काय आहे नेमकं अभिनेत्रीचं गजरा प्रकरण? ज्याने ऑस्ट्रेलियात उडाली खळबळ

08 Sep 2025 19:40:47


मुंबई : केसात माळलेल्या गजऱ्यामुळे मोठा गोंधळ उडून तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. होय हे अगदी खरं आहे. नुकतंच एका अभिनेत्रीसोबत असंच घडलं आहे. केसात फुलांचा गजरा माळल्यामुळे तिला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. इतकच नाही तर त्यासाठी तिला मोठी रक्कम दंड म्हणूनही भरावी लागली. यामुळे या अभिनेत्रीला मात्र मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

दरम्यान हे प्रकरण नेमकं आहे तरी काय,
दाक्षिणात्य मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायरसोबत हा प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओनम समारंभात सहभागी होण्यासाठी ती गेली होती, मात्र तिथे गेल्यावर तिच्यासोबत असं काही घडलं, ज्याची तिने कधी स्वप्नानतही कल्पना केली नव्हती. यावेळी ती अगदी पारंपरिक भारतीय पेहरावात मेलबर्नला पोहोचली. सुंदर साडी त्यावर केसांमध्ये पांढऱ्या फुलांचा गजरा असा पेहराव तिने केला होता.

अभिनेत्री नव्या मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच तिची चौकशी सुरु झाली. कारण तिच्या हँडबॅगमध्ये चमेलीची फुले असल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिला थांबवले. १५ सेंटीमीटर लांबीचा छोटासा चमेलीचा गजरा नेल्याबद्दल तिला १९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा (अंदाजे १.२५ लाख रुपये) मोठा दंड भरावा लागला. ओनम सेलिब्रेशनदरम्यान, तिने मंचावरून स्वतःच ही घटना शेअर केली. नव्याने सांगितले की तिच्या वडिलांनी कोची विमानतळावरून तिच्यासाठी हा गजरा खरेदी केला होता. त्यांनी तो गजरा दोन तुकड्यांमध्ये विभागला होता. त्या गजऱ्याचा एक भाग नव्याने कोचीहून सिंगापूरला जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान केसांत माळला होता, मात्र सिंगापूरला पोहोचेपर्यंत तो गजरा, फुलं कोमेजली होती. म्हणून तिने गजऱ्याचा दुसरा भाग कॅरी बॅगमध्ये पॅक करून तिच्या पर्समध्ये ठेवून दिला. सिंगापूरला पोहोचल्यावर ती तो गजरा घालणार होती. पण ऑस्ट्रेलियाला अशा प्रकारे फुलं घेऊन जाणं हे कायद्याच्या विरोधात आहे हे नव्याला माहीत नव्हतं. त्यामुळ विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तिची बॅग तपासली तेव्हा चमेलीची फुले पाहून त्यांनी तिला थांबवले आणि लगेच दंड ठोठावला. या सगळ्या प्रकाराने नव्या खूपच गोंधळून गेली होती.






View this post on Instagram
















A post shared by Navya Nair (@navyanair143)



परंतू त्यानंतर ती ओनम सेलिब्रेशनसाठी पोहोचली या दरम्यान तिने या कार्यक्रमात हा संपूर्ण प्रकार सांगितला. यावेळी ती म्हणाली, “मला माहित आहे की मी चूक केली आहे, पण ती जाणूनबुजून केलेली नाही. मी फक्त माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून गजरा घेऊन जात होते. त्यांनी मला २८ दिवसांच्या आत दंड भरण्यास सांगितले आहे” असंही ती म्हणाली.

ऑस्ट्रेलियाचा कायदा नेमकं काय सांगतो,
दरम्यान आपल्या देशात जसे कायदे आहेत त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया देशाचे काही वेगळे नियम आहेत. तर जैव-सुरक्षा कायदा या बाबतीत खूप कडक आहे. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सच्या वेबसाइटनुसार, सरकारी परवानगीशिवाय ‘वनस्पती, फुले आणि बिया’ यांसारखे जैविक साहित्य देशात आणण्यास मनाई आहे. कारण हे पदार्थ कीटक, रोग आणि जैविक असंतुलन निर्माण करू शकतात. विशेषतः ज्या फुलांवर आणि बियांवर माती, पाने, शेंगा किंवा देठांचे अवशेष असतील त्यांना धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. ही घटना म्हणजे परदेशात प्रवास करताना स्थानिक वस्तू सोबत घेऊन जाणाऱ्या सर्वांसाठी एक इशारा आहे. त्यामुळे परदेशातले कायदे जाणूनच प्रवास करणं सोईचं आहे.


Powered By Sangraha 9.0