अमेरिकी अर्थव्यवस्था म्हणजे, जगासाठी दिशा दाखवणारा दीपस्तंभ, असा समज आहे. मात्र, आज त्या दीपस्तंभालाच मंदीचे ग्रहण लागले आहे. ‘मूडीज’चे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झँडी यांनी याबाबत दिलेला इशारा दुर्लक्षित करता येणारा नाही. त्यांचे म्हणणे असे की, अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदीकडे वाटचाल सुरू आहे.भारताला ‘डेड इकोनॉमी’ असे उपहासात्मक संबोधणारी अमेरिका, स्वत:च आता आर्थिक संकटाच्या कड्यावर उभी आहे. ही एक उपरोधिक ऐतिहासिक घटना मानता येईल. अमेरिकेचा सर्वसामान्य नागरिक आज रोजचा खर्च भागवताना मेटाकुटीला आला आहे. तेथील रोजगाराच्या संधी घटल्याने, बेरोजगारीचा दरही वेगाने वाढतो आहे. घरबांधणी क्षेत्रातही मंदी आली असून, अमेरिकी ग्राहकांच्या आत्मविश्वासाला हादरे बसले आहेत. नोकरी ही अमेरिकी मध्यमवर्गाचा मोठा आधार. मात्र, तो आधारच आज निराधार होत आहे. बेरोजगारी दर चार टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. रोजगारनिर्मितीचा भार केवळ आरोग्यसेवा व पाहुणचार क्षेत्रावरच आहे. उत्पादन, बांधकाम, सेवा क्षेत्रात मात्र मंदीचे सावट तीव्र झाले आहे. झँडी म्हणतात, "अशी स्थिती सामान्यतः फक्त मंदीच्या काळातच दिसते.” अमेरिकेतील बांधकाम क्षेत्रात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.ट्रम्प प्रशासनाच्या कठोर स्थलांतर धोरणामुळे शेतकरी, बांधकाम आणि सेवा उद्योगावर मोठाच ताण आला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने, त्याचा बोजा हा सामान्य अमेरिकी ग्राहकांच्या डोयावर बसतो आहे.
अमेरिकेने ट्रम्प काळात सुरू केलेले व्यापारयुद्ध, आज त्यांच्याच अर्थव्यवस्थेलाच पोखरते आहे. चीन, युरोप आणि इतर देशांवर लावलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या शुल्काचा परिणाम, अमेरिकन ग्राहकांवर झाला. खरेदीशक्ती घटली, उद्योगपतींनी गुंतवणूक रोखली आणि संपूर्ण बाजारपेठेवरच मंदीचे सावट आले. ट्रम्प यांनी भारतासह अन्य देशांवर जे आयातशुल्क लादले, त्याचा भार अमेरिकी नागरिकांवरच पडत आहे. वॉल स्ट्रीटवरील शेअर बाजार चढतो आहे. काही तांत्रिक कंपन्यांचे आकडे चांगली कामगिरी करताना दिसत असले, तरी सामान्य अमेरिकी नागरिकांची आर्थिक हतबलता यात दडलेली आहे. महागडी घरे, वाढते व्याजदर, बचत संपल्यामुळे कमी होत चाललेली क्रयशक्ती या सर्व बाबींनी अमेरिकी अर्थव्यवस्थेचा बेगडी मुखवटा उघड केला आहे.
याउलट भारताचे चित्र सर्वस्वी वेगळे आहे. मागील दशकात भारतीय अर्थव्यवस्थेने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. त्यामुळे धान्य उत्पादनात विक्रमी वाढ झाली असून, डाळींच्या उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी आला. कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये स्थिरता आणि वाढ दिसून येत आहे. डिजिटल क्रांतीमुळे अर्थव्यवस्था अधिक पारदर्शक झाली. सरकारने शेतकरी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली असून, पायाभूत सुविधा उभारल्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली. भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असून, नुकताच तिने ७.८ टक्के वाढीचा दर नोंदवला आहे. ही वाढ गुंतवणूक आकर्षित करत असून, आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करते आहे. त्याउलट, अमेरिका आज आर्थिक तूट, कर्जाचा वाढता बोजा, महागाई आणि रोजगारातील अनिश्चिततेशी झुंजते आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीचे ग्रहण लागले आहे. मात्र, भारतात विकासाची नवी पहाट उगवते आहे, ही वस्तुस्थिती आंतरराष्ट्रीय आर्थिक समीकरणांना नवे वळण देणारी ठरते.
अमेरिकेतील राजकीय वादंग, चीनशी सुरू असलेले व्यापारयुद्ध, युक्रेनसाठी होत असलेला वाढता खर्च आणि आता बाजारातील अस्थिरता या सर्व घटकांनी अमेरिकेला हळूहळू दबावाखाली आणले आहे. त्याचवेळी, भारतात मात्र पायाभूत सुविधा, उत्पादन, डिजिटल सेवा, शेतीतील स्वयंपूर्णता अशा विविध क्षेत्रांत वेगाने होत असलेली प्रगती जगासमोर एक आदर्श उभा करणारी ठरली आहे. आज गुंतवणूकदारांचा विश्वास अमेरिकेऐवजी भारतासारख्या स्थिर आणि वाढीच्या मार्गावर असलेल्या अर्थव्यवस्थांवर जास्त आहे. हे केवळ आकडेवारीचे गणित नाही, तर आंतरराष्ट्रीय शक्ती-संतुलनाचे भाकीत आहे. अमेरिका मंदीकडे वाटचाल करत असेल, तर त्याचे परिणाम फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादित राहणार नाहीत. जागतिक पातळीवर व्यापार, गुंतवणूक, वित्तीय बाजार यावर त्याचे दूरगामी परिणाम दिसतील.
अमेरिकेची वाटचाल मंदीकडे होत आहे. तेथील विश्लेषक, अर्थतज्ज्ञ गेली दोन वर्षे सातत्याने याबाबतचा इशारा देत आहेत. मात्र, अमेरिकी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत, आपली मनमानी करण्यातच व्यस्त आहे. त्याचवेळी, युरोप ऊर्जा संकटातून भारताच्या मदतीनेच तारला गेला आहे. चीनची अर्थव्यवस्थेची कामगिरीही फारशी चांगली नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भारताकडे स्थिरतेचे उदाहरण म्हणून संपूर्ण जग पाहते आहे. अन्नधान्य पुरवठ्यात भारताने निर्माण केलेली स्वयंपूर्णता आणि तंत्रज्ञानात मिळवलेले यश, हे दोन्ही घटक भारताला जागतिक पटलावर अनन्यसाधारण स्थान देणारे ठरतात. अमेरिकेच्या विपरीत, भारताने जागतिक व्यापारयुद्धात सावधगिरी बाळगली, बहुपक्षीय संबंध मजबूत केले आणि देशांतर्गत मागणीवर भर दिला आहे. त्यामुळे भारताची वाढ कायम राहिली आहे.
या संपूर्ण आर्थिक चित्रात भारताचे यश अधिक ठळकपणे समोर येते. कारण, भारताने गेल्या ११ वर्षांत जे पायाभूत सुधारणांचे बीज पेरले, त्याची गोमटी फळे आज देशाला आर्थिक स्वावलंबन, रोजगारवाढ आणि आंतरराष्ट्रीय विश्वास या रूपाने मिळताना दिसत आहेत. म्हणूनच, अमेरिकेतील वित्तीय संकट हे भारताचे यश अधोरेखित करणारे ठरले आहे. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासाठी हीच सर्वांत मोठी संधी आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था ढासळताना भारताने आपली वेगवान वाटचाल अशीच कायम ठेवली, तर नजीकच्या काळात ‘जगाचे इंजिन’ ही उपाधी अमेरिकेऐवजी भारताला मिळेल. ज्या अमेरिकेने भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘डेड इकोनॉमी’ म्हणून हिणवले, त्या अमेरिकेलाच आता मंदीची कडवी चव चाखावी लागत आहे. ‘मूडीज’चे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झँडी यांनी इशारा दिला आहे की, अमेरिकी अर्थव्यवस्था अगदी मंदीच्या दाराशी उभी आहे. भारत मात्र त्याचवेळी स्थैर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे चालला आहे, ही नक्कीच अभिमानास्पद अशीच बाब! भारताला ट्रम्प यांनी ‘डेड इकोनॉमी’ म्हणून हिणवले मात्र, आता अमेरिकेच्याच घरात आर्थिक दिवाळे वाजले आहे. ‘मूडीज’ने दिलेला इशारा, अमेरिकी धोरणांच्या अपयशाचे प्रमाणपत्र आहे, असे म्हणूनच म्हणता येते. भारत मात्र आजही वेगाने पुढे जात असून, स्थैर्य, आत्मविश्वास त्याच्या वाटचालीतून दिसून येतो. ‘डेड इकोनॉमी’ हा ठपका ‘अमेरिकन ड्रीम’च्या ढासळत चाललेल्या पायावरच लागू होतो, हेच त्याने कृतीतून दाखवून दिले आहे.
संजीव ओक