काकस्पर्श

    08-Sep-2025
Total Views |

पितृपक्षास सुरुवात झालेली असताना या काळातील आकर्षणाचा विषय असतो तो कावळा. पितृपक्षात कावळ्याला सर्वसाधारण महत्त्व असले तरी, पर्यावरणातदेखील त्याची महती मोठी आहे. आपल्याला सहज दिसणार्‍या मात्र तरीही दुर्लक्षित राहिलेल्या पक्ष्याविषयी माहिती देणारा हा लेख...

भाद्रपदातील पितृपक्षास सुरुवात झाली आहे. पूर्वापार चालत आलेल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या पितरांची, कुटुंबातील मृत व्यक्तींची तिथी किंवा मग श्राद्धकार्य या काळात केली जातात. अनसुठ, भरणी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध अशा बर्‍याच कार्यांची गुंफण या पंधरवड्यात असते अन् अखेरीस येते ती सर्वपित्री अमावास्या. या दिवशी महाराष्ट्रात वाडवडिलांना महाल अर्पण केला जातो. गावांमध्ये सर्रास या कार्याला ‘वाडी ठेवणे’ म्हणतात. समाजपरत्वे आणि प्रदेशानुरुप नाव बदलतात. मात्र, हे कार्य अगदी न चुकता केले जाते. पण, कधीही न आठवणारा आणि आठवलाच तर कर्कश्श आवाजात ओरडणारा एक पक्षी यादिवशी खूप मान मिळवून जातो, तो म्हणजे कावळा!

शास्त्रीयदृष्ट्या corvus splendens म्हणून ओळखला जाणारा पक्षी सगळ्यांच्याच परिचयाचा. अगदी लहानपणापासूनच तो आपल्या जवळचा. तहानलेला कावळा, चतुर कावळा, भिजलेला कावळा अशी अनेक रूपे घेऊन आपल्या बालपणीच्या कथांना रंग देणारा, एक धीट पक्षी. तो मूळचा आशिया खंडातला, पण सध्या बर्‍याच देशांत त्यांनी आपले अधिवास प्रस्थापित केले आहेत. मिळेल त्या अन्नाचा यथायोग्य उपयोग कसा करावा, ते या पक्ष्याकडून शिकावे. शाकाहारी, मांसाहारी असा कोणताच भेद न करता, जे मिळेल ते तो खातो. बर्‍याचवेळा घराशेजारी, कचर्‍याच्या ढिगार्‍यांवर त्यांची झुंबड उडते. इतर पक्षांच्या अप्रतिम सौंदर्याला रेखाटताना या आपल्या जवळच्या पक्ष्याबद्दल कुणी काहीच लिहिलेले नाही. पण या कावळ्यासारखा निसर्गातला स्वच्छताकर्मी अन्य कुणीच नाही. कचर्‍यामधले जीव-जंतू, पाली-सरडे अगदी छोटे छोटे किडेदेखील तो खातो. जन्मतःच चतुर, एखादी वस्तू खाण्यासाठी चालू असलेली त्याची धडपड वाखाणण्याजोगी. आधी हळूहळू तो इकडे-तिकडे मान हलवत चालू लागतो, मध्येच एखादी उडी घेत पुढे सरकतो आणि आपल्या अन्नाच्या जवळ आला की, लांबूनच आपल्या चोचीत जेवढं अन्न साठवता येईल, तेवढे साठवतो आणि मग पसार होतो. अन्नासाठी आपल्या काळ्याभोर पंखांत बळ आणत हा पाव किलो वजनाचा जीव फिरत असतो.

माणसाने बनविलेल्या सौंदर्याच्या व्याख्येत कदाचित कावळा बसत नसेल, पण निसर्गाच्या सौंदर्याच्या बाबतीत मात्र तो पुरेपूर बसतो! अंगभर पसरलेल्या राखाडी पिसांनी झाकलेले त्याचे शरीर दोन पंखांच्या कमानीवर जोडलेल्या गडद काळ्या पिसांनी झाकले जाते. जाडसर, आखूड गर्द काळी चोच अन् डोयाचा काहीसा भाग कमी-जास्त प्रमाणात काळ्या रंगात डुंबलेला भासतो. पापण्यांची उघडझाप होत असलेल्या भारदस्त अशा डोळ्यांमधून तो सभोवताली पाहू लागतो. क्षणभर त्याला न्याहाळून पाहिलं, तर अंगभर चकाकती अशी पिसांवरील वलय मानेच्या राखाडी वर्णातून निसटताना दिसेल. कावळ्यांची घरटीदेखील फार उंचावर असतात. तारा, दोरे अन् गवताच्या काड्या एकमेकांत गुरफटवत ते घरटी तयार करतात. झाडांवर, विजेच्या टांगत्या खांबांवर त्यांची घरटी असतात. भारतात एप्रिल ते जून महिना हा त्यांचा विणीचा हंगाम. मादी चार-पाच अंडी घरट्यात घालते. ही घरटी मानवी वस्तीपासून फार जवळच असतात. मात्र आपल्या घरट्याच्या जवळ ते कुणालाही फिरकू देत नाहीत. अजाणतेपणी जर तिथे आपले जाणे झाले, तरी ते काव-काव करत आपला जीव नकोसा करून सोडतात. बर्‍याचदा कावळे डोयावर चोच मारून जातात, असे बर्‍याचजणांकडून मी ऐकलंय आणि प्रत्यक्षात अनुभवलेलेदेखील आहे.

कावळ्यांच्या बाबतीतल्या काही गमतीदार गोष्टीदेखील आहेत. जसे की, हा पक्षी जवळपास सहा वस्तू मोजू शकतो आणि आश्चर्याची गोष्ट ही की कावळा माणसांप्रमाणे ‘सनबाथ’देखील घेतो, ‘ड’ जीवनसत्त्व मिळवण्यासाठी. हजारभर वेगवेगळे अन्नपदार्थ खाण्याची अद्वितीय क्षमता कावळ्यांमध्ये असते. हा पक्षी इतका समाजप्रिय आहे की, एखादा समाजबांधव मेलेला दिसला की लगेच आपल्या इतर समाजबांधवांना काव-काव करत ते बोलावतात व त्या ठिकाणी शोकसभा भरवतात. असे जरी असले, तरी इतर पक्ष्यांप्रमाणे कावळ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. मागच्याच वर्षी पिंडदानासाठी बंगळुरुमध्ये एकही कावळा नसल्याची बातमी आली होती. अवाजवी औषधांचा वापर, अन् कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे अयोग्य तंत्र यांमुळे कावळ्यांच्या संख्येत घट झाली. कीटकनाशके, खते, बाजारात उंदीर, घुशी मारण्यासाठी मिळणारी औषध यांमुळे मरून पडलेल्या जीवांची विल्हेवाट लावताना कावळ्यांसारखा जीवांची वाट लागली. वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात झाडांच्या कत्तली आणि परिणामी पक्ष्यांचे नष्ट झालेले अधिवास या पक्षांच्या अस्तित्वाला मारक ठरत आहेत. निसर्गात प्रत्येक जीवाला जगण्याचा समान हक्क आहे. मात्र मानवी लालसेने या मुया जीवांच्या उदरनिर्वाहाचे मार्गच अगदी बंद करून टाकले आहेत.

खरं तर अवघ्या सहा वर्षांचे या कावळ्याचे आयुष्य. कावळा निसर्गात आहे, म्हणून कचर्‍यातील जीव-जंतूंचे प्रमाण नियंत्रणात आहे. अन्नसाखळीतील तो महत्त्वाचा दुवा आहे. भारतीय समाजात या पक्षाबद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. ऐनवेळी कावळ्याचा स्पर्श झाला, तर तो अशुभ मानला जातो. पण मेल्यानंतर पिंडाला शिवायला कावळ्याच्या स्पर्शाची लोक आतुरतेने वाट पाहतात. खेड्यापाड्यातील जुनी जाणती माणसे कावळा ओरडला की म्हणतात, ‘आज घरी कुणीतरी पाहुणा येणार!’ आजही सकाळी घराशेजारी एखाद्या कावळ्याची काव-काव ऐकली की आजी सहजच म्हणते, ‘जा त्याला खायला घाल, तो आपला घरातला ‘अमका’ आहे.’ जे जुन्या-जाणत्या माणसांना कळतं, ते आम्हाला अजूनही कळत नाही. मेल्यानंतर पिंडदान करताना कावळा पिंडाला शिवायला जेव्हा येतो, तेव्हाच तो आत्मा तृप्त होतो, अशी लोकधारणा आहे. त्यासाठी तरी कावळा निसर्गात राहायला हवा. निसर्गातले प्राणी-पक्षी हे आपलेच नातलग आहेत. गरज आहे, ते नाते पुन्हा घट्ट करण्याची. लहानपणी गोष्टीत ऐकलेले की, कावळ्याचे शेणाचे घरटे वाहून जाते, त्यावेळी ते पाण्यातून वाहून जायचे. पण आता मात्र माणसांच्या अविचारी कृतीतून वाहून जात आहे. काही वर्षांपूर्वी घरातले शिळेपाके अन्न टाकून देताना कावळ्यांची होणारी झुंबड आता क्वचितच पाहायला मिळते. या पितृपक्षात घराबाहेर वाडी ठेवताना, आऽऽऽ, आ ऽऽऽ करत कावळ्यांना बोलावणारा माणूस बघितला की मग निसर्गातील या जीवांची खरी किंमत कळते. अन् क्षणापुरताच का होईना, पण मानवी मनाला काकस्पर्श होतो!

परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)