मुंबई : विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरु असल्याचे दिसते. दरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याकडे गळ घातली.
ऑगस्ट २०२५ मध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा निरोप समारंभही पार पडला. त्यानंतर मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विरोधी पक्षनेते पदाकडे डोळे लावून बसले.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर उबाठा गटाने दावा केला. त्यासाठी जेष्ठ नेते भास्कर जाधव यांचे नावही निश्चित करण्यात आले. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी मात्र, काँग्रेसने उबाठा गटाला गळ घातली आहे. त्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीनंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "भविष्यातील होणाऱ्या निवडणूका कशा लढाव्या आणि विधानपरिषदेच्या रिक्त जागेसंदर्भात आमच्यात चर्चा झाली. शरद पवार यांचीसुद्धा आम्ही वेळ घेतली असून त्यांना भेटणार आहोत. तसेच मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहोत. संख्याबळानुसार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद आमच्याकडेच आहे," असा दावा त्यांनी केला. शिवाय विरोधी पक्षनेत्याचे नाव दिल्लीवरून निश्चित असून सतेज पाटील यांचे नाव चर्चेत असण्यालाही त्यांनी दुजोरा दिला.
सत्तेसाठी नव्हे, तर विरोधी पक्षनेते पदासाठी यूतीवास्तविक आतापर्यंत एखादे सरकार स्थापन करण्यासाठी युत्या, आघाड्या झाल्याचे अनेकदा पाहिले. मात्र, यावेळी महाविकास आघाडीतील पक्षांनी विरोधी पक्षनेते पदासाठी युती केल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते पदासाठी एकाही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही.
तरीही उबाठा गटाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे धाडस दाखवले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण संख्याबळाच्या १० टक्के संख्याबळ हवे असते. सध्या विधानपरिषदेत काँग्रेस ७, उबाठा गट ६ आणि शरद पवार गट ३ असे संख्याबळ आहे. याचा अर्थ विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी एकही पक्ष दावा करू शकत नाही. अशा परिस्थितीत हे तिन्ही पक्ष एकमेकांकडे गळ घालताना दिसत आहेत.