किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राची आणि राज ठाकरेंची माफी मागावी : मारुती दळवी
01-Jan-2026
Total Views |
प्रभाग क्रमांक १९९ मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेले मनसेचे शाखाप्रमुख आणि इच्छुक उमेदवार सौ. संगीता दळवी यांचे पती मारुती दळवी यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारत प्रतिनिधी अभिनंदन परूळेकर यांनी केलेली बातचीत.
१. तुमच्या नाराजीचे कारण काय ?
किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राची आणि राज ठाकरेंची जाहीर माफी मागावी हीच इच्छा आहे. गिरणी कामगाराची मुलगी असलेली सौ.संगीता मारुती दळवी यांची तगडी उमेदवारी मनसे तर्फे दिली होती. पण आम्हाला डावलून किशोर पेडणेकर यांना प्रभाग क्रमांक १९९ साठी उमेदवारी दिली. किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्याचे काय झाले. मराठी माणसासाठी आम्ही खूप खस्ता खाल्या आहेत.
२. नाराजी नंतर कुणाशी चर्चा झाली आहे ?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली नाही पण मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक १९८ मध्ये पाठिंबा जाहीर केला आहे. आणि प्रचार सुरू केला आहे.
३. प्रभाग क्रमांक १९९ बाबत काय भूमिका आहे ?
किशोरी पेडणेकर यांनी माफी मागितली की प्रचाराचे काम अजून जोरात सुरू करणार आहे. तसेही काम सुरू केले आहे.पण आम्ही आमचे उमेदवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानून काम करतो.
४. किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल काही प्रतिसाद दिला आहे का?
मला याबाबत काही कल्पना नाही.माझी भावना वयक्तिक नाही तर असंख्य मराठी माणूस जो राज ठाकरेंवर प्रेम करतो त्याचा आदर करावा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राज ठाकरे खरे वारसदार आहेत.त्यामुळे राज ठाकरेंसाठी अम्ही काहीही करू शकतो.
५. पैसा जिंकला आणि काम हरले असे मत तुम्ही व्यक्त केले होते ?
महाराष्ट्राच्या हितासाठी त्या विषयावर पडदा पडला आहे.माझ्या बोलण्याला राज्यातून पाठिंबा आहे तो राज ठाकरे यांच्याकडे बघून आहे.त्यामुळे अशा मराठी माणसाला नाराज करून कोण जिंकू शकत नाही.
६. मनसेच्या जागा बाबत आपण समाधानी आहात काय ?
महाराष्ट्रासाठी आम्ही समाधानी आहोत.पण किशोरी पेडणेकर या राज ठाकरे यांच्याबद्दल पातळी सोडून जे बोलल्या त्यांची जी अवहेलना केली त्याबद्दल आम्ही नाराज आहोत. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे तिथे हे शोभत नाही. मराठी माणसाला फसवून मतदान अम्ही मागत नाही.ठाकरे घराण्याबद्दल अपशब्द देखील सहन करणार नाही.हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.इथला इतिहास मोठा आहे.