पांढरा शुभ्र पसरलेला बर्फ सगळ्यांच्याच मनाला भुरळ घालतो. त्यासाठीच अनेकजण बर्फ पडणार्या ठिकाणी फिरण्यास जातात. या बर्फांगणावर अनेक खेळांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धाही होतात. मात्र, सध्या हवामान बदलाचा परिणाम या बर्फावरही होत आहे. त्यामुळे अनेक धोके आ वासून उभे आहेत. या परिणामांचा आणि येऊ घातलेल्या अरिष्टांचा घेतलेला मागोवा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्य ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाच्या १२५व्या भागांत देशवासीयांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी जम्मू-काश्मीरमधील खेळांचा प्रामुख्याने उल्लेख केला. ते म्हणाले की, "पूर आणि पावसामुळे झालेल्या विध्वंसाच्या काळातही, जम्मू-काश्मीरच्या जनतेने दोन विशेष कामगिरी साध्य करून दाखवल्या आहेत.” जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील स्टेडियममध्ये विक्रमी संख्येने लोक एकत्र आले होते, तेथे पुलवामातील पहिला डे-नाईट क्रिकेट सामना खेळला गेला. पूर्वी अशी गोष्ट घडणे अशय होते पण, आता आपला देश बदलत आहे. हा सामना ‘रॉयल प्रीमियर लीग’चा एक भाग आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरचे वेगवेगळे संघ खेळत आहेत. इतके सगळे लोक, विशेषतः तरुण, पुलवामामध्ये रात्रीच्या वेळी क्रिकेटचा आनंद घेत असल्याचे चित्र खरंच बघण्यासारखे होते.
दुसरा कार्यक्रमही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारा होता. देशात पहिल्यांदाच ‘खेलो इंडिया वॉटर स्पोटर्स फेस्टिव्हल’ झाले आणि तेही श्रीनगरच्या दल लेकवर. खरंच असा उत्सव आयोजित करण्यासाठी ही किती खास जागा आहे! तसेच, याचा उद्देश वॉटर स्पोटर्सला आणखी लोकप्रिय करणे हा आहे. यामध्ये संपूर्ण भारतातून ८०० हून जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. महिला खेळाडूंचाही सहभाग जवळजवळ पुरुषांएवढाच होता. यात भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. त्यांपैकी ओडिशाच्या रश्मिता साहू आणि श्रीनगरचे मोहसीन अली या खेळाडूंशी ‘मन की बात’मध्ये त्यांनी विशेष संवाद साधत, त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना भावी काळासाठी शुभेच्छाही दिल्या; त्यांच्या पालकांचेही आभार व्यक्त केले. भारताचा पहिला राष्ट्रीय स्तरावरील, खुल्या गटाचा ‘खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव’ दि. २१ ते दि. २३ ऑगस्ट रोजीदरम्यान, भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरच्या प्रसिद्ध दल सरोवर येथे संपन्न झाला. त्या पहिल्या ‘खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवा’चा शुभंकर म्हणून, त्या परिसरातील दुर्मीळ अशा ‘हिमालयीन किंगफिशर’ची निवड करण्यात आली होती. ‘खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवा’चा हा शुभंकर साहस, ऊर्जा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे. या शुभंकरचे अनावरण श्रीनगर येथे करण्यात आले.
दल सरोवरातील या महोत्सवात ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ८०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या महोत्सवात रोइंग, कयाकिंग, कॅनोइंग, वॉटर स्कीइंग, शिकारा रेस आणि ड्रॅगन बोट रेस यांसारख्या जलक्रीडांचा समावेश होता. हा जलक्रीडा महोत्सव ‘खेलो इंडिया’ आयोजित करत असलेल्या, विविध क्रीडा प्रकारांतील एक भाग होता. यावर्षी मे महिन्यात दीव येथे पहिले ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ आयोजित करण्यात आले होते, तर या वेळचे आयोजन ‘जम्मू-काश्मीर क्रीडा परिषदे’कडून ‘केंद्रीय युवा व्यवहार’ आणि ‘क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)’ यांच्या सहकार्याने केले होते. ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)’च्या देखरेखीखाली आयोजित या महोत्सवाने, लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी खेळाडूंना प्रशिक्षण आणि अनुभव देण्यासाठी एक व्यासपीठदेखील प्रदान केले.
हा महोत्सव २०१७-१८ साली सुरू झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा उपक्रमाचा एक भाग होता. तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रतिभेची ओळख पटविण्यासाठी आणि देशभरात खेळांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात ‘साई’च्या अधिकार्यांच्या मते, "ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांपूर्वी भारतीय कायाकर्स आणि कॅनोइस्टसाठी हा कार्यक्रम एक नवीन मार्ग ठरू शकतो.”
ऑगस्ट महिन्यात झालेल्या या जलक्रीडा महोत्सवातील क्रीडांना अनुरूप असणारे दल लेकचे पाणी तेथील परिसर, हवामान या स्पर्धेतील खेळाडूंना उचित असेच होते. या खेळाबरोबरच तो परिसर तेथील प्रसिद्ध लाल चौक, अशा ठिकाणी फिरून येण्याची त्यांना अनायसे संधी मिळाली होती. भारतात स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी देश-विदेशांतील विविध खेळांचे संघ, खेळाडू, अधिकारी असे अनेकजण ताजमहाल तसेच, जम्मू-काश्मीरच्या अनेक पर्यटनस्थळांना आवर्जून भेट देऊन, मग घरी परतात. तसेच ‘खेलो इंडिया’मधील खेळाडूही थोडा वेळ काढून पर्यटक बनले होते.
श्रीनगरमधील कडायाच्या थंडीत दल सरोवराचा मोठा भाग गोठतो. श्रीनगर, गुलमर्ग अशा जम्मू-काश्मीरमधील अनेक तलावांच्या काठांवर आणि आत, अनेक ठिकाणी बर्फाचा जाड थर तयार होतो. यामुळे हे दृश्य अत्यंत आकर्षक तर होतेच; पण हे पाणी जेव्हा गोठते, तेव्हा ते सरोवर भीतीदायक वाटू लागते. कारण, त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडसारखे हिमनदीयुक्त अनेक तलाव फुटण्याचीही शयता निर्माण होते. यामुळे पायाभूत सुविधा आणि जीवन संकटात येण्याचा धोका निर्माण होतो. एकंदरीतच तेथील पर्यावरण संकटात येण्यासारखी धक्कादायक परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाचाही हा परिणाम आहे.
या धक्कादायक परिस्थितीतून क्रीडाविश्व काही वेगळे नाही. ते कसे हे आपण जाणून घेण्यासाठी पर्यटकांना प्रिय असणार्या गुलमर्गचे उदाहरण घेऊ. शीतकालीन खेळांसंबंधित सगळे गुलमर्गला जातात पण, तेथे जर बर्फच उपलब्ध नसेल, तर गुलमर्ग नाखूश होते. गुलमर्ग एका वर्षी असेच नाखूश झाले होते. ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’चे आयोजन त्यावर्षी करण्यात आले होते पण, तेथे पाहिजे तेवढा बर्फच उपलब्ध नसल्याने, त्या स्पर्धा नाईलाजाने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गुलमर्गला बर्फ जमा होतो पण, गेली काही वर्षे यात बदल आढळून येत आहे. हवामान बदल विंटर गेम्सलाही शह देत आहे.
पृथ्वीच्या वातावरणात होत असलेले बदल, तसेच वातावरण आणि पृथ्वीच्या भूशास्त्रीय, रासायनिक, जैवभौगोलिक घटक यांच्यातील आंतरक्रियांमुळे होत असलेले बदल या दोन्हींमुळे पृथ्वीच्या हवामानात वेळोवेळी जे बदल घडून येतात, त्यांना ‘हवामान बदल’ म्हणतात. पृथ्वीचे वातावरण हे समुद्र, हिमनग, भूपृष्ठभाग तसेच त्यावरील वनस्पतींचे आच्छादन, यांच्याशी जोडलेले असते आणि याद्वारे प्रभावितही होते. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्यांचे वितळणे ही चिंतेची बाब झाली आहे. १९६० सालापर्यंत आफ्रिकेतील ‘माऊंट किलिमांजारो’ या पर्वतावर मुबलक बर्फ होता पण, आज तेथे अतिशय नगण्य बर्फ आहे. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगामध्येही असेच आढळून येते. या हिमनद्या पाणीपुरवठा म्हणून अतिशय महत्त्वाच्या असतात. या हिमनद्या नष्ट पावल्या, तर या नद्यांवर अवलंबून असणार्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते. परिणामी पाण्याची पातळी वाढते, पूर येतात.
पाण्यावरील हिमनगांचा बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा पाण्यावरही दिसतो. हे हिमनग जर वितळले, तर पाण्याची पातळी वाढत नाही पण, जर जमिनींवरील हिमनग वितळले, तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढते. सार्या जगाने सर्वांत उष्ण जानेवारी महिना, २०२५ साली अनुभवला आहे. गुलमर्गसारख्या आपल्या ठिकाणचा बर्फ जर असा गंभीर अडचणीत सापडला, तर तेथील क्रीडाविश्वही त्या समवेत गर्तेत सापडेल. कारण, अशा क्रीडा प्रकारांना नैसर्गिक बर्फांगणे उपलब्धच नसतील. मनुष्यनिर्मित बर्फांगणांची निर्मिती करून, त्याच्यावर स्पर्धा खेळवायची वेळ येईल. कृत्रिम बर्फ बनवून तो सर्वदूर पसरवत कृत्रिम बर्फाची मैदाने बनवत, त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयोग भारतात करण्यात येत आहे. कृत्रिम बर्फाचा उपाय आपल्याला काही ठिकाणी यशस्वी जरी दिसत असला, तरी तो प्रचंड खर्चिक असतो. भारतात हिवाळी पर्यटन आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी, लडाखने कृत्रिम बर्फ बनवण्याचे यंत्र तयार केले आहे. लडाखमध्ये ‘लडाख स्की आणि स्नोबोर्ड असोसिएशन’ने, कारगिलमध्ये कृत्रिम बर्फ बनवण्याचे यंत्र निर्मितीत यशस्वीरित्या पुढाकार घेतला आहे. लडाखमध्ये हिवाळी पर्यटन आणि क्रीडा अशा दोन्हीसाठी हे नावीन्यपूर्ण उपाय महत्त्वपूर्ण आहेत.
सादिक अली आणि त्यांच्या टीमने बनवलेले हे यंत्र, कृत्रिम बर्फ निर्मितीसाठी कॉम्प्रेसर आणि स्प्रे नोझलसारख्या सहज उपलब्ध घटकांचा वापर करते. उल्लेखनीय म्हणजे, हे मशीन फक्त एका तासात १५ु५ फूट क्षेत्रांत एक इंच बर्फ तयार करू शकते. याचा वापर बर्फाची कमतरता असलेल्या भागात स्कीइंग कोर्सेस राखण्यासाठी आणि हिवाळी क्रीडा प्रशिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी होईल. यासारख्या नवोपक्रमाचे महत्त्व हिवाळी खेळांच्या पलीकडे जाते. या तंत्रज्ञानाचा वापर बर्फाचे संकलन-सिंचन आणि इतर पाणी व्यवस्थापन गरजांसाठी बर्फ साठवण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. ज्यामुळे या प्रदेशात शाश्वत पाणी उपायांमध्ये योगदान मिळेल. लडाखच्या अनेक भागांमध्ये वाढती चिंता असलेल्या पाण्याच्या टंचाईवरही याच्या सहकार्याने मात करया येऊ शकते.
लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर यांना आवाहन करून, असोसिएशनने लडाखला जागतिक हिवाळी क्रीडा केंद्रात रूपांतरित करण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी आणि या प्रदेशात विकासाला चालना देण्यासाठी या बर्फ बनवण्याच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. काही वर्षांपूर्वी विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग करताना आपण अनुभवले आहेत. यासाठी विमानाचा वापर विशिष्ट रसायने ढगांमध्ये पसरवण्यासाठी केला जातो, जेणेकरून ढगांमधील पाण्याची वाफ थंड होऊन, तिच्यातून पाऊस तयार होतो. त्याच तत्त्वानुसार त्यावर अधिक प्रक्रिया करून त्या पाण्यापासून बर्फ तयार करून, तो अपेक्षित ठिकाणी पाडल्यास त्या बर्फाचा उपयोग केला जाऊ शकतो हे काही शास्त्रज्ञांनी करून बघितले होते. कृत्रिम पाऊस पाडणे असो, कृत्रिम पावसा-पाण्यापासून बनवलेला कृत्रिम बर्फ पाडणे असो, अथवा जमिनीवरील यंत्रांच्या मदतीने बर्फाचे अंथरुण मैदानावर पसरवणे असो; मनुष्य त्यावर विविध क्रीडा करण्यात यशस्वी होत असला, तरी त्यासाठीचे अर्थशास्त्र, तंत्रशास्त्र बघता अंथरुण पाहून पाय पसरायचे असतात. याला येणारा खर्च फार खर्चिक असतो कारण, कितीही झाले तरी नैसर्गिक वातावरणात खेळलेले खेळ आणि कृत्रिम वातावरणात खेळलेले खेळ यात खचितच फरक असणार आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
हवामान बदलामुळे आज भारतीय खेळांच्या पैलूंवर लक्षणीय परिणाम होत आहे आणि ते नष्ट होत आहेत. यामुळे तीव्र उष्णता वाढत असून, हवामानाचे स्वरूप बदलत आहे आणि पाणी आणि बर्फाची कमतरता निर्माण होत आहे. यामुळेच सामनेही पुढे ढकलले जात असून, कार्यक्रम रद्द होत आहेत. तसेच खेळाडूंचे आरोग्यही धोयात येत आहे आणि खेळाच्या मैदानांचीही धूप होत आहे. खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी परिस्थिती असुरक्षित बनवण्यापासून ते स्थिर बर्फ आणि बर्फावर अवलंबून असलेल्या हिवाळी खेळांसारख्या विशिष्ट खेळांचे भविष्य धोयात आणण्यापर्यंत, आणि पूर आणि वाढत्या पाण्यामुळे ग्रामीण खेळांवरही परिणाम होण्यापर्यंतचे परिणाम हवामन बदलामुळे घडत आहेत.
अशी माहिती उपलब्ध आहे की, भारतातील १६ खेळाडूंनी हिवाळी ऑलिम्पिकच्या ११ आवृत्तीत भारतातर्फे सहभाग घेतला आहे. भारताचे तीन खेळाडू १९८८, २०१० आणि २०१४ साली खेळले होते; नंतर २०१८ साली तो आकडा दोन झाला. आता तर अरिफ खान हा केवळ एकमेव खेळाडू दिसून येईल की, ज्याने २०२२ सालच्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या हवामान बदलामुळे बर्फाचे क्रीडांगण आणि त्यात उतरणारे खेळाडूंचे घसरणीला लागलेले आकडे, आपल्याला दिवसेंदिवस चिंतेत टाकणारे आहेत.
ही चिंता फक्त भारतापुरती मर्यादित नसून, ती एक जागतिक समस्या बनत असून, तो सार्वजनिक चिंतेचा विषय झाला आहे. ऑटोबर २०२३ साली ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे अध्यक्ष थॉमस बाख, मुंबईत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या १४१व्या बैठकीला आले होते. त्यावेळच्या भाषणात त्यांनी हवामान बदलाचा क्रीडा क्षेत्राला होणार्या चिंतेबाबत आपले मत व्यक्त केले. या सगळ्यांनी समस्त जनतेला आवाहन केले आहे की, सर्वसाधारण जनतेने पुढाकार घेत, हवामान बदलाचा तिढा सोडवावा. खेळांमधील शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी, तसेच बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण खेळू शकू. चला तर मग क्रीडाविश्वावरचे ते अरिष्ट येऊ न देण्याची जबाबदारी सगळ्यांनीच स्वीकारूया कारण, ‘मन की बात’मध्ये हेदेखील म्हटले होते की, ‘जो खेळतो तो बहरतो.’
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४