंत वेगवान भ्रमण करत साधकाला ब्रह्मानुभूती प्रदान करतेस. तुझ्या या स्वरूपाचे चिंतन करणारा, तुझ्या या स्वरूपाला स्वदेहात अनुभवणारा साधक धन्य आहे. असा या लोकाचा शब्दशः अर्थ आहे.

भावार्थ - श्री ललितादेवी ही आपल्या शरीरात प्राणशक्ती/कुंडलिनी स्वरूपाने कार्यरत आहे. तिला जागृत करून सहस्रार चक्रापर्यंत पोहोचवणे आणि त्या चैतन्याचा बद्ध प्रवाह मुक्त झाल्याने आपल्या या जन्माला दिव्य आणि लोकोत्तर करून घेणे आणि आत्मोन्नती साधून मुक्तीच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकणे, हे प्रत्येक जीवात्म्याचे कर्तव्य आहे. हे साधण्याचे भिन्न भिन्न मार्ग आणि उपासनापद्धती आहेत. मंत्रमार्गाने आपण श्री ललिता त्रिशतीचे पठण करू शकतो. योगमार्गाने प्राणायामाने प्रारंभ करून, खेचरी मुद्रा साध्य करून या उद्दिष्टाला गाठू शकतो. श्री विद्या उपासनेतील मार्ग म्हणजे कौल मार्ग, मिश्र मार्ग आणि समय मार्ग.

कौल माग तंत्र आणि यंत्रांचा वापर करून, सिद्धीच्या रूपाने हे प्राप्त करण्यासाठी कठोर उपासनारत होतात. मिश्र मार्गातील उपासक उपासना आणि कर्म असा मिलाप साधतो. मूर्तिपूजा हा सुधा मिश्र मार्गातील उपासनाभागच आहे. समय मार्ग हा मानसपूजा, ध्यान आणि अन्तःउपासना या मार्गाचा वापर करून, कुंडलिनी जागृतीवर विश्वास ठेवतो. ‌‘समय‌’चा अर्थच ईश्वरी तत्त्वासह केलेली उपासना अर्थात, इथे अद्वैत हेच प्रमाण आहे. याशिवाय अजून एक पद्धती सध्या प्रचलित होत आहे ती म्हणजे, शक्तिपात दीक्षा घेऊन कुंडलिनी जागृती घडवणे. याबद्दल श्री देवनाथ महाराजांचे भाष्य अत्यंत बोलके आहे. त्यांच्या मते, लहान बालकाने जिना चढायला शिकणे आणि कोणी वयस्क व्यक्तीने त्या बालकाला कडेवर घेऊन जिना चढून जाणे, यामधील फरक म्हणजे शक्तिपात दीक्षा आणि उपरोनिर्दिष्ट उपासना मार्ग यातील भेद आहे.

स्वतः उपासना मार्गावर प्रवास करणे, गुरुकृपेने त्यातील गुह्यत्व जाणून घेणे, गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध प्रगती करणे, यातून आत्म्याची अपरिवर्तनीय अशी उन्नती होते. यातून साधक पुढील जन्मी आपली साधना या जन्मी जिथून खंडित होईल, तिथूनच प्रारंभ करू शकतो. शक्तिपात दीक्षा घेताना साधकाची पूर्ण पात्रता नसतानादेखील, जर गुरुने त्याच्या चेतनेला ऊर्ध्वगामी केले आणि तो साधक जर पात्र नसेल, तर ही जागृत चेतना त्याच्यासाठी वरदान न होता, श्राप होण्याचा संभवसुद्धा असतो. मातृस्वरूप देवीची उपासना म्हणजे आईकडे लेकराने हट्ट करावा आणि तिने त्याची प्रगती साधत त्याला आत्मसात करता येईल, अशा लघु स्वरूपात आणि अल्पमात्रेने ज्ञान देत त्याची प्रगती साधावी. यात मातृभाव प्रधान असल्याने, साधक देवीच्या कृपामयी दृष्टीच्या सन्मुख राहतो, त्याच्या उपासनेतील न्यूनत्व देवी स्वतः पूर्ण करून घेते. कलियुगात खरोखर सद्गुरू भेटणे आणि लाभणे ही अत्यंत दुमळ बाब आहे. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती यांचे संतुलन साधणारा मिश्र मार्ग अधिक श्रेष्ठ आहे. दीर्घ निश्चित आहे, पण त्यात अपाय होण्याचा किंवा पथभ्रमित होण्याचा संभव मात्र शून्य आहे.

शक्तीच्या मानवी देहातील षड्चक्रभेदनाचे रहस्य श्री ललिता सहस्रनामावलीत विस्तृत स्वरुपात सांगितले आहे.

श्री ललिता सहस्रनाम भाष्य लोक 38
मूलाधारैकनिलया ब्रह्मग्रंथी विभेदिनी|
मणिपुरांत्थरुदिता विष्णूग्रंथी विभेदिनी॥38॥

श्री ललिता देवीचा सूक्ष्मस्वरूपात निवास हा मूलाधारचक्राच्या मध्ये असतो. म्हणून तिचा उल्लेख मुलाधारैकनिलया असा केला आहे. मूलाधार चक्रात कुंडलिनी स्वरूपातील चेतना (‌‘कुंडलिनी‌’ या शब्दाचा अर्थ सर्प ज्याप्रमाणे वेटोळे घालून बसतो असा आहे) साडेतीन वेटोळे मारून स्थिर असते.

चेतनास्वरूप असलेल्या श्री ललितादेवीचा, साधकाच्या शरीरात कुंडलिनी स्वरूपातील प्रवास, या नामावलीमध्ये वर्णन केलेला आहे. मूलाधार चक्रात स्थित असणारी चेतनाशक्ती ज्यावेळी ऊर्ध्वगामी प्रवास सुरू करते, त्यावेळी मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र यांमध्ये ब्रह्मग्रंथी नावाची एक ग्रंथी असते. तिचे भेदन करूनच ही चेतना स्वाधिष्ठान चक्रात पोहोचते.

ध्यान करताना साधकाची विशिष्ट उन्नती झाली की, त्याला श्री ललिता त्रिपुरसुंदरी ही एखाद्या विद्युतशलाकेप्रमाणे (वीजेप्रमाणे) लखलखती दिसते. तिच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळोख असतो आणि या सौदामिनीच्या सभोवती, कमानीच्या स्वरूपातील इंद्रधनुष्यसुद्धा दिसते. अर्थात, काळ्याभोर सिंहासनावर आरूढ सौदामिनी रूपातील देवी आणि सिंहासनाचे वैभव म्हणून इंद्रधनुष्याची कमान, असे दृश्य साधकाला दिसू लागते. मणिपूर चक्र हे जलतत्त्व प्रधान आहे आणि विजेसह कोसळणारा पाऊस हे सृजनाचे, नवसृष्टीच्या निर्मितीचे प्रतीक आहे. अर्थात, ब्रह्मग्रंथीचे विभेदन केलेली चेतना नवनिर्मितीची शक्ती घेऊन निघाली आहे.

मणिपूरचक्राला ‌‘नाभीचक्र‌’ असेसुद्धा संबोधले जाते. श्री ललिता त्रिपुरसुंदरी चेतना रूपाने मणिपूर चक्रात आली की, तिथे अमृतेश्वर शिव घनश्यामरूप/मेघेश्वरस्वरूप आहेत. शिव इथे सूप्तावस्थेत असल्याने, त्यांचा उल्लेख हा ‌‘सिंहासन‌’ म्हणून केला आहे. मेघेश्वरस्वरूप शिवसिंहासनावर ती शिवाच्या वामांगी (अर्थात डाव्या मांडीवर) सौदामिनीरूपात आसनस्थ होते. ज्याप्रमाणे श्यामवण मेघ एकमेकांवर घासले गेले, की सौदामिनी अर्थात विद्युल्लता निर्माण होते आणि जडत्व प्राप्त झालेले मेघ पृथ्वीवर पावसाच्या रूपाने कोसळण्यास उद्युक्त होतात, त्याचप्रमाणे अमृतेश्वर शिव श्री ललिता देवीच्या सौदामिनीरूपात जागृत होऊन, हर अर्थात अग्नी व मिहीर अर्थात सूर्य यांच्या तेजाने तप्त झालेल्या पृथ्वीवर वर्षाव करण्यास उद्युक्त होतात. त्याचे प्रतीक म्हणूनच साधकाला इंद्रधनुष्यसुद्धा दिसते.

मणिपूर चक्रातून आज्ञाचक्राकडे जाताना विष्णू ग्रंथी लागते. तिचे भेदन करून श्री ललिता त्रिपुरसुंदरीरूपी चेतना, साधकाच्या आज्ञाचक्रात प्रवेश करते. विष्णू हा विश्वाचा पालनकर्ता आहे. ज्यावेळी चेतना विष्णूग्रंथीचे भेदन करते, याचा अर्थ आता साधक पालनपोषणासाठी भौतिक पातळीच्या अन्नावर अवलंबून नाही. सहस्रारातून पाझरणारा स्रावच त्याचे पालनपोषण करण्यास समर्थ आहे. अर्थात साधक विष्णूतत्त्व ओलांडून पुढे गेला आहे.

- सुजीत भोगले