पुणे : (Pune) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील बेलबाग चौकात श्रीगणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याचे वार्तांकन करणाऱ्या एका नवोदित महिला पत्रकाराशी एका ढोलताशा पथकातील दोन सदस्यांनी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडला. याबाबत महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी त्रिताल ढोल ताशा पथकाच्या दोन वादकांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पत्रकार त्यांच्या एका सहकाऱ्यासोबत ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ ते ७.४० दरम्यान विसर्जन सोहळ्याचे वृत्तांकन करत होत्या. त्यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील एका वादकाने लोखंडी ट्रॉली ओढत आणताना चाक महिला पत्रकाराच्या पायावर घातले. त्यावेळी त्याबाबत त्याला विचारणा केली असता, वादकाने महिला पत्रकाराशी वाद घालत धक्काबुक्की केली. तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याने आरोपीला जाब विचारला. त्यावर राग अनावर झाल्याने वादक आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने त्या सहकाऱ्यालाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.
याप्रकरणी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सोमवारी ८ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. पत्रकार संघाकडून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी आली. फरासखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील याबाबत पुढील तपास करत आहे.