नेपाळमध्ये २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी; जेन-झीमध्ये संतापाची लाट

08 Sep 2025 18:05:26

मुंबई : नेपाळमधील जेन-झी वर्ग अर्थात सध्याचा युवावर्गामध्ये नेपाळ सरकारच्या एका निर्णयाने प्रचंड संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळतेय. नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, एक्स यांसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे काठमांडूसह देशभरात निदर्शने उसळली आहेत. संतप्त तरुणांनी काठमांडूच्या नवीन बाणेश्वर येथील संसद संकुलात प्रवेश केला. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून त्यांनी संसदेच्या आवारात घुसखोरी केली, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

सदर कारवाई सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाली असून लाखो नेपाळी नागरिकांची डिजिटल जगाशी जोड असणारी लाईन कापली गेल्याने निदर्शकांनी सुरुवातीला शांततापूर्ण आंदोलनाची शपथ घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या गोळ्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. त्यामुळे परिस्थिती चिघळली आणि मोठ्याप्रमाणात गोंधळ उडाला. वास्तविक नेपाळ सरकारने कंपन्यांना नोंदणीसाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, परंतु फेसबुक, व्हॉट्सअॅप, एक्ससारख्या प्रमुख प्लॅटफॉर्म्सनी नोंदणी केली नाही, ज्यामुळे बंदी लागू झाली. हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे.

'सोशल मीडिया वापर नियमन निर्देशिका २०८०' नुसार, या कंपन्या देशात कार्यरत राहण्यासाठी त्यांना मंत्रालयात नोंदणीकृत व्हावे लागेल. त्यांना स्थानिक प्रतिनिधी नेमावा लागेल, तक्रार निवारण यंत्रणा उभारावी लागेल आणि अनधिकृत कंटेंट थांबवावा लागेल. पण फेसबुक, गूगल, मेटासारख्या दिग्गज कंपन्यांनी ही विनंती नाकारली. परिणामी इंटरनेट सर्व्हिस प्रदात्यांना हे सर्व प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याचे आदेश दिले गेले. मंत्रालयाच्या अधिकृत सूचनेत म्हटले आहे, नोंदणी न झाल्यास प्लॅटफॉर्म्स बंद करा, पण नोंदणी झाल्यावर लगेच सक्रिय करा.

कोणकोणत्या प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली?
फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर, युट्यूब, एक्स, रेडिट, लिंक्डइन, व्हॉट्सअॅप, डिस्कॉर्ड, पिन्टरेस्ट, सिग्नल, थ्रेड्स, व्हीचॅट, क्वोरा, टंबलर, क्लबहाऊस, रंबल, लाईन, आयएमओ, जालो, सोल, हम्रो पात्रो, इ.

या आंदोलनकर्त्यांमध्ये मृतांची संख्या वाढून १४ झाली, ज्यापैकी १३ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. त्याचबरोबर शेकडो लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे. आंदोलनकर्त्यांचा दावा आहे की पोलिसांनी शांततापूर्ण निदर्शनांदरम्यानच गोळीबार केला.


Powered By Sangraha 9.0