अफजलखानाच्या कबरीवर जाण्यात संजय राऊत यांना धन्यता

08 Sep 2025 14:04:12

मुंबई : संजय राऊत यांना लालबागच्या राजाला जावेसे वाटणार नाही, कारण त्यांना अफजलखानाच्या कबरीवर जाण्यात धन्यता वाटते, अशा शब्दात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी खरपूस समाचार घेतला.

पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, “संजय राऊत यांना लालबागचा राजा पावणार नाही. कारण गणपती हा हिंदूंचा सण असतो. लालबागचा राजा हा हिंदूंचा आहे. संजय राऊत यांना लालबागच्या राजाला जावेसे वाटणार नाही, कारण त्यांना अफजलखानाच्या कबरीवर जाण्यात धन्यता वाटते. उबाठा गटाला गणपती उत्सवापेक्षा अफजलखानाची कबर जास्त प्रिय आहे. राऊत यांना हिंदूंच्या सणातील उत्साह बघवत नाही. त्यांचे प्रेम अफजल खान आणि औरंगजेबावर आहे. ते धावत पळत जाळीदार टोपी घालून त्यांच्या कबरीवर गेले असते. मराठी माणूस हा इथल्या गणपती उत्सवावर नितांत प्रेम करतो. त्यामुळे तुम्ही कितीही सांगितले तरी इथला हिंदू आनंदात गणेशोत्सव साजरा करतो.”

...म्हणून राऊत यांची पोटदुखी
“संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचा बाप काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, ज्यांनी आपल्या वडीलांची विचारधारा, त्यांचा पक्ष, कार्यकर्ते, आमदार, खासदार सोडले त्यांना दुसऱ्याचा बाप काढण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात सर्वसामान्य जनता हीच बाप असते. भाजप हा जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. देवाभाऊंची जाहीरात सामनामध्ये आली नसल्याने संजय राऊत यांचे पोट दुखते आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक जाहीरात सामनामध्ये द्यावी, ज्यामुळे राऊतांची पोटदुखी थांबेल. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामनामध्ये प्रकाशित होणाऱ्या जाहीराती कदाचित काळ्या पैशाने छापल्या जात असतील. देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतात आणि त्यांच्याच प्रेमातून अशी जाहीरात येते. पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा काहीही संबंध नसल्याने ते अशी वायफळ बडबड करतात,” अशी टीकाही त्यांनी केली.

दिवसा स्वप्न पाहणे बंद करा
“मुंबईत शिवसेनेचा महापौर होणार, असे दिवसा स्वप्न पाहणे संजय राऊत यांनी बंद करावे. सर्वसामान्य मुंबईकर हा महायूतीच्या सोबत आहे. त्यामुळे राऊतांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.”

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना सावध राहण्याची गरज
“उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपच्या नेतृत्वात एनडीएचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील आणि या निवडणूकीत यूपीएच्या ठिकऱ्या उडाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या यूपीएच्या कारभाराला त्यांचे सर्व खासदार कंटाळले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना या निवडणूकीत सावध राहण्याचा सल्ला द्यावा. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना सावध राहण्याची गरज आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही दिलेल्या वेळापत्रकानुसार होते. त्यामुळे त्यात पितृपक्ष आला किंवा इतर काही आल्यास संजय राऊत यांनी त्याचा विचार करू नये. कुठलाही मुहूर्त चांगला असतो. भाजपसाठी ३६५ दिवस पवित्र आहेत. त्यामुळे अमुक काळात निवडणूक घेऊ नये, असे म्हणणे म्हणजे घाबरण्याचे लक्षण आहे. संजय राऊत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत घाबरले असल्याचे सिद्ध झाले आहे,” असेही नवनाथ बन म्हणाले.


Powered By Sangraha 9.0