वर्षभरात भारतीय गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’च्या माध्यमातून, तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक केली, तर भांडवली बाजारात आलेल्या ‘आयपीओं’ची कामगिरीही लक्षणीय ठरली. जागतिक संकटकाळातही भारतीय गुंतवणूकदारांचा कल सावधरित्या बदलताना दिसला. त्याचा हा मागोवा...
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अर्थात ’ॲम्फी’ या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2025 या वर्षात गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’ हा गुंतवणुकीचा पर्याय मोठ्या प्रमाणात निवडला. तीन लाख कोटींच्या पार पोहोचलेल्या गुंतवणुकीमुळे, एकूण ‘म्युच्युअल फंडां’च्या भांडवलात 14 लाख कोटींची एकूण वाढ झाली. किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, ‘एसआयपी’तील विक्रमी गुंतवणूकीमुळे नोव्हेंबरअखेरीस ‘एसेट अंडर मॅनेजमेंट’ (एयूएम) 81 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ’ॲम्फी’ ही भारतातील ‘म्युच्युअल फंड’ उद्योगाची सर्वोच्च संघटना असून, ती उद्योगासाठी धोरणात्मक मार्गदर्शन, नियामक पालन आणि गुंतवणूकदार जागरूकतेचे काम करते.
‘ॲम्फी’चे ‘सीईओ’ वेंकट चालसानी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘एसआयपी’त होणारी गुंतवणूक ही परकीय गुंतवणूकदारांनी घेतलेल्या आखडत्या हाताला उत्तर ठरली आहे. जागतिकस्तरावर असलेल्या अस्थिरतेचा फटका, यंदाही भांडवली बाजार आणि भारतीय ‘म्युच्युअल फंड्स’ना बसला होता. मात्र, भारताच्या वाटचालीवर विश्वास ठेवत, गुंतवणूकदारांनी विक्रम नोंदविला आहे. मोठ्या कंपन्यांचे समभाग, संमिश्र गुंतवणूक आणि गुंतवणूक पर्यायांच्या रणनीतीला पर्याय ठरत आहेत.
‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, निव्वळ गुंतवणुकीचा ओघ हा सात लाख कोटींइतका होता, तर गुंतवणूकदारांची एकूण संख्या 3.36 कोटी इतकी होती. ‘एसआयपी’त याच सुमारास तीन लाख कोटींची गुंतवणूक झाली. यामुळे ‘म्युच्युअल फंड’ उद्योगांची व्यवस्थापनातील एकूण मालमत्ता 2024च्या अखेरीस, 67 लाख कोटींवरून नोव्हेंबर 2025 अखेर 81 लाख कोटींवर पोहोचली. ही वाढ तब्बल 21 टक्क्यांची होती. भांडवली बाजारातील चढता आलेखच याचे प्रमुख कारण ठरला.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी थोडसे का होईना, धाडस दाखवले. त्यामुळेच मुदत ठेवींऐवजी ‘एसआयपी’कडे वळण्याचा कल वाढला. भारतीय गुंतवणूकदार पूवपासूनच गुंतवणुकीच्या बाबतीत सजगच! याशिवाय, सोन्यातील पारंपरिक गुंतवणूक, हा सर्वांचाच आवडता पर्याय. मात्र, या काळात सोन्याच्या भावाने गाठलेली उंची धडकी भरवणारी होती. सोन्याच्या गुंतवणूक वाढीला कारण म्हणजे जागतिक बाजारपेठीतील अनिश्चितता. ‘रशिया-युक्रेन’चे न संपणारे युद्ध, ट्रम्प सरकारचे ’टॅरिफ वॉर’, चीनची ठरावीक गोष्टींवरील मक्तेदारी या गोष्टी सोन्याच्या भाववाढीला कारणीभूत ठरल्या. भविष्यात असा धोका तांबे या धातूबद्दलही निर्माण होऊ शकतो. जग ‘एआय’ डेटा केंद्रांच्या उभारणीत गुंतवणूक करत असताना, पारंपरिक ऊर्जास्त्रोत, धातूंवर अवलंबून असलेल्या देशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहेच. अशा कठीण काळातही, भारतीयांनी गुंतवणुकीलाच प्राधान्य दिले, हे प्रकर्षाने अधोरेखित करावे लागेल.
गेल्या काही काळात गुंतवणूक आधारित ‘ॲप्स’चा वाढता वापर, सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणाऱ्या गुंतवणुकीचे पर्यायही याला कारणीभूत आहेत. नोंदणी आणि ‘केवायसी’ प्रक्रियेतील सुलभता, थेट ‘यूपीआय’द्वारे गुंतवणुकीची सोय याचा एकत्रित परिणाम दिसून आला. काही कंपन्यांनी गुंतवणूक ही केवळ उच्च मध्यमवर्गापुरती मर्यादित न राहता, सर्वसामान्यांसाठीही असल्याबाबत जनजागृतीही केली. परिणामी, मध्यमवगय व गरीब कुटुंबातील व्यक्तींनाही आपण छोटी रक्कम गुंतवू शकू, असा विश्वास झाला. मुदत ठेवी, आवर्त ठेवींपेक्षा जास्त रक्कम देणाऱ्या ‘म्युच्युअल फंडा’ची गरज गुंतवणूकदारांच्या लक्षात आली. किमान 500 ते हजार रुपयांपासून सुरू झालेल्या गुंतवणुकीने, त्यांच्यात विश्वास जागृत झाला. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याची माहिती, गुंतवणुकदारांच्या मोबाईलवर मिळू लागली. त्यामुळे विश्वासार्हता अधिकच वाढली. विशेषतः महिला, ‘जेन-झी’ आणि गृहिणींनाही, हा गुंतवणुकीचा यशस्वी राजमार्गच वाटू लागला.
गेल्या पाच वर्षांचा काळ हा विश्वास, शिस्त आणि पारदर्शकतेचा काळ ठरला. ‘एसआयपी’ आता देशाच्या आर्थिक योगदानात हातभार लावू शकेल, अशा स्थितीत आहे. त्यामुळे ‘म्युच्युअल फंड’ केवळ पर्याय न राहता, गुंतवणूदारांसाठी मुख्य प्रवाह बनला आहे. एकूण 97 टक्के ‘एसआयपी’ गुंतवणूकदार, यशस्वी झाल्याचाही नवा विक्रम आहे. ‘सेबी’ने केलेल्या सुधारणांमुळे पारदर्शकता वाढली, त्याचबरोबर खर्चही कमी झाले. 2035पर्यंत भारताचे ‘म्युच्युअल फंड’ क्षेत्र ‘असेट अंडर मॅनेजमेंट’ 300 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, असेही हा अहवाल सांगतो.
गुंतवणुकीच्या या कलासाठी राजकीय स्थिरताही कारणीभूत आहे. भारतात असलेले स्थिर सरकार, तसेच राज्याराज्यांत असलेले डबल इंजिन सरकार, होऊ घातलेले विकास प्रकल्प, जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा ओघही याला कारणीभूत आहे. अशीच कामगिरी ‘आयपीओ’च्या गुंतवणुकीतही झाली. 2025 हे वर्ष ‘आयपीओ’ गुंतवणूदारांसाठीही दमदारच ठरले. मोठ्या संख्येने विविध बाजारातील ‘आयपीओं’नी मजबूत कामगिरी केली.
अभियांत्रिकी, औषधे, ई-उत्पादने, वाहन उद्योग, सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रातील उत्पादनांच्या कंपन्यांनी, आपले ‘आयपीओ’ बाजारात उतरवले. 2025 या वर्षात एकूण 356 इतके ‘आयपीओ’ नोंदणीकृत झाले, ज्यातील 106 ‘मेनबोर्ड’ आणि 259 हे ‘एसएमई प्लॅटफॉर्म’वर सूचीबद्ध झाले. यातील ‘मेन आयपीओ’तील भांडवल हे एक लाख, 83 हजार कोटींचे झालेे. ‘एसएमई आयपीओ’ तर शंभर टक्क्यांहून अधिक सबस्क्राईब झाले. काहींनी 40 ते 60 टक्के ‘प्रीमियम’ दिला, तर काही ‘इश्यू प्राईज’च्या खाली घसरले. काहींनी निराशा केली असली, तरीही बाजाराने 1.75 लाख कोटी उभारले आहेत. भांडवली बाजारातील नियामक मंडळाने ठेवलेला वचक याचे मुख्य कारण आहे. 2026 या वर्षात ‘एसआयपी’ आणि ‘आयपीओ’ अशा दोन्ही गुंतवणूक माध्यमांची लाट अपेक्षित आहे कारण, येणारा काळ ‘एआय’, ‘डेटा सेंटर’, नव्या तंत्रज्ञानातील बदल घेऊन येणारा आहे. भारतातील निमशहरी भागांपर्यंत पोहोचलेल्या या गुंतवणुकीच्या माध्यमांना, अद्याप गावखेड्यातील तरुण, महिला आणि कमावत्या वर्गाकडे पोहोचण्यास अवकाश आहेच. त्यामुळे या क्षेत्रालाही भवितव्य आहे.
(कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करत असताना आपल्या गुंतवणूक सल्लागार किंवा ‘सीए’ आदींची मदत घ्या.)