PSI परीक्षेत अव्वल आलेल्या पुण्याच्या अश्विनी केदारी हिचा दुर्दैवी अंत! ११ दिवस मृत्यूशी झुंज

08 Sep 2025 13:09:50


पुणे : (Ashwini Kedari Passes away) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या २०२३ च्या परीक्षेत महाराष्ट्रातून महिला प्रवर्गात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मागील अकरा दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली. अश्विनी केदारी हिच्या अकस्मात निधनाच्या बातमीने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करत असताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. पाणी किती तापले आहे, हे पाहण्यासाठी जेव्हा ती बाथरूममध्ये गेली त्याच वेळी हीटरचा मोठा झटका तिला लागला. या शॉकमुळे उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले आणि या भीषण अपघातात ती तब्बल ८० टक्के भाजली. त्या गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी तिला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करत उपचार सुरु केले. यादरम्यान गेल्या अकरा दिवसांपासून ती मृत्यूशी लढा देत होती. मात्र, अखेर शनिवारी ६ सप्टेंबरला उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अश्विनी केदारी ही पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या. तिच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या कर्तृत्वामुळे ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली होती. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींकडून तिच्या जाण्यावर हळहळ व्यक्त केली जात आहे.




Powered By Sangraha 9.0