आपल्या अंगातील व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर समर्पित भावनेने वेल्हा तालुक्यातील ग्रामस्थांच्या जीवनात आनंदाचा मळा फुलवणाऱ्या रमेश आंबेकर यांच्याविषयी...
गेली 39 वर्षे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात ‘तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यासा’च्या मार्फत अनेक गावांमध्ये पाणी आणण्याचे, स्वयंरोजगार निर्मितीचे कार्य अविरत सुरु आहे. गेल्या 25 वर्षांपासून रमेश आंबेकर या प्रकल्पावर, व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. रमेशराव याठिकाणी येण्याआधी पूवच्या संस्था कार्यकारिणीने न्यासाला स्थिरस्थावर केले. सन 2002 मध्ये रमेश आंबेकर यांनी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी तालुक्यात ग्रामविकासाच्यां कामांचे एक मोठेच आव्हान, संस्थेपुढे होते. मात्र रमेशरावांनी ही जबाबदारी लीलया पार पाडत, वेल्हे तालुक्यातील अनेक गावांचा कायापालट करण्यात मोलाची भूमिका बजावली.
रमेशरावांचे मूळ गाव खेड तालुक्यातील राजगुरुनगरजवळील कान्हेवाडी! त्यांचे आईवडील नोकरीसाठी पुण्यात आले; परंतु रमेशराव आणि त्यांच्या भावाचा सांभाळ गावाकडे आजी-आजोबांनीच केला. त्यामुळे रमेशरावांचे बालपण गावीच गेले. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षणही गावातीलच शाळेत झाले. लहानपणीच ते गावातील संघाच्या शाखेतही जाऊ लागले. त्यामुळे हरिपाठाच्या संस्काराबरोबरच, संघाचे संस्कारही त्यांच्या मनावर झाले. बारावीनंतर त्यांनी ‘आयटीआय’ केला; पुढे संघाचा प्रचारक व्हायचे हे त्यांनी आधीच ठरवले होते. मात्र, अल्पशिक्षणावर प्रचारक म्हणून जायचे नाही, हे देखील त्यांनी मनोमन निश्चित केले होते. या प्रेरणेतूनच त्यांनी पदवीचे शिक्षणही घेतले. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे, दौंड तालुका प्रचारक म्हणून काम पाहिले. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर त्यांनी, शिवापूर येथील कृषी तांत्रिक विद्यालयात काही काळ ‘वेल्डिंग’ हा विषयही शिकवला. मात्र, काही कारणास्तव तिथले काम थांबल्यानंतर, त्यांनी मंचर येथे एका दूध डेअरीतही नोकरी केली.
संघाच्या स्वयंसेवकांना समाजकार्याची एकदा का ओढ लागली तर, फारकाळ ते तग धरू शकत नाहीत. रमेशरावांच्या बाबतीतही हेच झाले. त्यांनी प्रवीण दबडगाव आणि प्रकाश मीठभाकरे यांच्याकडे एखाद्या प्रकल्पावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, त्यांना वेल्हे येथील ‘तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यासा’ची जबाबदारी देण्यात आली. वेल्हे तालुक्याविषयी सांगायचे झाले, तर हा तालुका पावसाळ्यात अगदीच समृद्ध असतो. पावसाळ्यात समृद्धतेचे लेणे नेसलेला हा तालुका, उन्हाळ्यात मात्र अतिशय रूक्ष होतो.या तालुक्यात पाणी साठवण्यासाठी विहिरी, शेततळी, बंधारे असे प्रकल्पच नसल्याने, या भागात एकप्रकारचा कोरडेपणा जाणवतो. वाहतुकीची व्यवस्था नसल्याने मुलांच्या शिक्षणामध्येही मोठ्याच अडचणी येतात. त्यात मुलींचे शिक्षण म्हणजे पालकांना मोठाच भार वाटतो.
अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी, रमेशरावांनी शथचे प्रयत्न करुन, अनेक समस्यांवर यशस्वी तोडगदेखील काढले. गावांतील मुलांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर, त्यांनी एकतर शिक्षण सोडून द्यायचे किंवा भाड्याने खोली घेऊन वेल्ह्याला राहायचे, हा तेथील शिरस्ता. हे शक्य नसेल तर पुण्याला नोकरीसाठी जायचे, हा दुसरा मार्ग! न्यासातर्फे वेल्हे गावातच गरजू विद्यार्थ्यांसाठी मुलांचे वसतिगृह उभारण्यात आले. तिथे शिक्षणाबरोबरच संस्कारांची शिदोरीदेखील मिळाल्याने, शेकडो मुलांचे भवितव्य आज घडले आहे. अनेक मुले पोलीस, वकील, इंजिनिअर झाली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांबरोबरच मुलींसाठीसुद्धा घर ते शाळा मोफत वाहनव्यवस्था सुरू करून, दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे. ग्रामीण भागात जाणवणारी आरोग्याची समस्या खूपच मोठी ! ही समस्या ओळखून, रमेशरावांनी संस्थेच्या माध्यमातून गावोगावी आरोग्यरक्षक नेमले. यामध्ये गावातील बारावी किंवा पदवीधर तरुणाला प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण दिले गेले. अनेक गावांतून आज, जनावरांसाठीची पशुवैद्यकीय शिबिरेही घेतली जातात. महिलांनासाठी बचत गट, व्यवसाय प्रशिक्षण असे उपक्रम चालविले जातात. ‘गाव तिथे विहीर’ या उपक्रमाद्वारे आतापर्यंत चौदा गावांत विहिरी बांधण्यात आल्या आहेत, अनेक गावांत सौरपंप बसवण्यात आले आहेत. गावातील अनेक पुरुषांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कुक्कुटपालन, पर्यटन, गोधडी-पिशव्या शिलाई, करवंद लोणचे, हातसडीचा तांदूळ, मधुमक्षिका पालन, परसबाग उत्पादन, बांबू उत्पादने अशा उपयुक्त व्यवसायांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. रमेशरावांची या सर्व कार्यामध्ये अग्रेसर भूमिका आहे. आज संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या आणि रमेशरावांच्या व्यवस्थापनात संस्थेची नवीन इमारत उभी राहात आहे. यामध्ये सुमारे 100 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे. त्याचबरोबर ग्रामविकासाचे प्रकल्पही तिथे राबवले जाणार आहेत. या कार्यामुळेच संस्थेला वेल्हे परिसरातील अनेक मंडळांचे, सेवा संस्थांचे, तसेच राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. आगामी काळात संस्थेची प्रगती वाढत जावो आणि रमेश आंबेकर यांच्यासारखे अनेक सेवाव्रती कार्यकर्ते संस्थेला मिळावेत, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.