बांबू-कारवीप्रमाणे कोच वनस्पतीमध्येही एकफलिकपणा; सिंधुदुर्गातील चौकुळच्या सड्यावरुन पहिलीच नोंद

    01-Jan-2026
Total Views |
Lepidagathis Monocarpic



मुंबई (अक्षय मांडवकर) –
प्रामुख्याने सड्यांवर/पठारांवर उगवणाऱ्या लेपिड्याग्याथिस म्हणजेच कोच कुळातील वनस्पतीमध्ये एकफलिकपणाची नोंद वनस्पतीशास्त्रज्ञांनी केली आहे (Lepidagathis Monocarpic). ही नोंद लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा या प्रजातीच्या बहरामध्ये नोंदविण्यात आली असून कारवी आणि बांबूप्रमाणे लेपिड्याग्याथिस कुळातील ही प्रजात देखील तिच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच बहरत असल्याचे पहिल्यांदाच दिसून आले आहे. (Lepidagathis Monocarpic)
 
 
 
कोंकण आणि घाटमाथ्यावरील सड्यावरील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती म्हणजे लेपिड्याग्याथिस, जिला स्थानिक भाषेत कोच असे म्हणतात. आता या कुळातील लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा या प्रजातीमध्ये एकफलिकपणा म्हणजेच मोनोकार्पिक प्लेटेशियल प्रवृत्ती आढळ्याची नोंद वनस्पतीशास्त्रज्ञांनी केली आहे. मोनोकार्पिक म्हणजे अशी वनस्पती जी तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच फुले आणि फळे देते आणि त्यानंतर मरते. मराठीमध्ये याला एकफलिक किंवा एकवेळफळी म्हणतात.
 
 
क्लाव्हाटा या प्रजातीचा समावेश धोक्यात असलेल्या वनस्पतींच्या यादीत नष्टप्राय (Critically endangered- IUCN) श्रेणीत होतो. १८५१ साली एन. ए. डॅल्झेल याने या वनस्पतीचा शोध चोर्ला (बेळगाव) गावच्या सड्यांवरून लावला. नंतर जवळजवळ १६६ वर्षांनी पुन्हा ही वनस्पती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या सड्यांवरुन डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधून काढली. त्यानंतर डॉ. ऋतुजा कोलते- प्रभूखानोलकर (द ग्रीन कॉन्सेप्ट, पुणे सोबत संलग्न) आणि त्यांचे सहकारी राहुल प्रभूखानोलकर (जी एस एस कॉलेज, बेळगाव), प्रभा पिल्ले (केरळ), डॉ शरद कांबळे (म. वि. प्र. समाज संस्थेचे कॉलेज, त्र्यंबकेश्वर), डॉ ज्ञानशेखर (एम. सी. सी. कॉलेज, चेन्नई), डॉ. जनार्थनमं (गोवा) यांच्या आठ-नऊ वर्षे सुरु असलेल्या सखोल निरीक्षणांनुसार असे लक्षात आले की, ही प्रजाती दरवर्षी फुलत नाही. त्यांनी हे संशोधन जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा मध्ये प्रकाशित केले आहे. त्यांचे निरीक्षण असे आहे कि, नोव्हेंबर २०१६ मध्ये चौकुळ येथील कोच ची सर्व झाडे फुलली होती. त्यानंतर २०१७ च्या पावसामध्ये सर्व झाडे मरून नवीन रोपे तयार झाली आणि सात वर्षांच्या कालावधीनंतर २०२४ नेव्हेम्बर मध्ये झाडे परत फुलली. या प्रजातीच्या जीवनचक्राबाबत अधिक निष्कर्ष काढण्यासाठी सविस्तर अभ्यास आणि सातत्यपूर्ण निरीक्षणांची आवश्यकता आहे.
 
 
मोनोकार्पिक म्हणजे काय ?
मोनोकार्पीक प्लेटेशियल प्रवृत्तीच्या प्रजातींचे वैशिठ्य म्हणजे एका ठिकाणची सगळी झाडे एकाच वेळेला फुलतात, आणि फळांमधील बी परिपक्व झाली की, सर्व झाडे मरुन जातात. बियांपासून नवीन रोपे तयार होऊन पूर्ण वाढ झाल्यावरच परत फुलतात. यामुळेच आपल्याला कारवीची किंवा बांबूची फुले दरवर्षी दिसत नाहीत, ठराविक कालावधीने दिसतात. लेपिड्याग्याथिस कुळातील बहुतांश प्रजाती प्रदेशनिष्ठ असून त्यांच्यामध्ये सुद्धा असे निरीक्षण आढळण्याची दाट शक्यता आहे. - डॉ. ऋतुजा कोलते, वनस्पतीशास्त्रज्ञ