पुणे : (Bunty Jahangirdar) पुणे जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला दोन जणांनी दुचाकीवरून येत जहागीरदारवर (Bunty Jahangirdar) गोळ्या झाडल्या होत्या. या दोघांना कोपरगाव हद्दीतून अटक करण्यात आली आहे. घटना घडताच जिल्हाभर कडक नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदीमुळे आरोपींना पळून जाण्यात अपयश आलं आहे. बंटी जहागीरदारवर गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. अहमदनगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्येही नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. आरोपी रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे हे दोघे कोपरगावमार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी बंटी जहागीरदारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मयत बंटी जहागीरदारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बंटी जहागीरदार कब्रस्तानमधून आपल्या घरी परत होते. यावेळी आरोपींनी अचानक येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर तातडीने जहागीरदारला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. (Bunty Jahangirdar)