१५ ऑक्टोबरपर्यंत वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल सादर करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

08 Sep 2025 18:54:43

मुंबई : येत्या १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाची तपासणी करून १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करावा. तसेच या प्रकल्पाला कालबद्ध नियोजन करून गती द्यावी. यासाठी केंद्र शासनाकडे पत्र पाठवून, प्रकल्पाच्या किमान २५ टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळवता येईल का यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल. राज्य शासनाकडूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गोसीखुर्द ते निम्न वर्धा सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण झाले असून पुढील कामकाजासाठी पर्यावरण मान्यता प्राप्त करून प्रकल्पाचा पहिला टप्पा तात्काळ सुरू करावा," असे निर्देशही त्यांनी दिले.


Powered By Sangraha 9.0