गेम झाला भावा!

    01-Jan-2026   
Total Views |

जराही अभ्यास न केलेला विद्यार्थी परीक्षेत पेपरमध्ये काहीबाही लिहून, पेपर कोरा न सोडल्याचे जसे हे समाधान बाळगतो. अगदी तसेच समाधान काँग्रेसने, ‌‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी‌’मध्ये मिळवले. काँग्रेसने समाधानी चित्र उभे केले की, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत संपूर्ण मुंबईत उमेदवार उभे करणार पण, प्रत्यक्षात 16 ठिकाणी काँग्रेस आणि आघाडीचे अधिकृत उमेदवार उभे राहिलेच नाहीत. तसेही अभ्यासच केला नाही, तर कुठे पास होणार? हे आधीच माहित असलेल्यांना पास किंवा नापास होण्याचे काही एक सोयरसुतक नसतेच. तसेच काहीसे काँग्रेसचे आहे का? काही लोक म्हणतात, ‌‘आपल्याबरोबर गेम झाला भावा!‌’ अशी विधाने असलेल्या ‌’रिल्स‌’ समाजमाध्यमांवर आपण नेहमीच पाहतो. हे वाक्य सत्य वाटावे, असा ‌’गेम‌’ मुंबईत सध्या काँग्रेसबरोबर झालेला दिसतो.

तसेही काँग्रेस आणि वंचित बहुजन पक्षाची बातच और! संविधान रक्षणासाठी म्हणे हे दोघे एकत्र आले. काँग्रेस मुंबईत 150 वॉर्ड लढवणार, तर बहुजन आघाडी 62 जागा लढवणार हे ठरले होते. ‌‘वंचित‌’च्या वाटेला या आघाडीत 62 जागा मिळाल्या पण, ‌‘वंचित‌’ने त्यापैकी 21 जागा पुन्हा काँग्रेसला परत केल्या. त्या 21 पैकी फक्त पाचच जागांवर, काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरले. बाकी 16 जागांवर ना काँग्रेसचे अधिकृत उमेदवारांनी, ना ‌‘वंचित‌’च्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज भरले. यापैकी अनेक जागांवर तर पक्षाच्या बंडखोरांचे समर्थन करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. ‌‘तुला न मला, दे बंडखोर अपक्षांना‌’ असे अभूतपूर्र्व कार्य काँग्रेस आघाडीने केले. ‌‘उमेदवार नव्हते, तर ‌‘वंचित‌’ने हे वॉर्ड का मागून घेतले?‌’ असा प्रश्न आज काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. तर, वंचित बहुजनवाल्यांचे म्हणणे असे आहे की, ‌‘ज्या जागांवर आमचे प्राबल्य नाही, त्याच जागा आम्हाला दिल्या.‌’ पण, यावर काहींचे मत वेगळे वाटते. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरवण्यासाठी वाट्टेल ते केले, त्यामुळेच ‌’वंचित‌’ने मुंबईत काँग्रेसचा गेम केला. या सगळ्यामुळे ‌’वंचित‌’च्या प्रकाश बापूंसाठी काँग्रेस विरोधकांकडून अनेकोआशीर्वाद आणि काँग्रेस समर्थकांकडून? जाऊदे, आपल्याला काय? पण, काँग्रेस आणि ‌‘वंचित‌’ या दोन पक्षांना मुंबईत उमदेवारी अर्ज भरता आले नाहीत, याचेही खापर ते मोदी-फडणवीसांवरच फोडतील, यात शंका नाही.

नगरसेवकपद...

उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक कसे रडतात, चक्कर येऊन पडतात, भांंडण करत कसे पक्षाला आणि नेत्यांना ‌‘पळता भुई थोडी‌’ करतात, हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी पाहिले. ‌‘नगरसेवकपद‌’ या पदामध्ये अशी काय जादू आहे की, लोकांनी रडून-रडून असा आकांत केला असेल? अर्थात, ‌‘जावे त्यांच्या वंशा...‌’ म्हणा. नगरसेवक झाल्यावर सत्तेची दारे उघडतात, त्याद्वारे रुबाब आणि परिसरात हवे ते करण्याची शक्ती मिळते, असे आहे का? 99 टक्के लोकांना वाटते की, नगरसेवक झाले की हे सगळे आपसूकच चालत येते. अर्थात, मानवीपणाच्या आदर्शत्वाचा कळस गाठलेले काही जण म्हणतीलही, की “छे, छे! नगरसेवकपद यासाठी नसतेच मुळी. वॉर्डातील जनतेची सेवा करण्याचेच ते साधन आहे.” वा, वा! हे विधान एकूनच धन्य झाल्यासारखे वाटते. यानुसार, नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळवलेल्यांचे मत काय असेल? त्यांना का नगरसेवक व्हायचे असेल? जनतेच्या सेवेसाठी? गटर, मिटर, वॉटर, रस्ते आणि इतर सुविधांच्या विकासासाठी? (काही उमेदवारांचे हे प्रामाणिक मत असेलही.)

दुसरीकडे निवडणुकीमध्ये उमेदवाचे निकष काय? त्याबाबतची पक्षांची नियमावली काय आहे? असे प्रश्न कार्यकर्ते नेत्यांना विचारत आहेत. याचे उत्तर उघड गुपितच आहे. राजकीय पक्षांना हे सगळे करावेच लागते, यालाही जनता आणि राजकीय नेतेच जबाबदार आहेत. कारण, ‌’तो ‌’किंवा ‌’ती‌’ नगरसेवक झाल्यावर पैसे कमावेल; पण मला काय मिळणार? अशी वृत्ती फोफावली आहे. निवडणुकील कमावण्याचे दिवस मानणारे कार्यकर्तेही तयार झाले. तसेच निवडणुकीच्या काळात जनतेला तात्पुरते खूश केले की झाले, हा समज नेत्यांमध्येही निर्माण झाला. त्यामुळेच जनतेला खूश करण्याची क्षमता असलेले ‌’अर्थपूर्ण‌’ उमेदवार उभे करणे, ही राजकीय पक्षांची अपरिहार्यता ठरत असावी. या सगळ्या गदारोळात मुंबई कधीच कुणी महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, हे सत्य जाणलेल्या आणि देव-देश-धर्मासाठी संकल्प करणाऱ्या मतदारांवरचीच जबाबदारी वाढली आहे. या संकल्पधारी मतदारांना आवाहन एकच, मतदार राजा जागा हो, शतप्रतिशत मतदान करण्यासाठी पुढे हो!


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.