२०३० नंतर येणारी ३० वर्षे भारताच्या सुवर्णकाळाची असणार आहेत - सुहासराव हिरेमठ
08-Sep-2025
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : आज भारताला जातीयतेच्या आधारे फोडण्याचा देशांतर्गत व परदेशातून प्रयत्न सुरू आहे. भारतातील काही जातीय शक्तींबरोबरच आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांसारखे लोक देखील जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु संघाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की, २०३० नंतर येणारी पुढील ३० वर्षे भारताचा सुवर्णकाळ असणार आहे. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी व्यक्त केले. रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सैनिकी शाळेत संघ शताब्दीनिमित्त जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरण कार्यक्रमात सुहासराव बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, गांधीजींच्या हत्येनंतर अनेक हृदयद्रावक घटना महाराष्ट्रात घडल्या. साताऱ्यातील एका गावात फक्त आडनाव गोडसे आहे, म्हणून एका कार्यकर्त्याला आणि त्याच्या दोन मुलांना जिवंत जाळण्यात आले. संघाचे कार्य अशा कठीण परिस्थितीतूनही न डगमगता पुढे गेले.
संघाचे काम हे रोजच्या शाखेतून वाढते. शताब्दी वर्षात प्रत्येक कार्यकर्त्याने संघ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. येणाऱ्या विजयादशमी उत्सवात जास्तीत जास्त हिंदूंना गणवेशासह सहभागी करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे. प्रत्येक स्वयंसेवकाने किमान १० जणांचा गणवेश पूर्ण करून घ्यावा. त्यासाठी आपले नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी अशा किमान १०० जणांना भेटून आग्रह करावा.
संघाने १ ते ३१ डिसेंबर दरम्यान घराघरांत संपर्क मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. शताब्दी निमित्ताने संघविस्तारासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. तसेच जानेवारीत हिंदू संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. सर्वांनी जास्तीत जास्त वेळ देऊन या अभियांनांमध्ये भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.