नववर्षाच्या पूर्वसंध्येला २२४ मद्यपी चालकांसह १२ जणांवर कारवाई
01-Jan-2026
Total Views |
ठाणे : थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. असे आवाहन करून जनजागृती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असुन गतवर्षीच्या तुलनेत यंदा मद्यपी चालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ३१ डिसेंबर या नववर्षाच्या पुर्वसंध्येला २२४ मद्यपी चालकांसह १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २२४ जणांवर मोटार वाहन कायदा १८५ अनुसार तर, वाहन चालकांसोबतच्या १२ जणांवर मोटार वाहन कायदा १८८ अनुसार कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी एकुण ३११ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती ठाणे शहर वाहतुक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या क्षेत्रातील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत एकुण १८ वाहतुक कक्ष कार्यरत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतुक शाखेत ५९ अधिकारी व ६८० कर्मचारी असे एकुण ७३९ इतक्या मनुष्यबळाच्या साथीने एकुण ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या तपासणीत तब्बल २२४ मद्यपी चालक तावडीत सापडले. तर १२ सहप्रवाश्यांवर कारवाई केली. यात वाहन चालकांवर वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री केलेल्या कारवाईमध्ये ठाणे विभागात - ५९, वागळे विभागात - ३३, भिवंडी विभागात - ४९, कल्याण विभागात - ६५ आणि उल्हासनगर विभागात- ३० अशी एकुण २३६ जणांवर कारवाई केल्याची माहिती वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.