जिद्द, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास सोबत असेल, तर कष्टाचे सोन्यात रूपांतर होऊ शकते. हाच विश्वास ठेवून व्यवसायाची अवघड वाट यशस्वीपणे चालणाऱ्या अक्षय जगदीश ढोबळे यांच्याविषयी...
मुंबईत असंख्य तरुण स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नरत असतात. काहीजण नोकरीच्या सुरक्षित चौकटीत स्थिरावतात, तर काहींच्या मनात स्वतःचे विश्व साकारण्याची जिद्द असते. मात्र, या स्पर्धात्मक युगात भांडवल, ओळख आणि वारसा नसलेल्या तरुणांचा मार्ग काहीसा कठीणच असतो. अशा असंख्य अडचणींना सामोरे जातच, स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्या अक्षय ढोबळे यांनी प्रिंट मीडिया या स्वतःच्या कंपनीद्वारे यशस्वी व्यवसायाची उभारणी केली आहे.
अक्षय यांचा प्रवास एका खासगी नोकरीतून सुरू झाला. स्थिर पगार, सुरक्षित भविष्य सगळे काही समोर असले. तरीह्ी अक्षय यांचे मन समाधानी नव्हते. त्यांच्या अंतर्मनाने सातत्याने स्वत:चे काही असावे याचाच ध्यास घेतला होता. स्वत:बरोबर समाजालाही उपयोगी पडेल असे काही घडवले पाहिजे, हा अक्षय यांचा विचार होता. या स्वप्नांसाठी नोकरी सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. या निर्णयामुळे अक्षय यांच्या आव्हानात वाढच होणार होती पण, जोखीम घेतल्याशिवाय काही मोठे घडत नाही हे माहित असल्याने अक्षय यांचा निश्चय दृढ होता. या प्रवासात त्यांच्या आयुष्यात दोन व्यक्तिमत्त्वांनी खास छाप सोडली. वडील जगदीश ढोबळे यांनी दिलेली प्रामाणिकपणाची आणि कष्टाची शिकवण आयुष्याचा पाया ठरली. तर प्रिंटिंग उद्योगातील यशस्वी व्यक्तिमत्त्व निलेश ठाकूर यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. ठाकूर यांनी आजवर अनेक तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यासपीठ दिले.
व्यवसाय सुरू करतेवेळी अक्षय यांच्याकडे तुटपुंजे भांडवल आणि शून्य ओळखी होत्या. त्यामुळे बाजारपेठेतली प्रत्येक दारं त्यांनी ठोठावली पण, बहुतेक ठिकाणी नकारच मिळाला. कधी उपहास, कधी दुर्लक्ष, तर कधी थेट अपमानही त्यांच्या वाटेला आला पण, त्यांनी हार मानली नाही. आज दार बंद होत आहे पण, उद्या हेच दार आपल्यासाठी उघडेल, या विश्वासानेच ते पुढे जात राहिले.
दरम्यानच्या या संघर्षकाळातील एक घटना त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. एका नामांकित ब्रॅण्डच्या अधिकार्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की, "तुमच्याकडे अनुभव नाही, संपर्क नाही, मग आम्ही तुम्हाला का काम द्यावे?” अक्षय यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले, ’मी पैशाने श्रीमंत नाही पण विश्वासाने नक्कीच श्रीमंत आहे, एकदा संधी द्या. काम आवडले नाही, तर त्याचा मोबदला नका देऊ’. त्या ब्रॅण्डने एक छोटासा प्रकल्प अक्षय यांना दिला. अक्षय यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन ते दर्जेदाररित्या पूर्ण केले. दुसर्याच दिवशी त्या मोठ्या ब्रॅण्डमधून काम आवडल्याचा फोन अक्षय यांना आला. तसेच यापुढे तुझ्याबरोबरच काम करणार असल्याचेही त्यांनी आक्षय यांना सांगितले. ही संधीच पुढे अक्षय यांच्या व्यावसायिक आयुष्यातील, पहिले सुवर्णपान ठरली. पुढे अशा अनेक प्रसंगांनी त्यांना बळ दिले. एका नामांकित कंपनीकडून मिळालेली मोठी ऑर्डर ठरावीक वेळी पोहोचवणे अत्यावश्यक होते. वेळ कमी, साधने मर्यादित, कामगारही नव्हते. अशा वेळी अक्षय यांनी स्वतः मशीनसमोर उभे राहून काम पूर्ण केले आणि वेळेत त्या कंपनीपर्यंत पोहोचवले. त्यावेळी अक्षयला संधी देणार्यांचे शब्द होते की, "तुझ्या प्रामाणिकपणामुळेच तू मोठा होणार आहेस.” हे वायच अक्षय यांना हजारो हत्तींचे बळ देऊन गेले. अक्षय यांनी ‘बी.कॉम’ पदवी आणि ‘प्रिंटिंग-पॅकेजिंग इंजिनिअरिंग’ डिप्लोमा केला आहे. शिक्षणाने त्यांना तांत्रिक ज्ञान दिले पण, खरी परीक्षा घेतली ती जीवनातील संघर्षाने. प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या नकाराने, अडचणीने त्यांना अधिक बळकट केले.
आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एकेकाळी शून्य गुंतवणुकीत सुरू केलेला प्रिंट मीडिया कंपनीचा व्यवसाय, आज कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. ‘पीटर इंग्लंड’, ‘शॉपर्स स्टॉप’, ‘एलेन सोली’, ‘लुई फिलिप’, ‘नायका’ यांसारख्या अनेक नामांकित ब्रॅण्डसोबत त्यांचे दृढ संबंध आहेत. गुणवत्तेची हमी, योग्य दर आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंगमुळेच, अक्षय यांचा ब्रॅण्ड विश्वासाचे प्रतीक ठरला आहे. त्यांच्या व्यवसायातून अनेकांना रोजगारही मिळतो आहे. नफा मिळवणे हाच उद्देश नसून, समाजालाही सोबत घेऊन जाणे हा त्यांचा दृष्टिकोन आहे. अक्षय सांगतात, "यशासाठी पैसाच नाही तर जिद्द, प्रामाणिकपणा आणि विश्वास हेच खरं भांडवल आहे. स्वतःवर विश्वास असलेला प्रत्येकला शिखरावर जाता येतेच.”
भविष्यात अक्षय यांचे ध्येय हे पॅकेजिंग उद्योगाला मोठ्या स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्याचे आहेे. या क्षेत्रात भारताला ठळक स्थान मिळवून देण्याचे स्वप्न अक्षय उराशी बाळगतात. ते सांगतात, "मी एकटा यशस्वी होण्याच्या प्रयत्नात जरी असलो, तरी ते अपूर्ण आहे. माझ्यासारखे १०० उद्योजक समाजातून उभे राहिले, तरच खरी प्रगती होईल.” यासाठी ते तरुणांना प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करतात. अक्षय यांची प्रवासगाथा हेच सांगते की, व्यवसायात योग्य मार्गदर्शनाने संघर्ष केल्यास जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाचे कष्टही सोन्यात रूपांतरित होतात. म्हणूनच संघर्षाच्या वाटेवर अक्षय ढोबळे यांनी घडवलेला हा अध्याय तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरतो. अक्षय यांच्या पुढील वाटचालीस दै.’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
सागर देवरे
९९६७०२०३६४